बाबूभाईंचा आराम! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

आसपास गडद अंधार बघून बाबूभाई घाबरले. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की आपले डोळे तर मिटलेले आहेत. अंधार असणारच! हात्तिच्या, असे स्वत:शीच म्हणून बाबूभाईंनी डोळे किलकिले केले. पण हे काय? अंधार अजून चालूच? आपल्या डोळ्यांना काही झाले नाही ना? बाबूबाई पुन्हा घाबरले! तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की डोक्‍यावर जाडजूड पांघरुण घेतल्यावर आतल्या आत लई गडद अंधार होतो. पांघरुणाचे आवरण उतरल्याशिवाय उजेड कसा दिसणार?

बाबूभाईंनी पांघरुण धीरेधीरे बाजूला केले... एक दाढीवाला गोल चेहरा चष्म्याआडून त्यांच्याकडेच बघत हसत होता. अयायायायाईऽऽ....!! एक अस्फुट किंकाळी मारून बाबूभाई अंथरुणात उठून बसले. खोलीत कुणीच नव्हते. भास होता तर...गेले काही दिवस हे असलेच भयानक भास बाबूभाईंना होत होते. त्यांनी पांघरुणालाच घाम पुसला. छातीत अजूनही धडधडत होते. काय हे? थेट शत्रूचा चेहरा बघत जाग यावी? आजचा दिवस तरी चांगला जाऊ दे.

काल-परवाची इलेक्‍शनची धामधूम आठवून बाबूभाईंच्या मनात जबर्दस्त कळ आली. नको नको ते इलेक्‍शन. नको ते राजकारण, नको ते डावपेच...जीव अर्धा झाला नुसता. ह्या हॉररनाट्याने बाबूभाईंची वाचाच गेली होती.

मनात काहीबाही नकारात्मक चालू असताना अचानक बाबूभाईंना आठवले : अरेच्चा!! आपण तर निवडणूक जिंकलो आहोत!! मग आपण का असे इन्कम टॅक्‍सची नोटीस आल्यासारखे विव्हळतो आहोत? ऐन मध्यरात्री आपण जिंकल्याचे कळल्यावर आपल्याला केवढा मोठा हुंदका फुटला होता! तो दुर्धर प्रसंग आठवून बाबूभाईंना पुन्हा हुंदका आला...

""पती गयो, बाबूभाई! तमे जीती गयो!!'' असे ओरडत एक कार्यकर्ता आला, तेव्हा प्रारंभी तो फिरकी ताणतोय, असेच वाटले होते. त्याच्या दोन काणसुलीत द्याव्यात, म्हणून हात उगारणार, इतक्‍यात कोणीतरी गळ्यात डायरेक्‍ट हारच घातलान!! फटाक्‍यांची माळ फुटली, आणि तोंडात कच्छी पेढा कोंबला गेला...

खरेच आपण जिंकलो? नसेल नसेल!

बाबूभाईंचा बराच वेळ विश्‍वासच बसत नव्हता. पण शत्रूपक्षाचे नेते (तोच तो...दाढीवाला गोल चेहरा!) लंगडत लंगडत समोरून निघून जात असताना बघून बाबूभाईंचा जीव भांड्यात पडत गेला. तो गोल दाढीवाला चेहरा जाताना बोट दाखवत होता का? "बघून घेईन' अशा अर्थाने? बाबूभाईंना धड आठवेना.

रात्रीचे दोन वाजलेले. आता मध्यरात्री दोन ही काही निवडणूक जिंकण्याची का वेळ आहे! ही तर राक्षस वेळ. ह्या वेळेला साधारणत: राक्षसलोक जिंकतात. पण आश्‍चर्य म्हणजे आपणच जिंकलो.

गेल्या जन्मी निश्‍चित आपल्या हातून काहीतरी पुण्यकर्म झाले असणार. तरुणपणी एकदा चित्रपट बघायला गेलो असताना हौसफुल्लचा बोर्ड बघितल्यावर परत फिरणार, इतक्‍यात डोअरकीपरने डोळा मारून आत घेतले होते, तो प्रसंग बाबूभाईंना आठवला. हौसफुल्ल चित्रपट फुकटात बघायला मिळणे, ही साधीसुधी बाब नव्हे...

बाबूभाई उठले. त्यांनी पांघरुणाची घडी घातली. दात घासले. जरा अद्रक टाकून चहा करायला फर्मावून ते शिरस्त्याप्रमाणे मोबाईल फोनकडे वळले. "आपके आशीर्वादसे मै जीत गया' असा मेसेज त्यांनी काल रात्रीच महामॅडमना पाठवला होता. पण त्यावर "इतक्‍या रात्री मेसेज का पाठवला? उद्या सकाळी बोलू' असा उलट मेसेज आल्यावर बाबूभाईंनी घाबरून फोन स्विचऑफच करून टाकला होता...
बाबूभाईंना बघण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. हाच तो गृहस्थ...ज्याने दुश्‍मनाला चारी मुंड्या चीत केले. टीव्हीचे क्‍यामेरे घोळक्‍याने खोलीत शिरले. प्रश्‍नांची सरबत्ती सुरू झाली. पण बाबूभाईंनी चकार शब्द उच्चारला नाही. त्यांनी शांतपणे आवरले. दिल्लीला निघायची तयारी केली....

बाबूभाई दिल्लीला आले. महामॅडमच्या बंगल्यावर येऊन मस्टरवर सही केली. दरवाजातील खुर्चीवरची धूळ झटकली. "हुश्‍श' म्हणत त्यांनी आपली बैठक जमवली. "याचसाठी केला होता अट्टहास' ही जाणीव अंगांगात भिनवली. एक दीर्घ श्‍वास घेऊन त्यांनी शेवटी आपला मोबाईल फोन स्विच ऑन केला आणि म्हणाले, ""अब बोलो...''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com