दिवा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

कुठे दिवाळी कात टाकते
अन दैवाला फुटतो घाम
राधेला पाहून कसा रे
धून विसरतो मेघ:श्‍याम

कुठे दिवाळी ऐन भरातील
उच्छावाचा कैफ अनावर
लखलखणाऱ्या लक्ष दिव्यांची
कुठे उगवते पहाट मंथर

कुठे दिवाळी अस्मानातील
आतिषबाजी आणिक धूर
सुग्रासाच्या मेजावरती
ऐन सुगीला येतो पूर

कुठे दिवाळी ठुमकत येते
अचूक उतरते गात्री गात्री
नवी नवेली नवथर बाला
जणू जागते रोशन रात्री

कुठे दिवाळी कात टाकते
अन दैवाला फुटतो घाम
राधेला पाहून कसा रे
धून विसरतो मेघ:श्‍याम

कुठे दिवाळी तेल नि उटणे
आंघोळीची पुरी बादली
निरांजनाच्या तबकामागे
मांगल्याची ज्योत तेवली

कुठे दिवाळी मजेत म्हणते
वर्षभराची विसरा वणवण
गिळून आवंढा देहीं फासा
दर्वळणारा मोती साबण

कुठे दिवाळी उगीच येते
हौसेलाही नसते मोल
सालाबादी तशीही फिरते
सूर्याभवती पृथ्वी गोल

कुठे दिवाळी, सर्द फटाके
लक्ष्मीलाही होतो तोटा
रोज मोजतो चाकरमानी
जेबेमधल्या कमीच नोटा

कुठे दिवाळी बोनसवाली
नवीन कपडे नवी सायकल
सणासुदीच्या नावाखाली
उसनवारीची सदैव फतकल

कुठे दिवाळी अंधाराशी
भिंतीवरती घेते टकरा
मुकी बहाले, मौन उंबरे
अवकाळीच्या साहती चकरा

सज्जामधल्या खिळ्यास कुठल्या
लटकावा हा वार्षिक कंदील
लुकलुकणाऱ्या चंट दिव्यांची
माळ कुठेशी लावू बुझदिल

दारापुढती तेवत पणती
रांगोळीची आळशी पखरण
फणा डोलवित देत इशारे
दारावरचे उगाच तोरण

कुठे प्लगातच वीज निमाली
कुठे हरवले सहा ऋतु
विरुन गेला पदरकाठ पण
जपून ठेवितो कलाबतू

अभावातली भावदिवाळी
कुठे कुठे पण नभिं असू दे
फराळातल्या भरल्या ताटीं
उणीवांचेही भान असू दे

घोर तमाच्या कृष्णसागरी
माणुसकीचे असते द्विप
तिथेहि ठेवा एखादा पण
ऊरातला तो मंगलदीप!
...दिवाळीच्या शुभेच्छा!!

-ब्रिटिश नंदी
...................................

Web Title: dhing tang article