व्हायरल प्रेम! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

चुकार कुंतल गालावरचे
उगीच मागे त्यांना ढकलुनी
विचारिलेस तू मला "काय रे?'
एकच भिवई उंच उडवुनी

खरेच नाही मजला सखये
आठवत काही हल्ली हल्ली
जुनी पेठ ती,-बोळ हिंडता
उगाच चुकतो मी मग गल्ली!

आठवते तुज अजून वेडे?
शाळेमधली प्रभात फेरी?
मला न काही स्मरते आता,
कमाल आहे तुझी मेमरी!

आठवतो तुज? तेव्हाचा तो
बघाबघीचा खेळचि नवथर?
माझी किंचित नजर धिटाई
तुझिया गाली फुटे पावडर?

सांग तुलाही स्मरती का गे,
प्रार्थनेतले सामूहिक स्वर
"शारीरिक'च्या तासाला अन्‌
हसाहशीचा खेळ अनावर

गर्भरेशमी तुझ्या बटांना
सावरणारी निमूळ बोटे
किंचित हांसत डोळ्यांमधुनी
विभ्रम करिती खोटे खोटे

चुकार कुंतल गालावरचे
उगीच मागे त्यांना ढकलुनी
विचारिलेस तू मला "काय रे?'
एकच भिवई उंच उडवुनी

म्हणालो, "कुठे काय?' अन्‌
पुन्हा उडवुनी दोन्ही भिवया
त्याच क्षणाचे झाले गारूड
बिजली गेली कांपत हृदया

दोस्ताच्या खांद्यावर माझा
हात निराळा होता सहजच
सुस्काऱ्याच्या नि:श्‍वासातच
जरा टेकलो होतो सहजच

इकडे तिकडे बघून तेव्हा
जुळविलेस तू पुढचे काटे
कचकन डोळा मारून तेव्हा
शहाजोग झालीस कारटे!

आणि इथे मी खलास झालो...

आणि इथे मी खलास झालो,
पराकोटीचे लागे खूळ
डोके खाली, पायहि वरती
उलटे झाले हे वाघूळ!

अभ्यासाचे फुटले तारू,
आणि उसळला मनात दर्या
तुझे आणखी तुझ्याचसाठी
गृहपाठाची ही दिनचर्या

किंवा गणिताच्या तासाला
सोडविताना प्रमेय अवघड
बाकावरती कोरून कोरून
नाव गिरविले तुझेच फक्‍कड

शाळेमधल्या बाकावरती
असेल अजुनी कोरीव लेणे?
तुझ्या नि माझ्या नावामधले
बदामनामी ताणे बाणे?

वेड लागले, वेड लागले
वेड लागले याडखुळे!
एक दिवाणा उठला तेव्हा
आयुष्यातुनि तुझ्यामुळे!

आहे तुजला काहि कल्पना?
तुझ्या कृतीने काय जाहले?
नसेल! कारण पुन्हा तसे ते
वाट्याला मज कधी न आले!

शाळेमधले दिवस कसे ते
उडून गेले थव्या थव्याने
नभात उरला फक्‍त उन्हाळा
झरतो तोही कणाकणाने

घडले का हे? किंवा असले
दुसरे काही असेल का पण?
सांग सखे गे परस्परांना,
खरेच का सांपडलो आपण?

कालच होते पाहियले मी
असले काही स्वप्न व्हायरल
दिसलो मजला तिथे मीच अन्‌
समोर तू ती सदेह चंचल

असेल जरि हा भास तरीही
हसू नको तो तसा असू दे
सायंकाळी ह्या बाकावर
टोकाशी मज मौन बसू दे

म्हणून म्हटले-

खरेच नाही मजला सखये
आठवत काही हल्ली हल्ली
जुनी पेठ ती,-बोळ हिंडता
उगाच चुकतो मी मग गल्ली!

Web Title: dhing tang article