गोलिकावर्षाव संरक्षक चक्रतंत्र! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

""शत्रू की मित्र?,'' शेजारी खुंखार चेहऱ्यानिशी एक संघस्वयंसेवक उभा होता. सळसळत्या उत्साहामुळे त्याच्या पिकलेल्या मिश्‍या थर्थरत होत्या. निरखून पाहिले, त्यांचे पायदेखील थरथरत होते. आम्ही निमूटपणाने "मित्र' असे उत्तर दिले

अवघ्या तीन दिवसांत तयार होऊन सरहद्दीवर जायच्या विचाराने बाहु स्फुरण पावत होते. रणभूमीकडे कूच करण्याच्या अनिवार ओढीने पाय शिवशिवत होते. संघकार्यासाठी झुंजण्याच्या कल्पनेने अवघा देह रोमांचित झाला होता. तांतडीने गणवेशास इस्तरी केली. इस्तरी करता करता मनात कृतज्ञतेचा विचार डोकाविला...हल्ली उत्तरेत थंडीची लाट आली आहे. गणवेषात फुलप्यांटीचा अंतर्भाव झाला, हे वरिष्ठांचे किती द्रष्टेपण! तिथे बर्फ असते म्हणे!! फुलप्यांट नसती तर बर्फात पाऊले रोवत शत्रूवर चालून जाणे कठीण झाले असते. मागल्या खेपेला शाखेवरून परतत असताना शेजारच्या आळीतील समाजवादी गंप्याने बर्फाचा गोळा...जाऊ दे! आता फुलप्यांटीचे चिलखत आहे. शूर आम्ही सरदार अम्हाला, काय कुनाची भीती? उलट शत्रूचेच आता काही खरे नाही!!

...प्रात:काळचा समय होता. हवेत गारवा होता. गजर वाजला.

उठलो...संघकार्यासाठी पहाटे सहा काय, तीन वाजतादेखील उठूं. संघकार्यासाठी करारी मुद्रेने दंतमार्जन केले. भराभरा तयार होऊन (तपशील टाळला आहे...) मैदानावर गेलो. खाडकन बुट जुळवून दक्ष पवित्र्यात उभा राहून पुढील आदेशाची वाट पाहत होतो. सरहद्दीवर निघण्यापूर्वी वरिष्ठांकडून युद्धनीतीचे पाठ घोटून घेणे गरजेचे होते. माणसाने कसे सतत शक्‍तियुक्‍त, बुद्धीयुक्‍त आणि युक्‍तीयुक्‍त असले पाहिजे. भारलेल्या अवस्थेतच संघशाखेवर गेलो.

""शत्रू की मित्र?,'' शेजारी खुंखार चेहऱ्यानिशी एक संघस्वयंसेवक उभा होता. सळसळत्या उत्साहामुळे त्याच्या पिकलेल्या मिश्‍या थर्थरत होत्या. निरखून पाहिले, त्यांचे पायदेखील थरथरत होते. आम्ही निमूटपणाने "मित्र' असे उत्तर दिले. "मग हरकत नाही' असे म्हणून त्यांनी आपले अमोघ शस्त्र ऊर्फ दंड म्यान केला. युद्धनीतीचे पाठ घेण्यासाठी हे ज्येष्ठ स्वयंसेवक स्वत: आले होते. त्यांच्या पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी किमान तीन युध्दे पाहिली किंवा (रेडिओवर) ऐकली होती. त्यांनी आम्हा स्वयंसेवकांना शस्त्रसज्जतेचा आदेश दिला. (आमच्या हातात ऑलरेडी दंड होता.)

ते म्हणाले, "" विश्राम:..ऐका. शत्रू प्रबळ आहे. सरहद्दीच्या पलीकडे त्याने खंदक खणून ठेवले आहेत. वाळूच्या पोत्यांच्या मागे बसून ते तिथून गोळ्या झाडतील. आपण त्याला चोख उत्तर द्यायचे. काय कळलं?''

आम्ही साऱ्यांनी माना डोलावल्या. चोख उत्तर नेमके कशाने देणार, हे मात्र आम्हाला कळले नाही. युद्धनीतीबद्दल अर्धा घटका उचित शब्दांत विवेचन करून त्यांनी शिरस्त्याप्रमाणे विचारले, ""काही शंका?'                                   '""शत्रूकडे बंदुका असतील का?'' आम्ही.
""त्याशिवाय ते गोळ्या कशा झाडतील?,'' ते म्हणाले.
""मग त्यास चोख उत्तर कसे द्यावे?'' आम्ही. उत्तरादाखल त्यांनी हातातला दंड दाखवला.
म्हणाले, ""हा दंड हाती असलेल्या कुठल्याही स्वयंसेवकाच्या देहाला शत्रूची गोळी लागणे अशक्‍यप्राय आहे...त्याचं एक टेक्‍निक राहाते, भौ! उगाच धंतोलीवर टहलटपुरी करायला गेल्यासारखं सरहद्दीवर हिंडून चालत नाही. शत्रूकडे एके-सत्तेचाळीस असली तरी काही फिकीर नाही. आपल्यावाला हा दंड पुरेसा आहे...''
""ते कसं काय?'' आम्ही. त्यावर त्यांनी शत्रूने सरहद्दीच्या पलीकडून गोळीबार केला तर काय करायचे ह्याचे जबर्दस्त प्रात्यक्षिक करून दाखवले.
""हे पाह्यजो...हा दंड मधोमध पकडून द्यायचा...हा अस्सा!...असा नाही बेऽऽ...हा असा!! दंड पकडून असा गारगारगारगार फिरवला की बंदुकीच्या गोळ्या चाल्ल्या जातात दाही दिशांन्ले! अंगाले एकही लागत नाही...काय?'' ते म्हणाले.
""भन्नाटच आहे...पण ह्या कूटतंत्राचे नाव काय?'' आम्ही.
"" ह्याला "गोलिकावर्षाव संरक्षक चक्रतंत्र' असं म्हणतात,'' अभिमानाने ते म्हणाले.
...सरहद्दीवर शेकडो गोलिकावर्षाव संरक्षक दंडचक्रे फिरत असून शत्रूच्या गोळ्या परत त्यांच्यांच अंगावर जात असल्याचे चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. धन्य झालो!
...आम्ही तांतडीने सरहद्दीकडे निघालो आहो! जय भारत.

Web Title: dhing tang article

टॅग्स