ढिंग टांग : आपलं नेमकं काय ठरलंय?

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : एक घाव तीन-चार तुकडे!
प्रसंग : बांका!

पात्रे : युतीधर्मपालक मराठीमनसिंहासनस्थ राजाधिराज उधोजीमहाराज आणि मराठी दौलतीच्या चाव्या मुळ्ळीच हॅंडओव्हर करायला तयार नसलेल्या सौ. कमळाबाई.

उधोजीराजे : (ताड ताड चालत येत कडाडून) आमच्याशी दगाफटका? आमच्याशी फंदफितुरी? आमचा विश्‍वासघात? अखेर व्हायचं तेच झालं! वळणाचं पाणी वळणाला गेलंच!!

कमळाबाई : (थंडपणाने) काय झाऽऽलंऽऽ?

उधोजीराजे : (संतापातिरेकानं) झाय कालं? लाय कालं?(भानावर येत) काऽऽय झाऽऽलं? केसानं गळा कापलात आणि आता तुम्हीच वर तोंड करून विचारता?

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : एक घाव तीन-चार तुकडे!
प्रसंग : बांका!

पात्रे : युतीधर्मपालक मराठीमनसिंहासनस्थ राजाधिराज उधोजीमहाराज आणि मराठी दौलतीच्या चाव्या मुळ्ळीच हॅंडओव्हर करायला तयार नसलेल्या सौ. कमळाबाई.

उधोजीराजे : (ताड ताड चालत येत कडाडून) आमच्याशी दगाफटका? आमच्याशी फंदफितुरी? आमचा विश्‍वासघात? अखेर व्हायचं तेच झालं! वळणाचं पाणी वळणाला गेलंच!!

कमळाबाई : (थंडपणाने) काय झाऽऽलंऽऽ?

उधोजीराजे : (संतापातिरेकानं) झाय कालं? लाय कालं?(भानावर येत) काऽऽय झाऽऽलं? केसानं गळा कापलात आणि आता तुम्हीच वर तोंड करून विचारता?

कमळाबाई : (निरागस आव आणत) हो, हो, मीच विचारत्ये, काय झालं? सूर्य पच्छिमेला उगवला की खोंडानं दूध दिलंन? आंब्याला पेरू लागले, की कोंबडीच्या अंड्यातून मोराचं पिल्लू बाहेर आलं? झालंय काय येवढं?

उधोजीराजे : (दु:खातिरेकानं) बरंच काही झालं कमळे! महाराष्ट्राला शाप भोवला! भोळ्याभाबड्या मराठी माणसाला पुन्हा एकदा फशी पाडलं गेलं!! केसानं गळा कापला गेला!

कमळाबाई : (आठवून) केसानं गळा कापणं वगैरे झालं मघाशीच! नवीन उपमा द्या!

उधोजीसाहेब : (दातओठ खात) उपमा नाही नि इडली नाही! काहीही देणार नाही! 

कमळाबाई : (बेफिकिरीनं) ऱ्हायलं! मला बै खूप कामं आहेत! समारंभाची तयारी नाही का करायची? आणि हो, तुम्ही शपथविधी समारंभाला कुर्ता घालणार की साधा शर्टप्यांट?

उधोजीराजे : (हतबुद्ध होत) बये कमळे, तू कोणत्या मुशीतून बनलेली आहेस? एवढं भयंकर घडतंय आणि तू विचारतेस, रामाची सीता कोण?

कमळाबाई : (लाजून) इश्‍श! तेवढं जनरल नालेज आहे म्हटलं आम्हाला!! आम्हीही महाभारत वाचलंय म्हटलं!!

उधोजीराजे : (हतबलतेनं) बाई, बाई! रामायण गें ते!!

कमळाबाई : (उडवून लावत) तेच ते! शप्पतविधीला काय घालणार ते सांगा! मला इस्तरीला टाकायचेत कपडे! आत्ता दारात उभा राहील तो लांड्रीवाला!! 

उधोजीराजे : (कासावीस होत) कां...कां...कां वागलीस अशी कमळे? आम्ही कित्ती भरवसा ठेवला होता तुझ्यावर! आपल्या कित्ती कित्ती आणाभाका झाल्या! सगळं ठरलं होतं ना आपलं?

कमळाबाई : (डोळे मोठ्ठे करत) अयाबया! मी कुठे नाही म्हंटेय? आपलं ठरलंचै मुळी!

उधोजीराजे : (अजीजीने) समसमान वाटपाचं आपलं ठरलं होतं ना?

कमळाबाई : (आश्‍चर्यानं) बाई, बाई, बाई! कस्लं समसमान वाटप? प्रापर्टीचं ना? इश्‍श, ते तर कधीच ठरलं नाही का?

उधोजीराजे : (कसोशीने संयम पाळत) सत्तेत समान वाटा ठेवायचा असं, आपलं लोकसभा निवडणुकीआधी ठरलं होतं की नाही? तुमचे कारभारी नानासाहेब फडणवीस आणि ते मोटाभाई दिल्लीहून आले होते आमच्या घरी... आठवतंय? वीस-वीस साबुदाणे वडे खाल्ले त्यांनी!!

कमळाबाई : (नापसंतीनं) इश्‍श! आवडले म्हणून घेतले असतील दोन ज्यास्त! दुसऱ्याचं अन्न असं काढू नये!!

उधोजीराजे : (कळकळीनं) महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाची तरी काही चाड ठेव! फिफ्टी-फिफ्टीचा करार झाला होता आपला! साबुदाणा वड्यावर हात ठेवून तुमच्या मोटाभाईंनी शब्द दिला होता आम्हाला!

कमळाबाई : (मंचकावर बसून गादीवर रेघोट्या ओढीत) आम्ही कुठे नाही म्हंटोय! ठरल्याप्रमाणेच तर होणाराय! तुम्ही-आम्ही का परके आहोत?

उधोजीराजे : (चेहरा उजळून) मग मुख्यमंत्री आमचा हे ठरलं ना?

कमळाबाई : (खोट्या प्रेमळपणाने) छे, आमचाच बरा!  शेवटी तुमचा काय, नि आमचा काय...दोन्ही एकच किनई?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article on Alliance