ढिंग टांग : विनूची गोष्ट

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

साहेब, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेली किती वर्षे पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, याचा हिशेब नाही. प्रसंगी घरच्यांची बोलणी खाल्ली, पण पक्षाचे काम सोडले नाही.

मा. पक्षाध्यक्ष,
स. न. वि. वि. अत्यंत विचित्र परिस्थितीत हे पत्र लिहीत आहे. मोबाइल फोन बंद करून ठेवला आहे आणि लॅंडलाइनचा फोनही काढून ठेवला आहे. घराचे दरवाजे व खिडक्‍या कडेकोट बंद आहेत. हट्टाने दाराची बेल वाजवणाऱ्याला ‘साहेब घरात नाहीत’ असे सांगण्यास कुटुंबाला बजावून ठेवले आहे. (कुटुंबदेखील पदरात तोंड लपवून हसत्ये आहे!!) उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतही माझे नाव न आल्याने ही भयंकर परिस्थिती ओढवली आहे. कालपर्यंत माझ्या दाराशी मांडव पडला होता. इलेक्‍शनच्या तयारीसाठी कार्यकर्ते उत्साहाने गोळा झाले होते. चहा, वडे वगैरे रतीब सुरू झाला होता. मतदारयाद्यांची पाने फाडून एकमेकांना वाटण्याचे कार्य जवळपास पूर्ण झाले होते. पण मघाशीच कोपऱ्यावरचा चहावाला साडेसात हजारांचे बिल हातावर ठेवून गेला, म्हणाला, ‘‘साहेब, अब तिकट का तो भरोसा नही रहा... क्‍या मालूम क्‍या होगा? आप रोकडमेंही कार्यकर्ताओं को चाय पिलाना!’’

‘बाद मे आवो’ असे सांगून त्याला फुटवले.

साहेब, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेली किती वर्षे पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, याचा हिशेब नाही. प्रसंगी घरच्यांची बोलणी खाल्ली, पण पक्षाचे काम सोडले नाही. ‘देश प्रथम, फिर दल, अंत में स्वयं’ हा बाणा कायम ठेवला. अनेक वर्षे इतक्‍या हारणाऱ्या निवडणुका लढलो आहे, की त्यालाही गणती नाही. पक्षाची पोस्टरे चिकटवण्यासाठी रात्र रात्र हिंडावे लागत असे. भिंती रंगवाव्या लागत असत. अशावेळी मध्यरात्रीनंतर घरी गेल्यावर कोणी दार उघडत नव्हते. अनेक दिवस उंबरठ्यात झोपून राहावे लागल्याच्या आठवणीही आहेत. 

पण गेली पाच वर्षे आयुष्यातली सुंदर वर्षे होती. पक्षाने मला तिकिटासोबत खूप काही दिले. कुठलेही घराणे किंवा पाठबळ नसताना हा साधासुधा कार्यकर्ता चक्‍क मंत्री झाला. सतरंज्या उचलणाऱ्या एका कार्यकर्त्याचे रूपांतर बघता बघता ज्येष्ठ नेत्यामध्ये झाले. 

यंदाही माझे नाव पहिल्या यादीत हमखास असणारच, या खात्रीने मी निवडणुकीच्या कामाला लागलो. इतकेच नव्हे, तर ‘इनकमिंग’साठी अन्य पक्षांतल्या अनेक नेत्यांना फितवून मी आपल्या पक्षात आणले... पण काय चुकले कळत नाही. पहिल्या यादीत माझे नाव आले नाही. म्हटले, काही अडचण असेल. राजकारण म्हटले की अशा अडचणी येतातच. पण काल रात्री प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीतही माझे नाव न आल्याने हवालदिल झालो आहे. यादीत माझे नाव नाही, हे कळल्याच्या पाचव्या मिनिटाला घरासमोरील मांडवातील कार्यकर्त्यांची साठ टक्‍के गर्दी ओसरली. उरलेले वीस टक्‍के ‘च्यामारी, आता कसं करायचं?’ छापाची चर्चा करत राहिले, आणि त्यातूनही उरलेले वीस टक्‍के चहा, वडेवाला, खुर्च्यांचा कंत्राटदार, लायटिंगवाला, अशा ‘कामसू’ लोकांची गर्दी होती.

दुसऱ्या यादीत नाव न आल्याने मी काही लोकांना फोन लावले. पक्षाध्यक्षसाहेब, तुम्हालाही फोन लावला होता. पण तुम्ही मीटिंगमध्ये असल्याचे उत्तर मिळाले. पहिल्या यादीत नाव न दिसल्यावर मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटून ‘माझे काही चुकले का?’ असे विचारले होते. त्यावर तुम्ही एक सुस्कारा सोडून ‘हायकमांड’चा काहीतरी गैरसमज झाला असणार, पण मी बघतो, असे म्हणाला होतात!! दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने माझे खूपच काही चुकले असणार, असे वाटू लागले आहे. नेमके काय करू? कृपया मार्गदर्शन करावे. 

अजूनही आपला आज्ञाधारक. 
एक होता विनू.
ता. क. : मी नाही तर माझ्या घरच्यांपैकी कोणाला तिकिट देता येईल का? कृपया विचार व्हावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article vinod tawde