esakal | ढिंग टांग : पाणी!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पाणी!

ढिंग टांग : पाणी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

ह्या नभाचे दान पाणी
ह्या भुईचे भान पाणी
मेघमंत्रांच्या श्रुतींचे
भारलेले गान पाणी

भांडणारे भंड पाणी
बोचणारे थंड पाणी
जीविताचा घास घेते
प्रलयींचे उद्दंड पाणी

जीविताचा घास पाणी
आपुलाला श्‍वास पाणी
आरंभबिंदू जीवनाचा
संस्कृती अधिवास पाणी

सर्जनीं अनुरक्‍त पाणी
सूर्यतेजासक्‍त पाणी
पर्जन्यसूक्‍तातील हे गा
पूजनीं वेदोक्‍त पाणी

सागराचे दृष्ट पाणी
बाष्पातले अदृष्ट पाणी
एकुट्या धारेत केव्हा
वाहणारे शिष्ट पाणी

चांदव्याचे बिंब पाणी
चंद्रलोभी लिंब पाणी
अन्‌ तळ्याच्या चांदण्यातच
हांसरे प्रतिबिंब पाणी

महापुराचे पुष्ट पाणी
जीवघेणे दुष्ट पाणी
सागराला प्राशिणाऱ्या
अगस्तीचे उच्छिष्ट पाणी

जलधिचे गंतव्य पाणी
भूतळीचे भव्य पाणी
आणि पूजेतील केव्हा
प्रार्थनेचे दिव्य पाणी

प्रोक्षणीं पावित्र्य पाणी
जीवनीं चारित्र्य पाणी
जन्मण्याचे मूल्य केव्हा
मूर्तिमन स्वातंत्र्य पाणी

कोंदिले आत्म्यात पाणी
सृष्टी-तादात्म्यात पाणी
आत्मबीजातील केव्हा
जीवपरमात्म्यात पाणी

भूमीच्या गर्भात पाणी
शुष्कल्या दर्भात पाणी
चौऱ्यांशीच्या फेऱ्यातल्या
क्षणमात्र संदर्भात पाणी

झळझळे गा तप्त पाणी
खळबळे उन्मत्त पाणी
का घरांचे उंबरे, पण
ओलांडते उन्मत्त पाणी

कोसळे वा दरित पाणी
शैवालमिश्रित हरित पाणी
सरीवरल्या श्रावणातिल
बेभरवशी सरित पाणी


निर्झराचे खेळ पाणी
वाहणारी वेळ पाणी
लेकुराची माय होऊन
पोसणारी केळ पाणी

वोतते ध्रोंकार पाणी
छेडते झंकार पाणी
आईच्या उदरातला वा
कोवळा हुंकार पाणी

वस्तीतला आकांत पाणी
भाकरीची भ्रांत पाणी
जीवनाचा घास घेऊन
झोपलेले शांत पाणी

हे पुराचे रूप पाणी
विद्‌ध्वंस अन विद्रुप पाणी
डुचमळे निश्‍चेष्ट येथ
मृत्यूचे अपरूप पाणी

शांत पाणी, थंड पाणी
उद्दंड अन प्रच्चंड पाणी
आवरी तुझिया पुराला
आवरी रे चक्रपाणी

loading image