लायसन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 4 एप्रिल 2018

तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारितेत आम्ही प्रवेश केला, तेव्हा आम्ही खरोखर हाडाचा सापळा होतो, परंतु अनुभवाने परिपक्‍वता येत गेल्यावर आज आम्ही चांगले ऐंशी रत्तल वजनी गटातील ज्येष्ठ पत्रकार झालो आहो. कालाय तस्मै नम: दुसरे काय? 

तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारितेत आम्ही प्रवेश केला, तेव्हा आम्ही खरोखर हाडाचा सापळा होतो, परंतु अनुभवाने परिपक्‍वता येत गेल्यावर आज आम्ही चांगले ऐंशी रत्तल वजनी गटातील ज्येष्ठ पत्रकार झालो आहो. कालाय तस्मै नम: दुसरे काय? 

आम्ही कायम मूल्याधिष्ठित पत्रकारितेचाच अंगीकार केला. बातमीची विशुद्धता जपताना कोठलीही तडजोड केली नाही. सत्य बातम्या तेवढ्याच छापल्या. सत्य तेच प्रतिपादन केले. आमच्या प्रतिपादनाचा काही लोकांना वेगळाच वास आला असेल, तर त्याला आमचा नाईलाज आहे. सत्य हे अनेकदा कटू आणि दुर्गंधयुक्‍तदेखील असते. जाऊ दे. सारांश एवढाच, की पत्रकारितेचे हे असिधाराव्रत आम्ही जाणत्या वयापासून अंधतेने नव्हे, डोळसपणाने स्वीकारले आहे. (असिधाराव्रत : अर्थ : असि म्हंजे तलवार, पाते, खड्‌ग. धारा म्हंजे धार... आय मीन तीक्ष्ण धार!! व्रत म्हंजे व्रतच!) अर्थात पुरेसे शिक्षण व जरूर ते कौशल्य आत्मसात करण्यात अपयश आल्याने केवळ नाईलाजाने आम्ही पत्रकारितेत आलो, अशी आमच्यावर टीका होते; पण त्याकडे दुर्लक्ष करून आमची वाटचाल चालू आहे. पत्रकारितेचे खडतर व्रत चालविताना अनेक पथ्ये पाळावी लागतात. ती आम्ही यथाशक्‍ती पाळत आलो आहे. म्हणूनच आज आम्ही सव्यसाची व ऋषितुल्य पत्रकारांमध्ये मोडतो. (पक्षी : समाविष्ट होतो.) असो. ज्याप्रमाणे जाणत्या ड्रायव्हरास गावातील गल्ल्याकुच्या तोंडपाठ असतात, तद्वत पत्रकारितेतील खाचाखोचाही आम्हाला पक्‍क्‍या ठाऊक आहेत. अधिक काय बोलायचे? 

...तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे ड्रायव्हरही आहो. सायकलीवरून आम्ही ह्या कार्याची सुरवात केली. सांगावयास अभिमान वाटतो, की आता आम्हाला टेंपोदेखील चालवता येतो! मधल्या काळात आम्ही ऑटोरिक्षा चालवावी, अशी शिफारस आमच्या तीर्थरूपांनी केली होती. जेणेकरून आम्ही आमचे पोट जाळू शकू. पण आम्ही पत्रकारितेच्या ब्रीदाला जागून त्याचा (जमेल तितका) निषेध केला. पुढील पुणेरी इतिहासात न पडणे ठीक राहील... सारांश एवढाच की पुण्यात ऑटोरिक्षा चालवणे हेही एक प्रकारचे असिधाराव्रतच आहे!! असो. 

ड्रायव्हिंगचे लायसन आणि पत्रकारितेची अधिस्वीकृती आम्हाला मिळाली, ते दोन्ही दिवस ऐतिहासिक मानावे लागतील. ड्रायव्हिंगचे लायसन घेऊन घरी येताना आम्ही आता स्वत:च्या चाकावर उभे राहण्यास मोकळे झालो, असे फीलिंग आले होते. तथापि, आर्टीओवाल्याने पहिल्यांदा सिग्नल तोडल्याबद्दल तेच लायसन 'मागूण' घेतले, तेव्हा मनास यातना झाल्या. 'तुमच्यासारके जंटलमन लोक अशे वागायले तर कसं व्होनार?' असे चिंत्य मत त्याने व्यक्‍त केले, तेव्हा आम्ही 'आधी तुमचे खाते नीट चालवा' असे त्यास बाणेदारपणे सुनावले. अखेर 'तीन वेळा गलती कराल, तर लायसन जानार' असा इशाराही त्यांनी दिला. तो आम्ही आजतागायत लक्षात ठेविला आहे. कालौघात आमचे लायसन जमा झाले; पण आम्ही आमचे असिधाराव्रत लायसनशिवाय सुरूच ठेवले. 

...पत्रकारितेच्या लायसनचेही आता असेच होणार आहे. तीन वेळा गलती केल्यास संबंधित पत्रकाराची मान्यता रद्द करणारा नियम अमलात येणार असल्याचे कळले. ह्या मोगलाईछाप नियमाचा आम्ही सिग्नल तोडून निषेध करतो. आता हे खरे की ड्रायव्हिंगप्रमाणेच पत्रकारितेतही लेन कटिंग होते. सिग्नल तोडले जातात. अपघात होतात. स्पीडब्रेकर न दिसल्याने तोंडघशी पडायला होते. टिब्बल सीटचे गुन्हेही घडतात. ड्रायविंगमध्ये साध्या गुन्ह्यांसाठी हवा काढण्याचीही शिक्षा असते. पत्रकारितेत जवळपास तस्सेच सारे असते, हे आम्हास मान्य आहे. परंतु, ही एक प्रकारे मुस्कटदाबी आहे, हे कोणासही मान्य व्हावे. जाऊ दे, झाले!! 

...लायसन ड्रायव्हिंगचे असो वा पत्रकारितेचे, ते नियम पाळणाऱ्यांसाठी असते. आम्हांस त्याचे काय भय? असो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang by British Nandi