तयारी! (एक पत्रव्यवहार) (ढिंग टांग!)

तयारी! (एक पत्रव्यवहार) (ढिंग टांग!)

आदरणीय माननीय प्रात:स्मरणीय मोटाभाई ह्यांच्या चरणकमळी बालके नानाचा शिर साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की गेल्या काही दिवसांत अनेक पक्षांनी आंदोलने, मोर्चे, मेळावे, यात्रा असे कार्यक्रम हाती घेतले व तडीसही नेले. सर्वांना शक्‍तिप्रदर्शन करता आले. आपलाच पक्ष मागे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी आपल्या कार्यकर्त्यांचाही एखादा राज्यव्यापी महामेळावा घेता येईल का? कळावे. आपला धाकटा भाऊ (शेंडेफळ). फडणवीसनाना. 
* * * 
डिअर नानाभाई, जे श्री क्रष्ण...दी बेस्ट सजेशन!! महामेळा : 6 एप्रिल. कमल स्थापना दिवस. ठिकाणा : बोम्बे. बांदराच्या आसपास. ...प्लीज अरेंज एण्ड इन्फोर्म. मोटाभाई. 
* * * 
आदरणीय मोटाभाई, शतप्रतिशत प्रणाम. 6 तारखेला आपल्या महान पक्षाचा महामेळावा मुंबईत घेण्याची आपली आयडिया अप्रतिम आहे. मी सर्व व्यवस्था चुटकीसरशी करतो. काळजी नसावी. आपण फक्‍त यावे व आमच्या आतिथ्याचा लाभ घ्यावा. सध्या आपण कर्नाटकात इलेक्‍शनच्या कामी गडबडीत असाल, ह्याची जाणीव आहे. कर्नाटकात आपण जवळपास सगळ्याच सीटा जिंकू असे दिसते. मी तिथे यायला हवे आहे का? कळावे. आपला मानसपुत्र (शेंडेफळ). नाना. 
* * * 
शेलारमामा, दिल्लीहून आलेल्या तातडीच्या आदेशानुसार बांदऱ्यातील कलानगराच्या आसपास आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. 6 एप्रिल ही तारीख बऱ्याच वर्षांपूर्वी ठरली आहे! तातडीने कामास लागावे व मांडवासहित सर्व योजना करून मला कळवाव्यात. साहेबांच्या कामी हयगय झाल्यास गय केली जाणार नाही, अकारण आयुष्यभर हय हय करत बसावे लागेल! कळावे. फडणवीसनाना. 
* * * 
आ. मा. ना. ना. ना.साहेब यांस, शेलारमामाचा शतप्रतिशत प्रणाम. आपला बोल म्हंजे प्रत्यक्ष नमोजींना वाहिलेले कमलपुष्पच जणू! काळजी नसावी. लग्गेच कामाला लागतो. आपला आज्ञाधारक. शेलारमामा. 
वि. वि. : आपल्या वीर विनोदजींना तूर्त सांगू नये ही विनंती! कळावे. शे. 
* * * 
शेलारमामा ह्यांस, वीर विनोद ह्यांस सारे काही ऑलरेडी कळले आहे! -नाना. 
* * * 
आ. मा. ना. ना. ना. साहेब, महामेळाव्याची सर्व सिद्धता झाली असून कलानगरच्या आसपास जागा उपलब्ध झाली नाही. एक रिकामा प्लॉट होता, तिथे "मातोश्री एनेक्‍स'चे बांधकाम चालू दिसले. अखेर कलानगरच्या मागल्या बाजूला बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍स) येथील मैदानावर मांडव टाकला आहे. खुर्च्या मांडण्याचे काम चालू आहे. पक्षकार्यात कसूर राहू नये, म्हणून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता झटत आहे. तथापि, महामेळाव्याच्या आयोजनात काही त्रुटी राहू नयेत म्हणून आपण एक भेट द्यावी, व आवश्‍यक त्या सूचना कराव्यात अशी विनंती आहे. कळावे. आपला. शेलारमामा. 
ता. क. : शेजारील मातोश्रीगडावर शांतता आहे...गड झोपला आहे का? पिण्याचे पाणी विचारायला तिथे एकदा जाऊन यावे, असे मनात आहे. शे. 
* * * 
शेलारमामा ह्यांस, मांडवात आपण नेमके कशा पद्धतीने काम करता ह्याबद्दल माझ्या मनात भलभलत्या शंका येऊ लागल्या आहेत. कारण काल सायंकाळीच मी मांडवात येऊन फेरफटका मारून गेलो!! तुम्ही सोबत होताच...आता परत मी तिथे कशाला यायचे? कमालच झाली!! 
मातोश्रीगडावरचे महाराज परदेशात सुटीवर गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी फोन करुन तसे कळवले होते. मुंबईचा उन्हाळा सोसवत नाही, असे सांगून ते गेले आहेत. (मलाही हल्ली नागपूरचा उन्हाळा सोसवत नाही, असे मी त्यांना सांगितले!! असो.) गेले ते बरेच झाले!! त्यांच्या अनुपस्थितीत आपण महामेळावा उरकून घेऊ. 
ता. क. : पाणी मागायला "मातोश्री'वर एकटे जाऊ नये!
नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com