राजकारण! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

'ऐका हो, ऐका! 
अथेन्सच्या फरसबंद चौकात 
गेल्या सायंकाळपासून 
एक बेवारस प्रेत पडले असून 
सदर इसम अथेन्सवासी नसावा, 
चेहऱ्यावरून सैनिकी पेशाचा असावा, 
परंतु पोशाखावरून शहरी वाटावा, 
असा आहे... त्याच्या निष्प्राण डोळ्यात 
काही दुलईदार स्वप्ने 
साकळली असावीत, 
असे सकृत्‌दर्शनी दिसते... 
सदर इसमाचा मृत्यू का झाला? 
ह्याचा शोध घेण्यास 
प्रधान प्रहरी अमेक्‍लॉस ह्यास 
फर्मवण्यात आले असून 
लोकशाहीचे मंदिर असलेल्या 
अथेन्सच्या रहिवाशांनी 
सहकार्य करावे होऽऽऽ' 

'ऐका हो, ऐका! 
अथेन्सच्या फरसबंद चौकात 
गेल्या सायंकाळपासून 
एक बेवारस प्रेत पडले असून 
सदर इसम अथेन्सवासी नसावा, 
चेहऱ्यावरून सैनिकी पेशाचा असावा, 
परंतु पोशाखावरून शहरी वाटावा, 
असा आहे... त्याच्या निष्प्राण डोळ्यात 
काही दुलईदार स्वप्ने 
साकळली असावीत, 
असे सकृत्‌दर्शनी दिसते... 
सदर इसमाचा मृत्यू का झाला? 
ह्याचा शोध घेण्यास 
प्रधान प्रहरी अमेक्‍लॉस ह्यास 
फर्मवण्यात आले असून 
लोकशाहीचे मंदिर असलेल्या 
अथेन्सच्या रहिवाशांनी 
सहकार्य करावे होऽऽऽ' 

दवंडी ऐकून पायघोळ झगा सावरत 
लोकशाहीचा प्रणेता क्‍लायस्थेनिस 
भराभरा चौकाकडे निघाला... 

चौकात बरीच गर्दी होती... 

एक वृद्ध थरथरत्या स्वरात म्हणाला : 
''अप्पलपोट्या अथेन्सवासीयांना 
लाज वाटावी अशी घटना आहे... 
एवढ्या समृद्ध शहरात 
भर रस्त्यात उपासमारीने 
मरावा? धिक्‍कार असो! 
...आमच्यावेळी असे नव्हते!'' 

कमरेची तलवार उपसून 
एक संतप्त सैनिक उद्‌गारला : 
''सरहद्दीवर ज्याच्यासोबत 
शत्रूशी दोन हात केले, 
त्या आमच्या बिरादराला ही मौत? 
लानत आहे, लानत!'' 

नव्यानवेलीचा एक नेता 
पुढे सरसावून म्हणाला : 
हे बघा, ह्या देशातला हरेकजण 
बांधव आहे... 
सबब, ह्या अनामवीराचे 
अंतिम संस्कार मी करेन! 
परमेश्‍वर त्यास चिरशांती देवो!'' 

दाढी कुरवाळणारा एक धर्मगुरू 
धीरगंभीर आवाजात म्हणाला : 
आत्मा अमर असतो, 
कुडी नश्‍वर असते. 
ह्या दुर्दैवी जीवाचे बलिदान 
व्यर्थ जाणार नाही... आपण 
त्याच्यासाठी प्रार्थना करूया!'' 

एक झुळझुळीत नेता तिरसटपणाने 
उद्‌गारला : काय हा तमाशा आहे? 
सदर इसम हा कर्जात बुडालेला 
बेकर्तबगार जुगारी होता, 
अशी माझी माहिती आहे... 
असल्यांसाठी टिपे गाळत 
वेळ वाया का दवडायचा?'' 

शांतपणे गर्दीच्या कोपऱ्यात 
उभे राहून गंमत पाहणाऱ्या 
क्‍लायस्थेनिसला त्याच्या 
पेरिक्‍लेनिस नावाच्या शिष्याने 
अखेर न राहवून विचारलेच : 
''गुरुवर्य, हा सारा काय मामला आहे?'' 

किंचित स्मित करून क्‍लायस्थेनिस 
म्हणाला : ''बाळ पेरिक्‍लेनिस, 
ह्यालाच लोकशाही म्हणतात! 

लोकशाहीत प्रेत कुणाचे आहे, 
ह्याला काहीही महत्त्व नसते. 
...प्रेत असणे तेवढे महत्त्वाचे! कळले?''

Web Title: Dhing Tang by British Nandi