उरलेला फराळ! (ढिंग टांग)

उरलेला फराळ! (ढिंग टांग)

उदाहरणार्थ, एक चिवड्याचा डबा घ्यावा...हा असा समोर
 ठेवावा. नखांचा योग्य विनियोग करून त्याचे झाकण उघडावे. (नाहीतरी आताशा मानवाला नखांचा उपयोग तरी काय आहे? असो.) अफझुल्ल्याच्या आंतड्यात वाघनखे खुपसावीत, तसे दातोठ खात, मूठ डब्यात खुपसावी. विहिरीतून सोन्याची कुऱ्हाड काढल्यागत (त्या बहुमोल डब्यातून) मूठ-पसा चिवडा काढून थेट फक्‍कीच मारावी. न्यम न्यम न्यम न्यम...अहाहा! हा हल्लाबोल करताना बशीबिशीचा औपचारिकपणा फडताळातच ठेवून द्यावा. कांद्याची एखादी झक्‍क फोड कचकन चावावी. काही अज्ञान सजीव अशावेळी कांदा बारीक चिरूनबिरून घेतात. कोथिंबिरीच्या हिर्वळीची पखरण करतात. एकदा एका महाभागाने तर ओला नारळ खवून चिवड्यावर पखरलेला पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले होते. हे लोक चिवडा बशीत घेऊन कांदेपोहे खाल्ल्यासारखे चक्‍क त्या बशीत चमचा खुपसून खातात. शी:!! चिवडा का उडप्याच्या हाटेलीतला उपमा आहे? ती का कर्वे रोड (पुणे) येथे मिळणारी साबुदाणा खिचडी आहे? 

चिवडा ही बशीतून खाण्याची वस्तूच नव्हे. व्हीआयपी माणसानेही चमच्याशिवाय आस्वादावा, असा एकमेव जिन्नस म्हंजे चिवडाच. तो थेट डब्यातूनच चांगला लागतो. ज्या घरात पाहुणे-रावणे आल्यावर डबाभर किंवा ताटभर चिवडा चमच्याशिवाय बाहेर येतो, ते खरे घर! अशा घरात बारमाही दिवाळी नांदत्ये. बशीत चिवडा घेऊन तो च-म-च्या-ने खाणाऱ्या गरिबागुरिबांकडे भूतदयेने पाहील, तोचि खरा दिलदार...खवय्या तेथेचि जाणावा! चमच्याच्या साह्याने चिवड्याच्या बशीतील तळलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे हुकवणाऱ्या एका अज्ञ गृहस्थाला आम्ही ‘‘रुट क्‍यानलिंग केलेत का?’ असे तात्काळ विचारून खोड्यात पकडले होते. गडी ओशाळला. 

...मुदलात चिवडा हा पदार्थ चमच्याने खाताच येत नाही, असा आमचा दावा आहे. उन्हात तापवलेल्या पातळ पोह्यांची ती नजाकतभरी रास चमच्याने उचलता उचलता निम्मी पुन्हा बशीत सांडत्ये. खोबऱ्याचा अथवा मिर्चीचा तुकडा उचलताना फार्फार कॉन्सट्रेशन करावे लागत्ये. त्यात त्या शहाण्यासुरत्या चिवड्यावर भाराभर गोष्टी येऊन पडल्या की त्याचा जीव घुसमटतो. ‘बारीक चिरा हुआ कांदा, कापी हुई मिर्ची (कमी तिखट हं!) डाळं मत डालना, लिंबू पिळा क्‍या? अशा प्रिस्क्रिप्शनचा चिवडा खाण्यापेक्षा थेटरात बसून बेचव पॉपकार्न खावेत! खरे तर चिवड्यात हृदयाखेरीज काहीच घालू नये. बाह्य अलंकारांनी चिवड्याला सजविणे म्हंजे साक्षात मेनकेला विश्‍वामित्राने पायघोळ अनारकली ड्रेस गिफ्ट देण्यापैकी आहे. चिवड्यात काजू दिसल्यावर अनेकांचा जीव हरखत असेल, पण आमचा तीळ तीळ तुटतो. हो, चिवड्यात तीळ मात्र हवेत! अति चिवडा खाल्ल्याने पोट बिघडते, अशीही एक पुरातन अफवा आहे. पण चिवड्यासोबत हिर्वी मिर्ची खाल्ली तर काऽऽहीही त्रास होत नाही, असा काही अनुभविकांचे सांगणे आहे. 

चिवड्याचा घास नसतो, त्याचा बकाणा भरावा. त्यात खोबऱ्याचे तुकडे किती, शेंगदाणे आहेत की काजू, डाळं आहे की आणखी काही, तेलकट आहे की सादळलेला, चिवडा तळलेल्या पोह्यांचा आहे की भाजक्‍या...आम्हाला विचाराल, तर हे सारे फिजूल प्रश्‍न आहेत. चिवडा हा चिवडा असतो. त्याच्यासारखा भरवश्‍याचा स्नेही नाही. रात्री दीड-दोनला उठून ज्या कुण्या (झोप उडालेल्या महाभागाने) डबे धुंडाळत चिवडा खाल्ला आहे, त्यास आमच्या भावना कळतील. सेलेब्रेशनमध्ये सर्वात पुढे, प्रवासाच्या दगदगीत सदैव गाठीशी आणि चांगलाच टिकाऊ पिंड. सातत्य, साथ आणि स्वाद ह्या तीन सकारांमुळे चिवडा सद्‌गुणी ठरतो. जीवनाच्या प्रवासात अशा संगीतसाथीहून अधिक हवे तरी काय असते?

...दिवाळी सरते. तुळशीचे लग्न लागले की खिडकीवरला कंदील त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कसाबसा तग धरतो. मग बासनात जातो. फराळाचे डबे लखलखीत घासून पुन्हा डाळ-तांदूळ किंवा बेसन पोटात भरून फडताळात बसतात. चिवड्याच्या डब्यात गाळ तेवढा उरलेला असतो. बोटाने तो चेपावा...आणि अलगद ते बोट जिभेवर ठेवावे. गवयाने एखाद्या सुंदर तिहाईनिशी ख्याल संपवावा, तश्‍शा ढंगात तो चिवड्याचा गाळ दिवाळीची तृप्ती अंगात भिनवतो. आणि जणू सांगतो :...अमा, यही तो जिंदगी है!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com