आप की खातिर! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 27 एप्रिल 2017

अशा अवस्थेत लगेहाथ रामलीला मैदानात उपोषणाला बसावे, असाही विचार मनात डोकावला. तहानभूक हरपली की उपोषणाचे काही वाटत नाही. उपोषणाचे कौतुक भरल्यापोटी बसलेल्यांना, याने की त्या नतद्रष्ट कमळवाल्यांना!! पण म्हटले आधी आम आदमीस भेटावे, त्याचे सांत्वन करावे, आणि मगच उपोषणाला बसावे!!

राजधानी दिल्लीतील आम आदमीचा पराभव, नाही म्हटले तरी आमच्या मनाला लागला. सामान्य जनतेचा हा आवाज असा अन्यायकारकरीत्या दाबला जात असल्याचे पाहून आमच्या मनाला प्रचंड यातना झाल्या. इतक्‍या की आमची तहानभूक हरपली.

अशा अवस्थेत लगेहाथ रामलीला मैदानात उपोषणाला बसावे, असाही विचार मनात डोकावला. तहानभूक हरपली की उपोषणाचे काही वाटत नाही. उपोषणाचे कौतुक भरल्यापोटी बसलेल्यांना, याने की त्या नतद्रष्ट कमळवाल्यांना!! पण म्हटले आधी आम आदमीस भेटावे, त्याचे सांत्वन करावे, आणि मगच उपोषणाला बसावे!! 

दिल्लीत समोसे फार ए-वन मिळतात. पण त्यांच्या मोहक दर्वळाकडे दुर्लक्ष करून आम्ही अखेर आम आदमीच्या बंगल्यावर गेलो. बंगल्याच्या बाहेर सुरक्षारक्षकांना मीडियावाले अडवत होते. एक मीडियावाला सुरक्षारक्षकांना 'अंदर नहीं जानेका' असे दटावत होता. सुरक्षारक्षक गयावया करत होता. आम्ही मीडियावाल्यांकडे बघून मखलाशीने हसलो. त्याला पिशवीतले कमळ दाखवले. मग त्याने आमच्याकडे साफ दुर्लक्ष केले. आम्ही आत सटकलो. 

तिथे आम आदमी एकटाच टीव्हीसमोर बसला होता. 

''हल्ली मफलर सोडला वाटतं!,'' आम्ही. 

''हंऽऽ...कुछ लोगे?'' आम आदमी न खोकता म्हणाला. हल्ली आम आदमीचा खोकला बरा झाला आहे. त्यामुळे गळ्याभोवतीचा मफलरही गेला असावा किंवा मफलरची फ्याशन औटॉफडेट झाली असावी. गेले ते मफलर आणि गेले ते मफलरवाले...मनात छगनबाप्पा भुजबळांच्या आठवणीने कढ आला. तेही आमचे मित्रच. असो. समोर परातभर समोसे आले. 

''लिजिए...समोसे खाइए!'' आम आदमीने एक समोसा उचलला. आमच्या तोंडाजवळ आणल्यासारखा करून पटकन स्वत:च्या तोंडात कोंबला. हाहा!! खोकला पसार झाल्यानंतर आम आदमीने समोश्‍यांचा सपाटा लावला आहे, ही बातमी इथे कन्फर्म झाली.

गेल्या काही महिन्यांत आम आदमीने समोश्‍याचे दीड कोटी रुपयांचे बिल केले आहे, ह्यावर आमचा प्रारंभी विश्‍वास नव्हता. तेरा हजारांची थाळी आणि कोटभराचे सामोसे ह्या किरकोळ शरीरयष्टीच्या आम आदमीच्या पोटात सामावले आहेत, ह्यावर आमचा विश्‍वास बसेना. एक कोटीत किती समोसे येतात अं? 

''तुम्हाला समोसे फार आवडतात असं दिसतं! हहह!!,'' आम्ही केविलवाणे हसत म्हणालो. 

''छे, मी पथ्यावर आहे! डॉक्‍टरांच्या सल्ल्याबाहेर आपण जात नाही! कॉय? उगॉफ्राब्रुफ्रीक नॉकजुभ्रील नाही..!!,'' आम आदमीने खुलासा केला. शेवटचे शब्द समोश्‍याबरोबर गिळले गेले, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. असो, असो. 

''पथ्य?'' आम्ही किंचाळलो. 

''माझं पडजीभेचं आप्रेशन झालं तेव्हाच डॉक्‍टरांनी रोज सामोसे आणि कोल्ड ड्रिंक घेतलं नाहीतर पुन्हा पडजीभ वाढेल, असं सांगितलं होतं. दिल्लीकरांच्या हितासाठी मला खावे लागतात!!,'' आम आदमीने सांगितले. केवढा हा त्याग! केवढी ही लोकशाहीवरील निस्सीम श्रद्धा! 

''तुम्ही दिल्लीकरांसाठी एवढं करता, पण त्याचं चीज झालं नाही...,'' आम्ही. 

''चीझ पिझ्झाही मला खावा लागतो!,'' आम आदमी घाईघाईने म्हणाला. 

''गाडीवरचा लाल दिवा काढणारे पहिले तुम्ही. लोकांसाठी बंगला नाकारणारे पहिले तुम्ही!! भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे पहिले तुम्ही. वीजबिल निम्मे कापणारे पहिले तुम्ही. इतकं असूनही दिल्लीकरांनी तुम्हाला हरवलं. कृतघ्न लेकाचे!,'' सात्विक संतापाने आम्ही म्हणालो. 

''कोणी हरवलं?'' आम आदमीची नजर एव्हाना पुढच्या समोश्‍याकडे गेली होती. 

''लोकांनी!'' आम्ही. 

''कोणाला?'' आम आदमी. 

''तुम्हाला! दिल्ली नगर निगमच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचा बॅंड नाही का वाजला? कमळवाल्यांनी-'' खरं तर आम्ही च्याटंच्याट पडलो होतो. 

''हॅ:...ते ना? आम्ही कुठे हरलो? इव्हीएम घोटाळा आहे तो! त्यात हारण्याचा सवालच कुठे येतो?... ए, समोसे आणा रे!!'' एवढे बोलून आम आदमीने पुढल्या समोश्‍यांची ऑर्डर दिली. हताश होत्साते आम्ही तिथून निघालो. 

...उपोषणाचा बेत रहीत करून आम्ही एक प्लेट समोसा मागवला आहे.

Web Title: Dhing Tang by British Nandi