ला साबादेना : एक कावा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 1 मे 2017

...हल्ली बिल्डर लोक काय काय ऑफर देतात. बेडरुमला एसी, सैपाकघरात फ्रिज, ग्यास, ओव्हन, एक ऍक्‍टिव्हा स्कूटर किंवा नॅनो अशाही सुविधा देतात. एका बिल्डरने तर फ्लॅट बुक केल्यास लग्न लावून देऊ, असेही सांगितले. पण ही ऑफर नसून धमकी आहे, असे वाटून अनेक अविवाहितांनी काढता पाय घेतला.

मेसर्स सोमाजी गोम्स कंस्ट्रक्‍शन्स प्रा. लि. 
'वेगन वर्ल्ड', तळमजला (जुना गोरक्षकरवाडा) 
बिबवेवाडीपासून अवघ्या साडेतीन तासावर, 
पुणे 

विषय : 'कळतात बरे हे कावे!' ऊर्फ बिल्डरांच्या ऑफर्स. 
 

जय महाराष्ट्र. आपण बांधत असलेल्या 'ला साबादेना' नावाच्या चाळीस मजली टॉवरमध्ये बुकिंग सुरू झाले असून, महाराष्ट्र दिनी बुकिंग करणाऱ्याला एक मारुती ब्रेझा (डिझेल), सिंगापूर ट्रिप (दोघांसाठी) आणि एक गोल्ड कॉइन (एक) असे भेट देणार असल्याचे पेपरमधल्या जाहिरातीत वाचले. वाचून आनंद झाला. लगेच निघणार होतो, पण 'चेकबुक घेऊनच या' हे जाहिरातीतले वाक्‍य खटकले. थांबलो, आणि कुठलाही पुणेकर जे करतो ते केले. पत्र लिहायला घेतले! 

आपल्या टॉवरमध्ये जळीतप्रूफ लिफ्ट असून दिवाणखान्यात इटालियन मार्बल, खिडक्‍यांना मच्छरजाळी आणि कपडे वाळत घालायला स्वतंत्र तारा बांधून देण्याची आपण दिलेली हमी स्तुत्य आहे. इटालियन मार्बल कोणीही देते, पण तारा? नाव सोडा!! हल्ली कपडे वाळत कुठे घालावेत, हा प्रश्‍न बऱ्याच लोकांना सतावत असतो. आमच्या ओळखीचा एक गृहस्थ ओल्या कपड्यांचे पिळे प्लास्टिकच्या पिशवीतून दररोज हपिसात घेऊन जातो व तेथील गच्चीत सुकवून संध्याकाळी घरी आणतो.

सदर गृहस्थाची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडे केली असता 'मीसुद्धा तिथेच कपडे सुकवतो' असे त्यांनी सांगितल्याने तक्रारदाराने नोकरी आणि आंघोळ एकाच दिवशी सोडल्याचे ऐकिवात आहे. खरे खोटे माहीत नाही. ज्याप्रमाणे कोकिळ पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालून जातो, त्याप्रमाणे शेजारच्यांच्या तारेवर आपले कपडे सुकविणाऱ्यांचेही प्रमाण सोसायट्यांमध्ये वाढीस लागल्याचे समजते. अशा परिस्थितीत आपण कपडे वाळत घालायच्या तारा पुरवत आहात, ही निश्‍चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. 

महाराष्ट्र दिनाच्या पवित्र दिवशी 'ला साबादेना'मध्ये फ्लॅट बुक करणाऱ्याला हेलिकॉप्टरमधून चक्‍कर मारून आणण्याची तुमची ऑफरसुद्धा मस्तच आहे. गेल्या पाडव्याला आमचे एक शेजारी वसईला फ्लॅट बघायला गेले होते. हेलिकॉप्टरने वर आभाळात नेल्यावर बिल्डरने त्यांच्याकडून चेक काढून घेतले. 'बऱ्या बोलाने सह्या केल्या नाहीत, तर खाली बघा!' असे त्याने (वर) सांगितले. अधिक वर जाणे सदर शेजाऱ्याला अधिक जवळचे गेले असते. कारण तो आभाळात बराच वर गेला होता! परिणामी, शेजारी गेल्या अक्षय तृतीयेला वसईला राहायला गेले. (अंघोळीला) दर रविवारी आमच्याकडे येतात. असो. 

...हल्ली बिल्डर लोक काय काय ऑफर देतात. बेडरुमला एसी, सैपाकघरात फ्रिज, ग्यास, ओव्हन, एक ऍक्‍टिव्हा स्कूटर किंवा नॅनो अशाही सुविधा देतात. एका बिल्डरने तर फ्लॅट बुक केल्यास लग्न लावून देऊ, असेही सांगितले. पण ही ऑफर नसून धमकी आहे, असे वाटून अनेक अविवाहितांनी काढता पाय घेतला. आपणही अशा काही सुविधा देणार आहात का? सावध राहावे!! 

आता मुद्यावर येऊ! 'ला साबादेना' ह्या आपल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना जागा नाकारण्यात येते, अशी तक्रार आमच्या कानावर आली आहे. हे खरे असेल, तर आपले काही खरे नाही, हे बरे जाणून असा. हा सरळ सरळ मराठी माणसाला हद्दपार करण्याचा कट आहे, हे न कळण्याइतके आम्ही दूधखुळे नाही. किंबहुना आपण मोठ्या हुशारीने आपल्या गृहसंकुलाचे नाव 'ला साबादेना' असे ठेवले आहे. प्रथमदर्शनी ते फ्रेंच वाटत असले तरी वस्तुत: ते 'साबूदाणा' असे आहे, असे आम्हाला एका इटालियन माणसाने सांगितले आहे. खरे खोटे ठाऊक नाही; पण तसे ते असावे, असा आमचा वहीम आहे. असले प्रकार करणार असाल, तर तुम्ही जे काही करता तेच घर-इच्छुक मराठी लोक करतील. आम्ही कांदाही खात नाही, असे सांगून फ्लॅट घेतील, आणि पझेशननंतर तुमच्या वरील पत्त्याच्या दारात कोळंबी, अंडी ह्यांची साले आणि अन्य उर्वरित मजकूर आणून टाकतील. तेव्हा सावध!

कळावे.

आपला

Web Title: Dhing Tang by British Nandi