ब्रूटसचा खंजीर! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 9 मे 2017

पॉम्पी सभागाराच्या थंडगार 
फरसबंद पटांगणातच 
सम्राट ज्युलियस सीझरवर 
कोसळले तलवारीचे घाव... 
कास्काचे खड्‌ग घुसले 
आरपार त्याच्या छाताडात, 
पाठोपाठ झाले अन्योन्यांचे वार... 

पॉम्पी सभागाराच्या थंडगार 
फरसबंद पटांगणातच 
सम्राट ज्युलियस सीझरवर 
कोसळले तलवारीचे घाव... 
कास्काचे खड्‌ग घुसले 
आरपार त्याच्या छाताडात, 
पाठोपाठ झाले अन्योन्यांचे वार... 

कटवाल्यांच्या कोंडाळ्यात 
मरणथक्‍क झालेल्या घायाळ 
सीझरच्या शरीरात तरीही 
उरले होते काहीतरी सजीव, 
अंत:करणाजोगे चिवट. 
तेवढ्यात- 
पाठीत झाली प्राणांतिक जळजळ 
तुटकेफुटके जे काही होते, उरले सुरले, 
ते पाठीतून घुसलेल्या घातकी पात्यासोबत 
छाताड फोडून बाहेरच आले! 
कोसळताना सीझर म्हणाला, 
''मित्रा, कां केलेस असे? 
पंधरा वर्षांच्या आपल्या 
लोककल्याणाचा लढा 
असा एका घावात संपवलास? 
रोमन रयतेच्या खुशहालीसाठी 
घेतलेल्या आणाभाका, त्या विसरलास? 
तूच मला तुझा राजा मानले होतेस, 
मीच तुझा सखा होतो ना? 
अन्योन्यांच्या विश्‍वासघाताची 
ना मला पत्रास, ना चिंता. 
राजकारणाच्या निरर्गल आरोपांच्या 
शिंतोड्यांची ना मला पर्वा, 
कारण मीही बाळगत आलो, 
काळ्या शाईच्या काही कुप्या, 
आणि झाडल्या आरोपांच्या फैरी. 
परक्‍यांच्या कटकारस्थानांचे 
ह्या सीझरला काहीच वाटत नाही, मित्रा, 
पण जे स्फोटक अस्त्र शत्रूवर बरसायचे, 
ते आपल्याच छावणीत 
का असे फोडलेस? 
अन्योन्य राहोत दूर, 
पण ब्रूटस? तू? तू सुद्धा? 
मग तर ह्या सीझरला मरायलाच हवे!'' 

सीझरच्या निश्‍चेष्ट शवाशेजारीच 
उभा राहून ओरडला ब्रूटस तेव्हा- 
''होय, माझ्या रोमवासीयांनो, 
मी ह्या सीझरला मारले... 
कारण माझे सीझरवर प्रेम होते, 
त्यापेक्षाही कैकपट अधिक 
ह्या रोमन साम्राज्यावर आहे, 
सत्य आणि नीतिमत्तेवर आहे! 
सीझरच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा 
अंत करण्याची जबाबदारी 
नियतीनेच सोपवली माझ्यावर. 
लोककल्याणाच्या बाता करताना 
सीझरने माझ्या डोळ्यांदेखत 
घेतली दोन कोटींची लाच, 
भ्रष्ट मंत्र्यांना घातले खुशाल पाठीशी, 
केले मनमुराद आविष्कार 
शहाजोग धुवट नौटंकीचे. 
गोरगरिबांसाठी ढाळले नक्राश्रू. 
त्याला प्यार होती फक्‍त 
अनिर्बंध सत्ता, सत्ता, सत्ता!'' 
म्हणून मी मारले सीझरला... 
यट, धिस ब्रूटस इज ऍन ऑनरेबल मॅन! 

सीझरच्या निर्जीव पाठीतील 
तो कुप्रसिद्ध खंजीर 
उपसून काढत मार्क अँटनीने 
घेतला साळसूद काढता पाय... 
तेव्हापासून तो खंजीर 
गायब आहे, शतकानुशतके... 
फक्‍त देतो अस्तित्वाचे 
काही पुरावे अधूनमधून. 
...कधी गल्लीत, कधी दिल्लीत.

Web Title: Dhing Tang by British Nandi