गुरुदक्षिणा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 11 जुलै 2017

आषाढपौर्णिमेचा पवित्र दिवस होता. मातोश्रीगडाच्या आश्रमातील वातावरण अतिशय मंगलमय होते. सर्वत्र टूथपेष्ट आणि धूपाचा गंध दर्वळत होता. शहनाईचे सूर घुमत होते. गुरूचे घर हे तर मंदिर. त्यातून आज गुरुपौर्णिमा! गुरूला वंदन करून त्याला अल्पशी गुरुदक्षिणा देण्याची आपल्याकडे उदात्त प्रथा आहेच. गुरुवर्य तर आज पहाटेच उठून बसले होते. उठल्या उठल्या त्यांनी आपल्या पट्‌टशिष्यास-जो त्यांचा पुत्रदेखील होता- आंघोळीस पिटाळिले होते. मठाच्या अंगणात भलाथोरला मांडव घातला होता.

त्यांचा विश्‍वासू सेवक व लेखनिक मिलिंदस्वामी स्वहस्ते खुर्च्या मांडत होता. 

आषाढपौर्णिमेचा पवित्र दिवस होता. मातोश्रीगडाच्या आश्रमातील वातावरण अतिशय मंगलमय होते. सर्वत्र टूथपेष्ट आणि धूपाचा गंध दर्वळत होता. शहनाईचे सूर घुमत होते. गुरूचे घर हे तर मंदिर. त्यातून आज गुरुपौर्णिमा! गुरूला वंदन करून त्याला अल्पशी गुरुदक्षिणा देण्याची आपल्याकडे उदात्त प्रथा आहेच. गुरुवर्य तर आज पहाटेच उठून बसले होते. उठल्या उठल्या त्यांनी आपल्या पट्‌टशिष्यास-जो त्यांचा पुत्रदेखील होता- आंघोळीस पिटाळिले होते. मठाच्या अंगणात भलाथोरला मांडव घातला होता.

त्यांचा विश्‍वासू सेवक व लेखनिक मिलिंदस्वामी स्वहस्ते खुर्च्या मांडत होता. 

''कोण कोण आलंय?'' आतील खोलीतून अधीर स्वरात गुरूंनी विचारले. 
''खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत, साहेब! येतील आपली मंडळी इतक्‍यात...,''

मिलिंदस्वामी घडीच्या खुर्च्या मांडून ठेवण्यात बिझी होते. दहा रुपये भाड्याने सध्या पाश्‍शे खुर्च्या आणल्या आहेत. खुर्चीमागे शंभर रुपये निघाले, तरच गुरुपौर्णिमा प्रॉफिटमध्ये जाईल...स्वामींनी मनातल्या मनात हिशेबदेखील मांडला. 

''अरे, गाढवा, आज गुरुपौर्णिमा. आमचा आशीर्वाद घेण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून मावळे येतात! गर्दीचा मेळ घालावयास हवा की नको, अं?!,''

अंत:करणातून उमटल्यासारखा गुरुवर्यांचा आवाज आला. अंत:करणातून उमटलेला आवाज हा सर्दी झालेल्या माणसासारखा असतो, ह्याची मिलिंदस्वामींनी नोंद घेतली. आज रात्री गुरुवर्यांना तुळशीचा काढा द्यायला हवा, असा विचार त्यांच्या मनीं काढ्यासारखा उकळू लागला. 

''माहीत आहे, साहेब! दरवर्षी इथं, जो तो आपला हात शिरावर घेण्यासाठी धडपडत असतो! कधी एकदा साहेबांचा आशीर्वाद घेतो, असं साऱ्यांना होतं!,'' मिलिंदस्वामींनी एक खुर्ची उघडून मांडत विनयाने सांगितले. 

''मग नालायका, मघापासून तुला कोणी रोखलं आहे?'' अंत:करणातील आवाज तिखट झाला होता. 

''माझ्यासाठी तर रोजच गुरुपौर्णिमा असते, साहेब! आय मीन...माझा मुजरा का कधी चुकलाय?,'' 'राजाला रोजच दिवाळी असते', ह्या चालीवर स्वामी म्हणाले. 

''भलताच चतुर आहेस! बोलती बंद करण्यात हार जाणार नाहीस मिलिंदा तू!,'' गुरूंनी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत दाद दिली. 

''अजून कुणीही कसे आले नाहीत, साहेब? तुम्ही त्यांना मोहिमेवर तर पाठवले नाही ना?'' मिलिंदस्वामींनी काळजीयुक्‍त आवाजात विचारले. एव्हाना मातोश्रीमठावर केवढी गर्दी उसळत्ये. मागल्या खेपेला खुद्‌द मिलिंदस्वामींना फुलांच्या ढिगाऱ्यातून वाट काढत वर यावे लागले होते. स्वत: गुरुवर्यांना गुरुदक्षिणेच्या भेटवस्तू एकमेकांवर रचून त्यायोगे पहिल्या मजल्याच्या ग्यालरीत जावे लागले होते. 

''आम्ही कशाला त्यांना मोहिमेवर पाठवू? किती खुर्च्या भरल्या आहेत?,'' विचारात पडलेल्या गुरुवर्यांनी विचारले. 

''पाश्‍शे सांगितल्या होत्या. मागल्या रांगेतल्या पाच खुर्च्या भरल्या आहेत!,'' मिलिंदस्वामींनी माहिती दिली. 

''पाच तर पाच...त्यांना पाठव आत नमस्काराला!,'' घाईघाईने गुरुवर्य म्हणाले. 

''पाचही जण आपल्याच घरचे दिसताहेत, साहेब!'' मिलिंदस्वामींनी खुलासा केला.  ''आत्ताच्या आत्ता सगळ्या खुर्च्या परत करून ये. नसतं भाडं कोण भरत बसेल? खुर्चीमागे दहा रुपये म्हंजे गंमत आहे का?'' गुरुवर्यांचा आवाज अंत:करण फाटल्यावर येतो, तसा येत होता. 

''खुर्चीवाल्यानी आडव्हान्स घेऊन ठेवलाय, साहेब!'' मिलिंदस्वामींनी अडचण सांगितली. एक खुर्ची आपण आडवू शकतो; पण उरलेल्या चारशेनव्याण्णव खुर्च्यांचे करायचे काय? ही भलतीच आफत आली!! 

''असू दे. असू दे. गुरुदक्षिणेच्या दानपेटीत किती निधी जमा झालाय?,'' गुरुवर्यांनी अखेर न राहवून विचारलेच. 

''दानपेटीत? अंऽऽऽ....बारा...बारा रुपये निघाले साहेब!,'' दानपेटी उघडत मिलिंदस्वामी म्हणाले. त्यांचा आवाज दानपेटीइतकाच रिकामा होता; पण त्याने उच्चारलेल्या आकड्याने गुरुवर्यांचे भान हरपले. संतापाची एक डरकाळी आसमंतात घुमली.

हातातील झेंडूची फुले भिरकावून देत गुरुवर्य ओरडले- 
''च्यामारी, ह्या कमळवाल्यांच्याऽऽऽ...तरी सांगत होतो, नोटाबंदी करू नका, नोटाबंदी करू नका..!! हा घ्या पुरावा, नोटाबंदी फसल्याचा! घ्या आता!! ***!!!''

Web Title: Dhing Tang by British Nandi