अजब तुझे सरकार! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 26 जुलै 2017

'लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी सरकार....अजब तुझे सरकार, उद्धवाऽऽऽ...'' हे गाणे आमच्या कानावर पडले. पाहतो तो काय! खुद्द उधोजीसाहेब खुशीत गीत गुणगुणत होते. आम्ही च्याटंच्याट पडलो. 

काळ अगदी थोडा उरला आहे. अगदी थोडा! अगदी थोडीशी कळ सोसा... आपल्या महाराष्ट्रात किनई लौकरच अजब सरकार येणार आहे. अ-ज-ब सरकार! नाही, नाही, तुम्हाला काय वाटलं अजबबाबू शॉरकार नावाचे हे बंगाली मोशाय आहेत? नॉई नॉई!! अजब सरकार म्हंजे अ-ज-ब सरकार... नाही कळले? छे बुवा, अगदीच तुम्ही 'हे' आहा!! 

जब जब फूल खिले, जब कोई बात बिगड जाये, किंवा जब तक है जान, ह्यामधला 'जब' तुम्हाला ठाऊक असेल. हो ना? असणारच, असणारच. फारच पिच्चर बघता तुम्ही हं. चांगलं नै. त्यातला 'जब'चा अर्थ 'जेव्हा' असा होतो. जेव्हा जेव्हा फूल फुलेल, जेव्हा एखादा लोच्या होईल, किंवा जेव्हापर्यंत जिवात जीव आहे...अशा अर्थाने तो घ्यायचा असतो. काय? अजब म्हंजे अ-जेव्हा? काय हे?...कित्ती पुव्वर मराठी तुमचं? अजेव्हा असा मराठीत शब्द तरी आहे का? कमाल आहे बुवा तुमची... 

सांगायचा मुद्दा एवढाच की अगदी थोड्या काळातच आपल्याकडे अजब सरकार येणार आहे. हे अजब सरकार म्हंजे तुम्ही म्हणता त्या अर्थाने अजब असणार नाही. त्या दृष्टीने आताचे कमळाचे सरकार अजब आहे. तुम्ही म्हणाल की बुवा, हा काय अजब प्रकार? तर ह्यात काहीही अजब नाही. तुम्हाला अजब ह्या शब्दाचा धड अर्थच माहीत नसल्याने असे होते आहे. आताचे सरकार हे फार्तर गजब सरकार म्हणता येईल. पण हे गजब सरकार लौकरच आपले चंबूगबाळे उचलून पोबारा करणार आहे. त्यांच्या जागी अजब सरकार येणार आहे. 

हे अजब सरकार कुणाचे असेल? कुणाचे? कुणाचे? कुणाचे? 

उधोजीसाहेबांचे! उधोजीसाहेबांचे! उधोजीसाहेबांचे! 

आम्ही स्वत: त्यांची म्यारेथॉन मुलाखत घेतली. जी तीन दिवस आणि तीन रात्री चालली. मंगळवारी पहाट फुटेपर्यंत मुलाखतीचा शेवट आला. पहाटेला उगवतीवर भगव्या रंगाची उधळण होण्यास काही अवकाश होता. आम्ही आणि तारका मंद झाल्या होत्या. त्या झुंजुमुंजुच्या क्षणी आम्ही थेट प्रश्‍न विचारला. : साहेब तुमचे अजब सरकार कधी येणार? 

ते बाणेदारपणाने ताडकन उत्तरले, ''येणार, अलबत्ता लौकरच येणार!! '' 
''पण कऽऽधीऽऽऽ...'' आम्ही उतावळेपणाने पुन्हा विचारले. 

''सध्या जे वातावरण आहे, ते पाहता उदईक यावयाचे, ते आमचे अजब सरकार आजच येणार, असे दिसते!'' उगवतीकडे नजर टाकत साहेब म्हणाले. टक लावून भगवी किरणे ते शोधत राहिले. बाहेरील मिट्‌ट काळोख पाहून 'अजून उजाडायचे आहे, वाटतं...'असे स्वत:शीच पुटपुटले. 

''ती मावळती आहे, साहेब...पूर्व दिशा ह्या इथे आहे...'' आम्ही नम्रपणे त्यांचा मोहरा वळवला. 

''बरं, बरं! मनात आणू तर आम्ही पश्‍चिमेला सूर्य उगवून दाखवू!,'' साहेब डरकाळले. 
हे मात्र सौफीसदी खरे होते. (शतप्रतिशत हा शब्द आम्ही मनातल्या मनातदेखील टाळला! असो.) उद्धवा, तुझे अजब सरकार कधी येणार? त्यासाठी आम्ही ढोल-ताशे रेडी ठेवले असून ढोल फुटेपर्यंत आम्ही दणदणाट करावयास तय्यार आहोत. सबब तुमचे अजब सरकार आता झडकरी येऊ दे...अशा आशयाची आरती आम्ही रचावयास घेणार होतो. पण तेवढ्यात- 

'लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी सरकार....अजब तुझे सरकार, उद्धवाऽऽऽ...'' हे गाणे आमच्या कानावर पडले. पाहतो तो काय! खुद्द उधोजीसाहेब खुशीत गीत गुणगुणत होते. आम्ही च्याटंच्याट पडलो. 
''तुम्ही आताच तुमचे अजब सरकार का आणत नाही, साहेब?'' आम्ही निकराला पडून सवाल विचारला. आमच्या तीन दिवस तीन रात्री चाललेल्या म्यारेथॉन मुलाखतीचा हा शेवटचा सवाल होता. 

त्यावर साहेब अर्थपूर्ण मुस्करले. मग हसले. मग ठसकले. मग आमच्या खांद्यावर थोपटत म्हणाले- 

''आज करै सो कल कर, 
कल करै सो परसो, 
इतनी भी क्‍या जल्दी है, 
जब जीना है बरसो?'' 

...उपरोक्‍त दोह्यातील 'जब' देखील 'अजब'मध्ये समाविष्ट आहे, ह्याची कृपया नोंद घ्यावी. इति.

Web Title: Dhing Tang by British Nandi