‘डॉ. हो’! (एक जेम्स बाँड कथा...)

‘डॉ. हो’! (एक जेम्स बाँड कथा...)
‘डॉ. हो’! (एक जेम्स बाँड कथा...)

सुटीवर गेलेल्या ००७ ऊर्फ जेम्स बाँडला मि. एम ह्यांनी अचानक बोलावून घेतले. आपले लाडके वाल्थर पीपीके पिस्तुल कोटाच्या चोरखिश्‍यात लपवून बाँड तातडीने ‘एमआय-५’ ह्या सुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेच्या हपिसात पोचला. मि. एम फार चिंतेत होते. जगावर काहीही संकट आले की ते पहिले चिंतेत जातात, मग ००७ला बोलावून कामगिरीवर पाठवून कानकोरणे उचलतात. संकट आपोआप मिटते, असं गेली कैक दशके सुरू आहे. ‘‘इंडियन गवर्न्मेटकडून विशेष रिक्‍वेस्ट आली आहे. त्यांचा एक महत्त्वाचा माणूस गायब झाला आहे. तो कुठे गेलाय, हे शोधून काढायला हवं,’’ ते म्हणाले.

‘‘विजयशेठ मल्ल्या असेल तर आत्ताच मी गोल्फ क्‍लबवर त्याच्याशी दोन राऊण्ड खेळून आलोय! त्यानं साधं वेषांतरसुद्धा केलेलं नाही. तरीही लोक त्याला ओळखत नाहीत.’’ बाँड शांतपणे म्हणाला. 

‘‘तो महत्त्वाचा माणूस नाहीए. ही गायब झालेली व्यक्‍ती भयंकर पॉवरफुल आहे. ‘डॉ. हो’ असं त्यांना संबोधलं जातं!’’ मि. एम म्हणाले.

‘’डॉ. नोसारखे डॉ. हो?’’ बाँडने आश्‍चर्याने विचारले.

‘‘हो!’’ मि. एम ह्यांनी नाव उच्चारताच त्यांच्यासमोरील काचेवर वाफ धरली. ते पुढे म्हणाले, ‘‘इंडियामध्ये महाराष्ट्रा नावाचं स्टेट आहे, ही व्यक्‍ती तिथून गायब झाली आहे. ती लंडनमध्ये असावी, असा वहीम आहे. अर्थात, हा मनुष्य ब्रिटनसाठीही इंपॉर्टंट आहे. तो सापडला तर ब्रिटिश गव्हर्नमेंटलाही युरोपीय युनियनशी फारकत घेणं, म्हंजे ‘ब्रेग्झिट’ सोपं जाईल. काहीही कर, पण त्या व्यक्‍तीला शोधून काढ. बारा मुल्कों की पुलिस उन्हे ढूंढ रही है...वी शुड बी फर्स्ट!’’ मि. एम निर्वाणीचं म्हणाले. बाँड मुस्करला. मि. एमची सेक्रेटरी मिस मनीपेनीशी थोडेसे लगट करून तो तडक निघाला. त्याच्या घड्याळात फॅक्‍स यंत्र असल्याने त्याने सदर ‘मोस्ट वाँटेड’ व्यक्‍तीचा फोटो मागवला. होनोलुलू किंवा हॅवाना इथे ही व्यक्‍ती सापडेल का? ह्याचा त्याने साडेतीन सेकंद विचार केला. त्याने वर्णन वाचले : गौरवर्ण, बऱ्यापैकी हाइट, नाकावर चष्मा आणि नाकाखाली मिशी. सतत एका हाताची मूठ वळून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देण्याची सवय. गळ्यात एक अत्याधुनिक इन्फ्रारेड क्‍यामेरा. जंगली प्राण्यांचे फोटो काढण्याची सवय. जंगली प्राणी उपलब्ध नसले तर झाडाझुडपांचे फोटो काढण्याचा आग्रह...

सदर व्यक्‍ती अलास्कापासून अक्‍कलकोटपर्यंत कुठेही आढळू शकते, हे लक्षात आल्याने बाँड हादरला. जावे कुठे? लंडनच्या हाइड पार्कमध्ये हिंडत असताना बाँडला एक सुंदर युवती भेटली. (खुलासा : कामगिरी सुरू झाल्यावर सहाव्या मिनिटाला एखादी युवती भेटली नाही तर बाँड कामगिरी सोडतो!) तिच्याशी उल्लूमशालगिरी करण्यात त्याने पुढली आठ मिनिटे घालवली.

‘‘माय नेम इज बाँड...जेम्स बाँड!’’ त्याने जाहीर केले.

‘‘ओह...झीरोझीरोसेवन!! मी तुझीच वाट पाहात होते! इथं काय करतोयस? बाय द वे, माझं नाव कॅमलिनी!’’ ओठांचा चंबू आणि देहाच्या अन्य भागांचे तांब्या, भांडी, वाट्या, सूप असे काही काही करत ती म्हणाली. बाँडने हातातला फोटो दाखवला.
‘‘ओह...तुला ‘डॉ. हो’ना भेटायचंय असं सांग की!’’ कॅमलिनी हसून म्हणाली.

‘‘माझ्या मधा, तू कशी त्यांना ओळखतेस?’’ बाँडने जाळे टाकले.
‘‘ते तुमचे ‘हो’ असले, तरी आमचे ‘अहो’ आहेत बरं का?’’ कॅमलिनी लाजून म्हणाली.
‘‘त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला मदत कर. मला अंतराळयान, पाणबुडीपासून हेलिकॉप्टर आणि ॲक्‍टिवापर्यंत काहीही चालवता येतं. कुठं आणि कसं जाऊ या?’’ बाँड अधीर झाला होता.

‘‘डॉ. होंना भेटण्याची इतकी घाई? त्याच्यासाठी कुठे कशाला जायला हवं?’’ कॅमलिनीनं नाक फेंदारून म्हटले, ‘‘ह्या हाइड पार्कमध्येच ते झाडाबिडांचे फोटो काढत हिंडतायत. शोध तुझा तूच! मी त्या वडाच्या झाडाकडे चालले आहे. आज वटपौर्णिमा आहे नं? हुहुहु!!’’

...खांदे पाडून बाँड परत निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com