जपानी जादू! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सदरील मजकूर आम्ही जापानमधील कोबे रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये बसून लिहीत आहो! नुकताच आम्ही टोक्‍यो ते कोबे असा बुलेट प्रवास केला असल्याने आमचे डोकीवरचे सर्व केस मोरीच्या ब्रशासारखे उभेच्या उभे आहेत. साकेची आख्खी बाटली आदल्या रात्री घशात गेल्याप्रमाणे डोळे तांबडेलाल झाले आहेत. (अज्ञांसाठी खुलासा : साके, जपानी देशी पेय..."देशी' म्हटल्यावर तुम्हाला कळेल. कळणारच! असो.) हे सारे श्रीमान रा. रा. नमोजीसान ह्यांच्या हट्‌टामुळे घडले. जप्पानचे मोदी जे की रा. शिंझो आबे ह्यांच्यासमवेत टोक्‍यो ते कोबे हा पावणेतीन तासाचा बुलेट प्रवास करण्याचा हट्‌ट नमोजीसान ह्यांनी धरला. त्यांचा फर्जंद म्हणून आम्हीही गाडीत चढलो, आणि हे नशिबी आले...
""चलो, आपडे बुलेट ट्रेनमां थी कोबे जईये'' असा हट्‌ट त्यांनी शिंझोसान ह्यांच्याकडे धरला. समोर येईल, त्याला मान तुकविणे, हा जपानधर्म आहे. (अज्ञांसाठी खुलासा : महाराष्ट्रधर्म असतो, तसाच एक जपानधर्मही असतो. असो.) बुलेट ट्रेनने जाण्याचे ठरल्यावर नमोजीसान ह्यांनी तत्काळ आमच्या पुढ्यात हात पसरला. आम्ही सवयीने इकडे तिकडे पाहत होतो. बिल देण्याच्या वेळी हात धुवायला जाण्यात आमचा हातखंडा आहे, पण येथे नमोजीसान ह्यांना आम्हाला हुकवता आले नाही. तिकिटाची रक्‍कम ऐकून आमच्या अंगावर साकुरा फुलला!! (अ. खु. : महाराष्ट्रात अंगावर काटा येतो, जपानमध्ये साकुरा येतो. असो.) पावणेतीन तासाच्या प्रवासाला पंधरा हजार रुपये येन!! म्हंजे जवळपास नऊ हज्जार रुप्पय!!! येवढ्या प्रवासाला (पक्षी : मुंबई-पुणे...किंवा खरेतर पुणे-मुंबई!) महाराष्ट्रात काही शेकड्यांत काम होते. परदेशात आगाऊपणा करू नये, ह्या मराठी सुविचारानुसार आम्ही येनकेन प्रकारेण विविध खिश्‍यांतून येन काढून नमोजीसान ह्यांच्या हातावर टिकवले. प्रवास सुरू झाला...
""सीट तो सरस छे!'' बुलेट ट्रेनच्या वातानुकूलित डब्यात अचानक आमचा आवाज घुमला. एक-दोन जप्पानी महिला प्रवाश्‍यांचे आश्‍चर्योद्‌गार निघाले. सोबत असलेल्या शिंझोसान ह्यांनी त्याचे भाषांतर करून "त्या जपानी महिला "शटाप' असे म्हणाल्याचे सांगितले. आम्ही गाडीतील सिटांबद्दल बोलत होतो, असे आम्ही गुळमुळीत सुरात सांगितले. बाय द वे, शिंझोसान ह्यांना आम्ही शिंझोसान असेच म्हणतो. त्यांचे आडनाव "अबे' असे वऱ्हाडी धाटणीचे असल्याने सुरवातीला आमचा गैरसमज झाला. त्यांनी नाव सांगितल्यावर आम्ही अनवधानाने "" धंतोलीचा का बे?' असे विचारून बसलो. असो.
...अशाच धर्तीची बुलेट ट्रेन अहमदावाद थी बोम्बे आणण्याचा नमोजीसान ह्यांचा इरादा आहे. त्यांनी तो जपानमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच (विमानातच) आम्हाला बोलून दाखवला होता. नमोजीसान ह्यांचे आम्ही एक पाहून ठेवले आहे. गृहस्थ वरून शांत दिसला तरी मनात फार खदखदत असतो. सर्जिकल स्ट्राइक, बुलेट असले शब्द आले की नमोजीसान ह्यांचे भान हरपत्ये. गृहस्थ एक गोष्ट नॉर्मल माणसासारखी करील, तर शप्पथ! पुन्हा असो.
जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये शेंगदाणे, कंगवे, कानातली डुले आदी माल विकत नाहीत, असे दिसले. आपल्याकडे हा बदल करता येऊ शकेल, असे आम्ही नमोजीसान ह्यांना सांगितले. ते "हो' म्हणाले. गाडीभर पसरलेल्या शांततेमुळे वेळ जाता जात नव्हता. तेवढ्यात नमोजीसान ह्यांनी "चालो, हवे आपडे रमी रमीए'' असे जाहीर केल्यावर आम्ही निमूटपणाने पत्त्यांचा क्‍याट काढून त्यांच्या हाती दिला. थोड्याफार पत्त्यांच्या जादू दाखवून झाल्यावर शिंझोसान ह्यांनी ""तुम्हाला पत्त्यांच्या जादू छान येतात हो...कम्मालच आहे'' अशा आशयाचे जपानी उद्‌गार काढले. पण तेथूनच पुढे विपरीत घडले. "जादू दाखवतो' असे सांगून नमोजीसान ह्यांनी शिंझोसान ह्यांच्याकडे "पाश्‍शे येनची नोट आहे का?' अशी विचारणा केली. त्यांनी (चतुराईने) नकार दिल्यावर आम्हाला हात खिशात घालणे भाग पडले.
....आमच्या खिश्‍यातली शेवटची नोट गायब झाली आहे. त्याचबरोबर नमोजीसानसुद्धा गायब आहेत. असो.

Web Title: dhing tang by british nandy