चिल्लरपत्रे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सन्माननीय नमोजी ह्यांस, तमाऽऽम महाराष्ट्राच्या वतीने जय महाराष्ट्र...बरं! घरातल्या नोटा बदलून घेण्याचा विचार सुरू केला होता; पण तो अमलात आणण्यात चार- पाच दिवस गेले. म्हंजे त्याचं झालं असं, की आठ तारखेला आमचे बाळाजी नांदगावकर घाम पुसत आले आणि म्हणाले, ""साहेब, हहह....जाजा...हजा...रच्या न..न...नोटा ररर...रद्‌द झाल्या हो! आता?''

प्रिय श्री. रा. रा. नमोजी ह्यांस बालके उधोजीचे लाखलाख दंडवत आणि कोटी कोटी कोपरापासून नमस्कार! आपल्या कृपेने गेले चार दिवस हातात पाश्‍शेच्या चार नोटा घेऊन बॅंकोबॅंकी हिंडलो. पायाचे तुकडे पडले. सरतेशेवटी पाच-सहा तास रांगेत उभे राहिल्यावर एका ब्यांकेत क्‍याशियरच्या खिडकीपर्यंत यशस्वी मजल मारली. खिडकीतून हात सर्कवून त्याची कॉलर धरल्यावर पाश्‍शेचे सुटे मिळाले. जे काही मिळाले त्याला सुट्‌टे म्हणणे अशक्‍य आहे. लेडीज रुमालाच्या आकाराचा आणि त्याच साधारण रंगाचा एक कागद त्याने पुढे सर्कवला. मी विचारले, ""हे काय आहे? सुट्‌टे द्या, सुट्‌टे!''
""ये दोन हजार का नया नोट हय!'' असे गुर्कावून त्याने पुढला टोकन नंबर पुकार्लासुद्धा!! रंगपंचमीच्या दिवशी नखशिखांत रंगून आलेल्या माणसाच्या खिशातून निघालेल्या गुलालमाखल्या ओल्याचिंब नोटेसारखी ही नोट दिसते. सोबत तीच दोन हजाराची नोट टाचणीने जोडून पाठवतो आहे. नोट नवी व खरी आहे, ह्याची खात्री बाळगावी. तुम्हाला प्रत्येक माणूस चोर आहे, असा संशय येतो, हे माहीत असल्याने हा खुलासा करीत आहे. सदर नोटेचे शंभर-पाश्‍शेचे सुट्‌टे हे पत्र घेऊन आलेल्या दोघांसमवेत पाठवावेत, ही विनंती. आपला कृपाभिलाषी. उधोजी.
ता. क. : हे पत्र घेऊन येणारे संजयाजी राऊत आणि अनिलाजी देसाई हे आमचे नामचीन कार्यकर्ते आहेत. विश्‍वासू आहेत. तथापि, तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून बंद पाकिटात निमंत्रण पत्रिकेच्या फोल्डमध्ये मोड घालून ते पाठवावे. माणसाचे काय सांगता येते? असो.
विनंती विशेष : एटीएममधून पैसे आले नाहीत, आणि कार्डही अडकले, असे आमच्या राजकारणाचे झाले आहे!! असो.
* * *

सन्माननीय नमोजी ह्यांस, तमाऽऽम महाराष्ट्राच्या वतीने जय महाराष्ट्र...बरं! घरातल्या नोटा बदलून घेण्याचा विचार सुरू केला होता; पण तो अमलात आणण्यात चार- पाच दिवस गेले. म्हंजे त्याचं झालं असं, की आठ तारखेला आमचे बाळाजी नांदगावकर घाम पुसत आले आणि म्हणाले, ""साहेब, हहह....जाजा...हजा...रच्या न..न...नोटा ररर...रद्‌द झाल्या हो! आता?''
""कायाय?'' असं मी त्यांच्या अंगावर ओरडलोही होतो; पण तरीही त्यांनी छातीचा कोट करून ही बातमी दिली. हातानेच त्यांना "जा' असे सांगून मी कामाला लागलो. घरी हजाराच्या दोन आणि पाश्‍शेच्या चार नोटांची क्‍याश शिल्लक होती; पण आज जाऊ, उद्या जाऊ, असं मनाशी म्हणत शेवटी काल ब्यांकेशी गेलो. पाहातो तो काय! ब्यांक बंद!! कपाळावर हात मारून परत आलो. नोटा अजून माझ्या खिश्‍यात पडून आहेत. मध्यंतरी आपण पुण्यात येऊन गेलात, हे ऐकून हळहळलो. तिथे भेटला असतात, तर तुमच्याकडून सुट्‌टे करून घेतले असते. जाऊ दे. तुमची परवानगी असेल, तर सुट्‌टे करायला ह्या नोटा फडणवीसनानांकडे पाठवू का? कळवावे. आपला. चुलतराज.
विशेष विनंती : शिवाजी पार्क एरियातील एटीएम यंत्रे कधी सुरू होणार, हे जरा कळवाल का?
* * *

डिअर उधोजी अने चुलतराजभाई, सतप्रतिसत प्रणाम! नोटबंदी जारी केल्याबराब्बर समदी पब्लिक एकदम सरळ ने सरळ आली आहेत ने? मने तो आच जोतु हतु. आ कागडाजेवी काळा पेसा आपल्या देशाची लई नुकसानी करते. नोटबंदीमाटे तुम्हाला दोघांना तकलीफ झाली हेबद्दल माफी! पण देश के लिए पच्यास दिन थोडी तकलीफ उठावीश तो अच्छे दिन दूर नथी. कछु सांभळ्यो?
एटीएम च्यालू झाला हाय, असा मला अरुणभाई जेटलीने आत्ताज सांगितला. तमे एम करो, हवे एटीएम जईने आरामथी विड्रो करो. एटीएमच्या फुलफोर्म खबर छे ने? ए कहे छे- असतील तर मिळतील! जे श्री क्रष्ण.
विनंती विशेष : उधोजीभाई तमारी नोट मळी, पण तेव्हाज मी ज्याकिट बदलल्याने माझा पाकीट घरीज ऱ्हायला. सॉरी. तमारी नोट वापिस भेज्यूं छूं. घुस्सा नथी करतो. ओक्‍के? आपडो नमोजी.
-ब्रिटिश नंदी

Web Title: dhing tang by british nandy