मांडून ठेवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांप्रतकाळी इये देशी नोटबंदी हेच एक चलनी नाणे झाले असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत शेकडो अर्थतज्ज्ञ नोटबंदीवर निव्वळ चर्चा करून चूल पेटती ठेवीत आहेत, असे आमच्या निदर्शनास आहे. पाहावे तेथे नोटबंदीवर चर्चा सुरू आहे. अतएव "नोटबंदी : शाप की वरदान?' ह्या राष्ट्रीय परिसंवादात आम्हालाही उडी घेणे भाग आहे. कां की आम्हीही एकप्रकारचे अर्थतज्ज्ञ आहोतच. उदाहरणार्थ- क्‍याशलेस अर्थव्यवस्थेचे महत्त्व जनलोकांस आत्ता कोठे पटू लागले असले तरी आम्ही मात्र गेली कित्येक वर्षे क्‍याशलेस व्यवहार करीत आलो आहो. पूर्वी ह्या प्रकारास उधारी असे संबोधले जात असे.

सांप्रतकाळी इये देशी नोटबंदी हेच एक चलनी नाणे झाले असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत शेकडो अर्थतज्ज्ञ नोटबंदीवर निव्वळ चर्चा करून चूल पेटती ठेवीत आहेत, असे आमच्या निदर्शनास आहे. पाहावे तेथे नोटबंदीवर चर्चा सुरू आहे. अतएव "नोटबंदी : शाप की वरदान?' ह्या राष्ट्रीय परिसंवादात आम्हालाही उडी घेणे भाग आहे. कां की आम्हीही एकप्रकारचे अर्थतज्ज्ञ आहोतच. उदाहरणार्थ- क्‍याशलेस अर्थव्यवस्थेचे महत्त्व जनलोकांस आत्ता कोठे पटू लागले असले तरी आम्ही मात्र गेली कित्येक वर्षे क्‍याशलेस व्यवहार करीत आलो आहो. पूर्वी ह्या प्रकारास उधारी असे संबोधले जात असे. उधारीचे व्यवहार करणाराची भर रस्त्यात कॉलर पकडून त्यास विटंबित केले जात असे. तथापि, कोणे एकेकाळी कॉलर धरण्याचे कारण ठरलेली क्‍याशलेस अर्थव्यवस्था आता कॉलर टाइट करण्याची बाब बनली आहे. "आता सारे बदलले! अहो, जग पुढे गेले!!

विसरा रखुमाई देवीवरा बापा,
आता ओठांओठांवर लारिलप्पा, लारिलप्पा'
...ह्या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आम्ही गेल्या आठ नव्हेंबरपासून अविरत गुणगुणत आहो. नोटबंदीचा निर्णय अगदीच "हा' असल्याची टीका आम्ही प्रारंभी केली. परंतु, कालांतराने आम्हास त्याचे महत्त्व कळाले. नोटबंदीमुळे "कडक्‍या'ंची कॉलर अचानक टाइट झाल्याचे ध्यानी आले. किंबहुना नोटबंदी ही एक जीवनशैलीच आहे, असा साक्षात्कार आम्हास झाला. उदाहरणार्थ- गेल्या आठ नव्हेंबरपर्यंत ज्याच्या दुकानाची पायरी चढणे आम्हास दुष्कर झाले होते, त्या शेठ शामळजी शाहजी ह्यांचे किराणाभुसार दुकानी आमची चांगली आवभगत झाली. "अडचनच्या काळमधी प्यारमुहब्बतथी काम लेवानु जोइए' असे वर सांगून शामळ्याने आम्हास परवा रवा बांधून दिला. "मांडून ठेवा' असे टेचात सांगून पायऱ्या उतरलो. उस्मान केळीवाल्यास तर आम्ही ""दोन हजार्के सुट्‌टे है क्‍या?'' असे पहिल्याछूट विचारून आधी चितपट केले. आधी कान, मग दाढी खाजवून त्याने मोजून तीन पिक्‍कल केळी काढून दिलीन. "मांडून ठेव' असे त्यास फर्मावून निघालो. त्या दिवशी शिरा अधिकच गोड लागला...

वाचकहो, ही "मांडून ठेवा' अर्थव्यवस्था तशी फार्फार प्राचीन आहे. "आज रोख, उद्या उधार' अशा निरर्थक पाट्या लावून लावून बेपारी लोकांनी ही परंपरा नष्ट करीत आणली. "आज उधार, उद्या जमले तर रोख' ही खरी चालू काळातील पाटी आहे. हे फुकटे वागणे कुणाला खटकू शकेलही. पण ते तितकेसे अवघड नाही. उदाहरणार्थ, तुम्ही समजा भाजीवाल्याकडे गेलात तर...
आधी भाजीवाल्याच्या समोर उभे राहावे. मग कोथंबिरीची जुडी उचलून बघावी. लहान पोरट्याचे जावळ कुर्वाळावे, तसा त्या जुडीतून उगीचच हात फिरवावा. "गावठी कोतमिर हाहे, साएब' असे सांगून भाजीवाला जवळीक साधेल. लक्ष देउ नये! हाच तो क्षण आणि हीच ती वेळ!! येथेच नोटबंदीच्या परिसंवादाला प्रारंभ करावा.

"हितलं एटीएम सुरू झालं का मालक? किती दिवस चालायचं हे?'' असे उगीचच विचारावे. त्यावर तो भाजीवाला होलसेल मार्केटमधी कंप्लिट लोच्या असूण उधारीवर माल उचलावा लागत असल्याणे निच्चित काहीही सांगता येने इंपॉशिबल हाहे, पन वाट पाहन्यावाचूण विलाज पन णाही,' असे उत्तर देईल. त्यावर आपन पन माण डोलावून काण खाजवावा. चार मिर्च्या ज्यास्त टाका असे सांगावे. कडीपत्ता मागून घ्यावा. लिंबू आहे का? असे विचारावे, पण घेऊ नये!! अखेरीस ""मांडून ठेवा'' असे सांगून निघावे. आम्ही तर कांद्यापासून कंट्री लिकरपर्यंत यच्चयावत साऱ्या गोष्टी गेल्या पंचवीस दिवसात मांडून ठेवल्या आहेत. नोटबंदीला नावे ठेवण्यापूर्वी ह्या क्‍याशलेस सोसायटीचे फायदे वाचकांनी पडताळून पाहावेत, ही कळकळीची विनंती आहे.
नोटबंदी चिरायू होवो! उधार कार्ड हेच खरे आधार कार्ड...कसे? मांडून ठेवा!!

Web Title: dhing tang by british nandy