संकल्पपूर्ती! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 26 डिसेंबर 2016

अरबी समुद्रात हावरक्राफ्टने जाऊन श्रीनमोजी ह्यांच्या हस्ते आम्ही ठिकठिकाणाहून आणलेली माती तेथे टाकली. हावरक्राफ्टमध्ये मी अर्थातच त्यांच्यासोबत होतो. हॉवरक्राफ्ट हे धर्मराजाचे वाहन आहे. ते ना धड पाण्याला टेकते, ना धड हवेत उडते. दशांगुळे वरच राहाते!! श्रीनमोजींना हा रथ किती शोभून दिसतो, असेच भाव मनात दाटून आले.

आजची तिथी : दुर्मुखनामसंवत्सरे श्रीशके 1938, मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी. 
आजचा वार : वर्मी लागलेला वार!! हाहा!! 
आजचा सुविचार : जय जय जय जय जय भवानी! जय शिवाजी!! 

सकाळी थोडा उशिराच उठलो. म्हटले कित्येक दिवसांनी रविवार उगवला आहे. विलक्षण दमलो आहे, पण तरीही कृतकृत्य वाटते आहे. कालचा दिवस माझ्या आयुष्यात उगवला, हेच माझे भाग्य. आख्खा दिवस श्रीमान नमोजीमहाराज (नमो नम:) ह्यांच्या सान्निध्यात होतो. मुंबई-पुणे-मुंबई नुसता त्यांच्या पाठीमागे सावलीसारखा फिरत होतो. शेवटी त्यांनी पुण्यात मला "हवे तमे घरे जावो' असे प्रेमाने फर्मावलेच. माझा पाय निघत नव्हता. मी त्यांना म्हटले, "...ज्याप्रमाणे श्रीरामचंद्राच्या पादुका सांभाळत भरताने राज्य हाकले, तसेच मी करीन. द्या मला आपले जोडे...'' पण त्यांनी जोडे दिले नाहीत!! म्हणाले, 

"मला दिल्लीपर्यंत परत जायचंय. अनवाणी जाऊ का?'' मग मी बालहट्ट सोडला. 
...शिवस्मारकाच्या जलभूमिपूजनाचा इव्हेंट अभूतपूर्व असाच झाला. अरबी समुद्रात हावरक्राफ्टने जाऊन श्रीनमोजी ह्यांच्या हस्ते आम्ही ठिकठिकाणाहून आणलेली माती तेथे टाकली. हावरक्राफ्टमध्ये मी अर्थातच त्यांच्यासोबत होतो. हॉवरक्राफ्ट हे धर्मराजाचे वाहन आहे. ते ना धड पाण्याला टेकते, ना धड हवेत उडते. दशांगुळे वरच राहाते!! श्रीनमोजींना हा रथ किती शोभून दिसतो, असेच भाव मनात दाटून आले. सभेच्या ठिकाणी काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. चंदूकाका कोल्हापूरकर माईकशी जाऊन बोलायला लागले, तर काही लोकांनी घोषणा दिल्या. मग मीही संतापलो. माइक ओढून ओरडलो की "असाल शिवाजीराजांचे अस्सल मावळे, तर गप्प बसाल!' ही मात्रा लागू पडली. लोक शांत झाले. आम्ही शिवाजीराजांचे मावळे नाही, असे कोण मोठ्यांदा म्हणणार? ओरडावे तर सिद्ध होते की आम्ही शिवाजीराजांचे अस्सल मावळे नाही. न ओरडावे तर...जाऊ दे. 

हा प्रकार झाल्यानंतर मी चटकन स्टेजवर बसलेल्या उधोजीराजांकडे पाहिले. ते शांतपणे चष्मा काढून झब्ब्याने काचा पुसत होते. मग मी एकदम मूठ वळून "जय जय जय जय जय भवानी! जय शिवाजी!" अशा घोषणा दिल्या. ही मात्राही लागू पडली. घाईघाईने चष्मा लावून उधोजीराजे उठून उभे राहिले. "तमे एकदम होश्‍शियार छो हं...,'' अशी नंतर नमोजीमहाराजांनी सर्वांदेखत माझी पाठ थोपटली. हे थोडेसे नोटाबंदीसारखेच झाले. "हाल होतायत, पण निर्णय चांगला आहे,' असे लोकांना नाईलाजाने म्हणावेच लागते. त्यातलाच हा प्रकार! असो. 

इव्हेंट अप्रतिम झाला अशी सगळ्यांनी पाठ थोपटली. महाराजांचे आरमार आम्ही अरबी समुद्रात उभे केले होते. ऍक्‍चुअली, नमोजीमहाराजांना शिडाच्या जहाजातूनच आणायचे ठरले होते. पण वाऱ्याचा काय भरोसा? कधी बदलेल, सांगता येत नाही. म्हणून ती योजना रद्द करून दशांगुळे पाण्यावर चालणाऱ्या हॉवरक्राफ्टची योजना केली. 
सकाळी उठलो ते "अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु' हे गाणे गुणगुणतच. सौभाग्यवतीने चमकून पाहिले. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री गाणे छान म्हणतात हे खरे असले तरी गाणे चुकले होते. "अमृताचा घनू' म्हटल्यामुळे सौभाग्यवतींचा उगीचच गैरसमज झाला. मग मी गाणे बदलून " आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर' हे गाणे गुणगुणायला सुरवात केली. असो. 

नमो नम: ह्या सिद्धमंत्राचा लक्ष काल एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण झाला. ह्या मंत्राने अडीच वर्षे किती डायऱ्या भरल्या...त्याला गणती नाही. सिद्ध मंत्राचे लक्षलेखन करून ते कागद समुद्रार्पण करण्याचा संकल्प होता. काल हावरक्राफ्टने खोल समुद्रात जाऊन वह्यांचे जलार्पण केले. माझी ही शब्दभक्‍ती पाण्यात तरंगेल, असे वाटले होते. पण...बुडाली!! 
आता नवी वही, नवा लक्ष, नवा संकल्प.

Web Title: dhing tang by british nandy