डरो मत! (ढिंग टांग)

dhing-tang
dhing-tang

बेटा - (ठरलेली नाट्यमय एंट्री...) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम - (चेहरा उजळून) थॅंक गॉड! तुझी किती वाट पाहत होते मी!! 

बेटा - (सहजपणाने) नवीन वर्षाच्या स्वागताला गेलो होतो ना! ध्वनीच्या वेगाने गेलो, विजेच्या वेगाने आलो!! 

मम्मामॅडम - (सुटकेचा निःश्‍वास टाकत) ...तरी दहा दिवस लागले!!

बेटा - (दिलासा देत) नाऊ यू डोंट वरी! मैं वापस आ गया हूं!! 

मम्मामॅडम - (परिस्थितीची जाणीव करून देत) अचानक तू गायब झालास आणि पार्टीत इतकी धावपळ झाली! सगळे मला फोन करत होते, कब आएंगे, कब आएंगे!! मनमोहन अंकलनीही एकदा फोन केला होता... 

बेटा - (साशंकेने) काय म्हणाले ते?

मम्मामॅडम - (हात उडवून) ते कुठे काय म्हणतात? नुसता फोन केला! मीच अंदाजानं त्यांना सांगितलं की बेटा लौकरच येईल, तुम्ही अर्थशास्त्राची पुस्तकं वाचत बसा! 

बेटा - (कपाळाला आठ्या...) मग?

मम्मामॅडम - मग काय? मग त्यांनी फोन ठेवला!

बेटा - (विषय बदलत) काल तालकटोरा स्टेडियमवर मी केलेलं भाषण ऐकायला तू हवी होतीस! लोकांनी जाम टाळ्या वाजवल्या! 

मम्मामॅडम - (थंडपणाने) तू तिथं बोलावंस म्हणूनच मी आले नव्हते, बेटा!

बेटा - (दुर्लक्ष करत) तिथं मी सांगून टाकलं! अच्छे दिन आयेंगे...जरूर आयेंगे!! लेकिन २०१९ में!! जब कांग्रेस फिरसे सत्ता में आएंगी!! टाळ्यांचा कडकडाट थांबेना!

मम्मामॅडम - (खूश होत) असं म्हणालास? व्वा!! आपण पुन्हा सत्तेत येणार, ह्या कल्पनेवरच जगतायेत सध्या आपले कार्यकर्ते! आणखी काय काय बोललास! सांग ना मला!!

बेटा - (स्फुरण चढत) डरो मत!

मम्मामॅडम - (चक्रावून) मी कुठे डरतेय!

बेटा - (खुलासा करत) असं मी तिथं सांगितलं- डरो मत!

मम्मामॅडम - (जीव भांड्यात पडत)...ओह!

बेटा - (भाषणाच्या पवित्र्यात) देखो भय्या, यही फर्क है उन लोगों में...और हममें! वो कहते हैं की हमसे डरो! हम कहते है की हमसे डरो मत!

मम्मामॅडम - (हादरून) आँ?

बेटा - (वाक्‍य पूर्ण करत) किसीसे भी डरो मत...असं म्हणालो मी!

मम्मामॅडम - (कौतुकानं) कसं सुचतं बाई तुला!! कम्मॉलचै!!

बेटा - (फुशारून) मी सुटीवर गेलो की दरवेळी नवीन काहीतरी घेऊन येतो...यू नो दॅट!!

मम्मामॅडम - (जावळातून प्रेमाने हात फिरवत) मागल्या वेळेला ५६ दिवसांच्या सुटीवरून आलास, तेव्हा तुझं रूप पार पालटलं होतं! आता दहा दिवसांत तिकडे एवढं ज्ञान मिळवलंस?

बेटा - (फुशारकी मारत) ऑब्जर्वेशन, मम्मा, ऑब्जर्वेशन!! निरीक्षणामुळे ज्ञान मिळतं!! परदेशात डोळे उघडे ठेवून फिरत होतो. तिकडे जे पाहिलं, त्यानं माझे अक्षरश- डोळे उघडले!!

मम्मामॅडम - (संभ्रमात पडून) इश्‍श!! उघडे डोळे पुन्हा कसे उघडता येतील?

बेटा - (ठामपणाने) येतात!! 

मम्मामॅडम - (कुतुहलानं) तिथं काय असं पाहिलंस तू? की तुला २०१९ मध्ये आपण पुन्हा सत्तेत येणार ह्याचा साक्षात्कार झाला?

बेटा - (चिंतनशील चेहरा करत) देखो भय्या, हमनें शिवजी की प्रतिमा देखी...वो भी कांग्रेसका चुनावचिन्ह दिखा रहे थे! फिर हमनें भगवान बुद्ध की प्रतिमा में भी वही कांग्रेस का हाथ देखा!! हमनें हजरत अली की तस्वीर में भी वही देखा...

मम्मामॅडम - (सपशेल हादरून) हजरत अलींची तसबीर तुला कुठे बघायला मिळाली बेटा?

बेटा - (दुर्लक्ष करत) इसका मतलब साफ है...सभी भगवान कांग्रेस के हैं और सब कहते है की डरो मत!! ह्याचा अर्थ काय होतो, सांग मम्मा?

मम्मामॅडम - (मटकन खुर्चीत बसत) ओह गॉड! कसं होणार माझ्या पार्टीचं!

बेटा - (आधार देत) मैं हूं ना, मम्मा...डरो मत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com