रेनकोट आणि अंघोळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

(एक स्वच्छ चिंतन...)

मुळात अंघोळ कां करतात? हा प्रश्‍न आम्हाला बालपणापासून छळत आला आहे. अंघोळ हा एक शुद्ध भंपकपणा आहे, हे आमचे मत जनलोकांस सहजी मान्य होत नाही, हे दुःखद आहे. जगातील कोणताही अन्य प्राणी साबणबिबण लावून दणादणा अंघोळ करताना कुणी पाहिला आहे काय? नाही! एक पुष्टसा काळवीट लोळवून त्याचा फन्ना उडवल्यावर दातात काडी घालून आरामात जाळीत बसलेला वाघ कोणी पाहिला आहे काय? नाही!!

पाण्यात डुंबणाऱ्या एखाद्या म्हशीस मानेस नाजूक हिसडा देऊन शिंगावरील पाणी उडविताना कुणी पाहिले आहे काय? नाही, नाही नाही!!.. नाही म्हणावयास आम्ही एकदा दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एका चिपांझीस टूथब्रशाने दांत घासताना पाहिले होते. दांत घासून त्याने आरशासमोर "ईईई...' करून पाहतात, तसे आमच्याकडे पाहिले. आम्हीही आजवर खाल्लेल्या पान तंबाखूची जाहिरात करत ती हस्तिदंती परत केली. त्यासरशी त्याने चेहरा पाडून दात घट्‌ट मिटून टूथब्रश आमच्या पुढे धरला होता...जाऊ द्या.

सांगावयाचा मुद्दा हा, की एखाद्याच्या नावाने अंघोळ करणे सोडले तर एरव्ही अंघोळ ही काही जीवनावश्‍यक बाब नव्हे. किंबहुना, पाण्याचा तो अपव्ययच आहे. आम्ही स्वत: अंघोळ टाळून कैक ग्यालन पाणी आजवर वाचवले आहे, ही बाब येथे (स्वच्छ मनाने) नमूद करू.

हरेक अंघोळीची निमित्त्यें वेगळी, हेतू वेगळे. उदाहरणार्थ : आमचे एक शेजारी ती. कां का. काळे ऊर्फ खत्रूड ह्यांना अंघोळीस (बसलेले) पाहून एखाद्यास वाटेल, की माणसे अंघोळ करतात ती पंचाने खराखरा पाठ खाजविण्यासाठी! आमचे दुसरे एक शेजारी श्री. रा. रा. रा. रा. गोरे ऊर्फ काळा पहाड ह्यांना अंघोळीस (उभे राहिलेले) पाहून एखाद्यास वाटेल, की माणसे अंघोळ करतात ती कमरेचा कळकट टावेल लोकांना अभिमानाने दाखविण्यासाठी. आमची आणखी एक शेजारीण कु. बेबीनंदा हीस अंघोळीस (जाताना किंवा येताना) पाहून कुणाला वाटेल की... जाऊ दे. तो विषय येथे नको!! कु. बेबीनंदा हिच्या अंघोळीचे निमित्त होऊन तिच्या बापाने आम्हास इतके लाथलले होते, की आम्ही पंधरा दिवस स्पंजिंग करून घेत होतो!! असो.

स्नानाचे ढोबळ मानाने तीन प्रकार आहेत. सूर्यस्नान, धूलिस्नान आणि जलस्नान. त्यापैकी सूर्यस्नान हा प्रकार आपण नेहमीच करीत आलो आहे. उन्हातान्हात हिंडण्याला सूर्यस्नान म्हणावे. धूलिस्नान हे सर्वसाधारणपणे तांबड्या यष्टीत खिडकीशी बसल्यावर होते. जलस्नान हा टाकाऊ प्रकार आहे. त्यास बादली, तांब्या, साबण अशी आयुधे लागतात. सरतेशेवटी राजापुरी पंचादेखील लागतो. आम्हाला विचाराल तर माणूस जलस्नान अथवा अंघोळ उगीचच करतो. त्याला खास असे कारण नाही. "आहे पाणी तर, घे तांब्या डोक्‍यावर' एवढाच अंघोळीचा माफक हेतू आहे. ज्या माणसाचे जीवन निर्मळ असते, त्यास अंघोळीची गरज भासत नाही. अंघोळ अशी असावी, की त्यामुळे शुचिर्भूत तर व्हावे, पण अंगास पाण्याचा थेंबदेखील लागू नये. हे अवघड काम आहे. त्यासाठी यथायोग्य तप:साधना करून चित्तवृत्ती चोवीस घंटे फ्रफुल्लित एवं शुचिर्भूत ठेविणे आधी जमले पाहिजे. मळकट किंवा मळखाऊ लोकांचे हे कामचि नोहे!! सदर प्रकारच्या स्नानाला रेनकोट स्नान असे म्हटले जाते.

आपल्या सर्वांचे लाडके प्रधानसेवक आणि ब्रह्मांडनायक श्रीमान नमोजी ह्यांना सदर स्नानाबद्दल कोडे पडले आहे. त्यांनी आपल्या सर्वांचे लाडके माजी गवर्नेर श्रीमान मनमोहंजी ह्यांना सदर रेनकोटस्नानाचा इल्लम विचारून घेतला. "" रेनकोट पहनकर आपण स्नान कैसे कर लेते हैं? स्नान तो हो जाता है., लेकिन छींटे भी नहीं उडती?''
त्यावर बराच वेळ मौन पाळल्यावर श्रीमान मनमोहंजी म्हणाले, "" प्राजी, इस हमाम में सब लोग वैसे नहीं होते. कुछ लोक रेनकोट पहनकर आ जाते है...''
कछु सांभळ्यो?

Web Title: dhing tang by british nandy