इक बंगला बने न्यारा! (ढिंग टांग)

इक बंगला बने न्यारा! (ढिंग टांग)

बने, बने, आमच्या मुंबईत किनई बघण्यासारख्या खूप छान छान गोष्टी आहेत. छे, छे, ‘गेटवे ऑफ इंडिया’चे काय येवढे घेऊन बसलीस? त्या दरवाजाला साधी दारेदेखील धड नाहीत. ‘आओ, जाओ, घर तुम्हारा’ अशी अवस्था आहे. चल आपण पर्यटकांची सर्वाधिक गर्दी खेचणारी ठिकाणे पाहू...

...हा बंगला बघितलास? गेटपाशी दहा-बारा पोलिस दिसताहेत ना? तिथे ह्या शतकातला सगळ्यात मोठा सुपरस्टार राहतो. करेक्‍ट, अमिताभ बच्चन! नाही, नाही, तो काही गुजराथेत राहत नाही काही!! इथेच राहतो...इथून आपण बॅंड स्टॅंडला जाऊ या. बांदऱ्याला...

हा बघ, शाहरुख खानाचा ‘मन्नत’ बंगला. मागची इमारतसुद्धा त्याचीच आहे. तो तिथेच राहातो म्हणे. अगं, ह्या लोकांना हल्ली तळमजला छाप बंगले पुरत नाहीत अजिबात. मग त्यांना सहा, आठ, दहा मजली बंगले बांधावेच लागतात. इलाजच नाही. वाढदिवसाला ग्यालरीत येऊन हात कोण हलवेल मग? एकवेळ बंगल्याला खोल्या नसतील तरी चालतील, पण ग्यालरी हवीच!! हो की नाही? चल आता पुढे...

हे प्रसिध्द गॅलॅक्‍सी अपार्टमेंट. इथे कोण राहातं ओळख? शाब्बास, आहेस खरी हुश्‍शार....दर आठ-पंधरा दिवसांनी तुझ्या स्वप्नात येणारा सलमान खान इथे राहातो, हो ना? चल फार वेळ इथे उभी राहू नकोस. तो काही ग्यालरीत येऊन लग्गेच शर्टबिर्ट काढणार नाही. एखाद्या सिनेमाचे प्रमोशन असेल, तरच हे सितारे असले प्रकार करतात. नाही तर दृष्टीसही पडत नाहीत. चल, चल, तुला आणखी एका सॉलिड बंगल्याकडे नेतो.

...बने, बने, तुझ्यासारखी भाग्यवान तूच. कां की तू महाराष्ट्रात जन्माला आलीस. मराठी अस्मितेचं स्फुल्लिंग जिथे अग्निहोत्रासारखं दिनरात तेवत असतं, अशा एका पावन ठिकाणी तू सदेह उभी राहू शकत्ये आहेस. आपण जिथे उभे आहोत, त्याला कलानगर असं म्हणतात. त्या अर्थानं ही कलानगरची पावनखिंडच आहे. डावीकडे जो बंगला दिसतो आहे ना, ते मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. उजवीकडे तुला दोन स्लॅब पडलेले दिसतात का? ते ‘मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक क्रमांक दोन’ आहे. आजूबाजूला जे बंगले दिसताहेत, तिथे भविष्यकाळात मराठी माणसाच्या अस्मितेची आणखी दोन-तीन प्रतीके उभी राहिली, तर आश्‍चर्य वाटून घेऊ नकोस. 

इथे आल्यावर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. किंबहुना, इथे येऊन ज्याचा ऊर अभिमानानं भरून येत नाही, तो मराठी माणूसच नव्हे!! तो पाहा, छाती काढून ताडताड चालणारा तो मराठी माणूस पाहिलास? दोन्ही बगलेत लिंबे धरल्याप्रमाणे तो खांदे ताणून चालला आहे. ‘प्रतीक क्रमांक एक’च्या दाराशी तो गेला. थोडा वेळ थांबला, आणि (खांदे पाडून) परत निघाला!! जाऊ दे. तो कुठल्यातरी कामगिरीवर निघाला असणार!! इथे येणारा प्रत्येक मराठी माणूस हा कायमस्वरूपी कामगिरीवरच असतो. 

काय म्हणालीस? मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक क्रमांक दोन ही वास्तू अचानक कशी उगवली? हा प्रश्‍न तू विचारायला नको होतास बने!! तुझ्या काकांनी पुण्यात कोथरूडला वनरूम किचन फ्लॅट घेतला, तेव्हा त्यांनी बिल्डरला किती छळले होते आठवतेय? पाया, कॉलम, बीम, स्लॅब...प्रत्येक स्टेजच्या वेळी ते टोपी घालून साइटवर हजर राहत. फ्लॅटची चावी घेताना त्यांनी कैरीचे पन्हे आणि वेफर असा बेतही ठेवला होता, हे आठवतंय ना? पण ही वास्तू अचानक जमिनीतून उगवली. अचानकच दोन स्लॅब पडले. नो कलश पूजन, 

नथ्थिंग! कारण बने...बने....त्या काळात...त्याच काळात...नोटाबंदी झाल्याने मराठी माणसाला खूप कडकी लागली होती गं!! पुढील खडतर काळासाठी तयार राहा, असा इशारा मराठी माणसानं तेव्हा दिला होता, ते आठवतंय ना? आणि आता इथून काढता पाय घे! आपल्याला आता सिंधुदुर्गसम्राटाचा आठ मजली नवाकोरा बंगला बघायला परत जुहूला जायला हवं. हो ना? चल तर मग...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com