होईल का भेट? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी  
सोमवार, 27 मार्च 2017

श्रीमान सुधीर्जी मुनगंटीवारजी, 
सप्रेम नमस्कार 

श्रीमान सुधीर्जी मुनगंटीवारजी, 
सप्रेम नमस्कार 
सदरील पत्र गोपनीय आहे, ते वाचताक्षणी फाडून टाकावे. आपल्यावर एक जोखमीची मोहीम सोपवण्याचे आमच्या मनात घाटत्ये आहे. मोहीम एवढी अवघड आहे, की आपल्यासारख्या ताकदीच्या शिलेदारानेच ती फत्ते करावी. गेले काही महिने आपले आप्त जे की उधोजीसाहेब ह्यांची खप्पामर्जी झालेली आपण पाहाताच. काही केले तरी गृहस्थ सरळ होत नाही. काय करावे? खिचडीत मीठ कमीच झाले आहे, आमटीत पाणीच फार, कोशिंबिरीत मेली जिरं विसरली अशा सतत तक्रारी करणाऱ्या आत्त्याबाईसारखे ते हल्ली वागू लागले आहेत. त्याचा आता कंटाळा येऊ लागला असून, आत्त्याबाईला (पक्षी : उधोजीसाहेबांना) भेटण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांची जातीने भेट घेऊन एकतर त्यांच्या मिश्‍या ओढाव्यात किंवा दाढी (तरी) कुर्वाळावी, असे सर्वसाधारणपणे मोहिमेचे स्वरूप आहे. 
ह्या मोहिमेसाठी आपणांस नामजाद करण्यात येत आहे. तरी जय्यत तयारीत राहाणे. उदईक गुढी पाडव्याचा दिवस आहे. एक संत्रा बर्फीचा पुडा, एक पुष्पगुच्छ आणि एक चंदुदादा पाटील कोल्हापूरकर असा ऐवज घेऊन तडक "मातोश्री'वर जाणे. तेथे दरवाजात मिलिंदोजी नावाचा फर्जंद दारावर आडवा पाय टाकून बसलेला आढळेल. त्याला "मातोश्री'चा टोलनाका असे म्हटले जाते. त्याला आपल्याकडील "व्हीआयपी' पास दाखवावा. तो आत सोडेल!! (डोण्ट वरी!! माझे बोलणे झाले आहे.) त्याला वलांडून आत जाऊन डावीकडील दालनात घट्‌ट बसून राहावे. कोणीही आले तरी तिथून जाम उठायचे नाही, एवढे लक्षात ठेवणे. काही वेळाने (म्हंजे बऱ्याच वेळाने) आत्याबाई येतील. आल्या आल्या त्यांना नमस्कार करावा. वऱ्हाडातले आहात म्हणून सांगतो आहे : मिठी मारू नये!! आत्त्याबाई टाळी देतानाही दहादा विचार करतात, वऱ्हाडी अघळपघळपणा दाखवाल, तर कामगिरी नासेल, ही खात्री!! 
चंदुदादा पाटील-कोल्हापूरकर हे वकिली करण्यात तरबेज आहेत. "उधोजीसाहेबांचे मन वळवण्यासाठी मी स्वत: "मातोश्री'वर जाईन' असे त्यांनी आधीच डिक्‍लेर केल्याने त्यांना पाठवणे भागच आहे. माणूस सार्वजनिक बांधकाम खात्याचा, पण ही असली बांधकामेच त्यांना भारी आवडतात. काय करणार? जाऊ दे. 
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. नीट जा, आणि नीट या. सुरक्षित प्रवास करा. 
आपलाच. नाना फडणवीस. 
* * * 
आदरणीय नानासाहेब- 
हा सुधीर्जी तळहाती शिर घेऊनिया "मातोश्री'वर निघाला आहे!! मोहीम फत्ते करीन, तेव्हाच परत येईन, हा शब्द देतो. महाराष्ट्राच्या दौलतीसाठी एक विदर्भवीर दुसऱ्या विदर्भवीराला मोहीमेवर धाडतो, आणि त्याला कोल्हापूरची साथ मिळते, हा दुर्मीळ योग आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला. (खुलासा : बजेटमध्ये हा वापरलेला नाही. ताजा आहे.) अर्ज किया है... 
ये कहां आ गए हम यूंही साथ साथ चलते 
तंबू उडून गेला, झालेत खांब कलते... 
...शेर फारसा चांगला झालेला नाही, हे मान्य. पण तरीही "वाह वाह' म्हणावे, ही विनंती. शेरावरून आणखी एक आठवले. उधोजीसाहेबांना वर्षभरापूर्वी मी एक वाघ भेट दिला होता. कचकड्याचा वाघ घरात घ्यायलासुद्धा त्यांनी चिक्‍कार कांकूं केली. डिलिव्हरी घ्यायला दुसऱ्या मजल्यावरून खाली येईनात. ह्यावेळी ससा नेणार आहे!! बघू सापळ्यात सापडतात का!! 
येतो, नानासाहेब, आशीर्वाद द्या! उचलला हा बेल भंडार. हर हर महादेव. आपलाच एकनिष्ठ सुधीर्जी. 
ता. क. : चंदुकाका कोल्हापूरकर शर्ट पॅंट घालून माझ्याकडे आजच येऊन पोचले आहेत. आल्या आल्या म्हणाले, ""निघायचं?'' मी म्हटले, "'अहो, पाडव्याला जायचं आहे, आत्ता कुठे?'' त्यावर ते गंभीरपणाने म्हणाले, ""आत्तापासून आपण "मातोश्री'वर जाऊ, तर पाडव्याला ते दिसतील तरी!'' 
शेवटी निघालो आहे!! सु. मु. 
ता. क. 2 : पाडवा असल्याने चितळ्यांच्या श्रीखंडाचा अर्धा किलोचा डबाही सोबत घेतला आहे. काळजी नसावी. सु.मु. 

Web Title: Dhing Tang Editorial