लता! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

कधी तरी असे होते, 

मनात सारे थिजून जाते... 

कोरडेठाक आतले शिवार 

एका सरीत भिजून जाते...

कधी तरी असे होते, 

मनात सारे थिजून जाते... 

कोरडेठाक आतले शिवार 

एका सरीत भिजून जाते... 

 

तुझी माझी पहिली भेट 

कधी घडली आठवत नाही 

बाकी सगळे थिजून गेले, 

तेवढे मात्र स्मरत नाही 

 

संध्याकाळी हातपाय धुऊन 

देव्हाऱ्याशी उभे राहून 

हात जोडून डोळे मिटून 

कधी म्हटला होता पर्वचा? 

 

कधी म्हटले होते पाढे? 

कधी भेंड्या खेळल्या होत्या? 

आठवत नाही काही केल्या, 

गेला स्मरण-साचा 

 

...दिव्या दिव्या दीपत्कार 

कानी कुंडलं मोतीहार 

दिव्याचं तेल कापसाची वात 

दिवा जळो मध्यान्हरात... 

 

म्हणत म्हणत डोळे उघडून 

पाहिले होते एक दिवस 

बघता बघता हरवून गेलो, 

सारे काही एक दिवस 

 

देव्हाऱ्याच्या अवतीभवती 

गूढ काही उजळत होते 

निरांजनाच्या ज्योतीमध्ये 

तुझेच सूर साकळत होते. 

वळून पाहिले बाजूला तर 

हात जोडून तूच उभी 

काळोखाच्या ऐन रात्री 

एक चांदणी जशी नभी 

 

निळा-सावळा सारा खेळ 

सुरांचे मोर दूर रानात 

उजेडाच्या झाडाची ही 

एक मुळी माझ्या मनात 

 

अजूनही येतेस कधी, 

घरात शिरतेस अर्ध्या रात्री 

रात्र जाते खिरत आणि 

उतरत जातेस माझ्या गात्री 

 

नि:शब्दाच्या बिछान्यावर 

बदलत राहाते मन करवट 

अस्वस्थाच्या पाचोळ्यावर 

सातबायांची सदैव वटवट 

निद्रेची अवदसा तेव्हा 

सतत येजा करत राहाते 

जड पापणी, जड मन 

ह्यांचे खेळ बघत राहाते 

 

तुझे सूर माझे होतात, 

तुझी गाणी माझीच आहेत 

माझ्यामधल्या तुझेपणाचे 

हेच पुरावे मौजूद आहेत 

 

राऊळातला मिणमिण दिवा 

आसमंताला जाग देतो 

अस्तित्वाची पवित्र चाहूल 

सतत उशाशी देत राहातो. 

देवळापुढल्या पिंपळावरती 

कावळे शांत होत जातात, 

दिवसभर लोंबकळलेली 

वाघळे उडून निघून जातात. 

आभाळात वरच्यावर 

चांदण्यांची लगबग होते 

चांदोबाला पिटाळण्याची 

लिंबोणीला घाई होते... 

 

अशावेळी तू पुन्हा येतेस... 

 

अशावेळी तू पुन्हा येतेस 

प्राजक्‍ताचा होऊन दर्वळ 

काळेबेरे धुतले जाते 

सारे काही होते निर्मळ 

 

उगवतीच्या संधिकालात 

भूपाळीचे सूर येतात... 

नि:शब्दाच्या काठावरती 

तुझी पावले उमटत जातात... 

 

तुझ्यामाझ्या दिमतीला गे 

आठ प्रहर, सूर सात 

आभाराच्या उपचाराचे 

मी जोडतो नुसतेच हात...

Web Title: Dhing Tang on Lata Mangeshkar by British Nandi