पोटस आणि ताज! (ढिंग टांग!)

पोटस आणि ताज! (ढिंग टांग!)
पोटस आणि ताज! (ढिंग टांग!)

आम्हा आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांचे जग फार्फार वेगळे आणि थरारक असते. आमची काम करण्याची तऱ्हा वेगळी, भाषाही वेगळी. बहुधा आम्ही सांकेतिक भाषाच वापरतो. तुम्हाला सांगायला हरकत नाही. जरा कान इकडे करा, आम्ही किनई सीआयएचे हस्तक आहो!! सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांचे फोन ऐकण्याची उठाठेव करणे, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांवर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवणे, इतकेच नव्हे, तर खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांची "व्हाइट हाऊस'मध्ये सुरक्षा व्यवस्था पाहाणे, अशी कामे आम्हाला पार पाडावी लागतात. अन्य देशांत क्रांतिबिंती घडवणे, जागतिक राजकारणाला निर्णायक वळण देणाऱ्या काही घडामोडी घडवत बसणे, हेही उद्योग आम्हाला करावे लागतात. पण करणार काय? ड्यूटी इज ड्यूटी. हो की नाही?
परवाच्या दिवशी लॅंगली, व्हर्जिनिया इथल्या आमच्या मुख्यालयातून मला गुप्त संदेश आला. तो माझ्या घड्याळातल्या फॅक्‍स मशिनमधून आला. त्यात लिहिले होते : "तारांगण जरा येरवाळीच तपासा. आपला हेमचंद्र.' हे वाचून तुम्हाला काहीच टोटल लागणार नाही. पण मला लागली! ह्या वाक्‍यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेतले की सांकेतिक निरोप मिळतो : ताज येत आहे!

"ताज' म्हणजे भारतातले सातवे किंवा आठवे किंवानववे आश्‍चर्य आहे, हे कोणाला माहीत नाही? पण ताज हे सांकेतिक नाव आहे आपल्या प्रधानसेवक नमोजींचे. तसे आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांना पोटस असे म्हणतो. पोटस म्हंजे पी-ओ-टी-यू-एस...याने की प्रेसिडेंट ऑफ धी युनायटेड स्टेट्‌स!! तर पोटस आणि ताजची भेट "व्हाइट हाऊस' येथे होणार असून ह्या घडामोडीवर लक्ष ठेवण्याची ड्यूटी मला मिळाली होती. ती पार पाडून जागतिक राजकारणाला वेगळे वळण देण्यात मी यशस्वी झालो, ह्याचा मला अभिमान वाटतो. घडले ते असे :

वेषांतर करून मी "व्हाइट हाऊस'मध्ये शिरलो. ओव्हल ऑफिसमध्ये मी दबकत शिरलो तेवढ्यात पोटस स्वत: खुर्चीवरून उठले आणि "हे देअर' असे म्हणत जोरात सामोरे आले. बक्‍कन माझ्या पाठीत गुच्ची मारून ते ओरडले, ""माझ्या सच्च्या मित्रा, कसा आहेस?'' मी काही बोलण्याच्या आतच त्यांनी पाठीमागून येऊन माझ्या दोन्ही बगलेत हात घालून मुंडके गच्च पकडले आणि मला "सूर्याची पिले दाखवू का?' असे मोठ्या आवाजात विचारले. माझा जीव घुसमटत होता. त्यांची पकड ढिली झाल्याचे पाहून मी शिताफीने सटकत होतो, पण तेवढ्यात त्यांनी "लेका, तुझं ज्याकिट माझ्या कोटापेक्षा फाइनाबाज आहे की! काढ!!'' असे म्हटले. मी हादरलो. कुठून दुर्बुद्धी झाली आणि भारतीय वेषांतर केले, असे क्षणभरात वाटून गेले. तेवढ्या वेळात त्यांनी सात वेळा "सच्च्या मित्रा' असे हाकारे देत माझ्या पाठीत चौदा गुद्दे घातले. लीबियात मी ड्यूटीला होतो तेव्हा दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलो होतो. पण ते पर्वडले, अशी माझी अवस्था झाली.

""तुझ्यासाठी मी पंचपक्‍वान्ने करून ठेवली आहेत. दोघे मिळून तुडुंब जेवू...काय?'' असे गडगडाटी हसत पोटसने माझ्या पोटात एक प्रेमाची फाइट देऊन ठेवली. मी कळवळून खाली वाकलो. माझा (वेषांतरातला) सोनेरी काडीचा चष्मा खाली पडून फुटला. पुढचे सगळे मला धुरकट दिसू लागले...

पोटस आणि ताजच्या प्रेमाचा पहिला आविष्कार माझ्या नशिबी यावा, ह्याला सुदैव म्हणायचे की दैवदुर्विलास असे वाटू लागले. पोटस चुकून मलाच ताज समजले होते.
...तेवढ्यात खरेखुरे ताज आले. पण तोवर पोटसचा प्रेमाचा पहिला लोंढा आटला होता. त्यांनी आधी ठरल्याप्रमाणे तीनदा हस्तांदोलन आणि दोनदा मिठी एवढ्यावर भागवले व चार वेळा "सच्चा मित्र' म्हणून घेतले.

...बस्स, एवढेच घडले. माझ्या बाबतीत घडलेला प्रकार खऱ्या ताजबद्दल घडला असता तर जागतिक राजकारणाचे काय झाले असते? जरा विचार करा. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com