विकास रथासाठी हवेत अक्षय इंधनस्रोत

कोरोनाचा उद्रेक झालेल्या काळात आणखी एका संकटाची नांदी आपल्यापैकी पुढल्या हाका सावध ऐकणाऱ्यांच्या कानी पडत आहे.
ganpati
ganpatisakal

बुद्धीच्या देवतेला नमन करताना प्रत्येकाच्या मनात कोरोना हा विषय डोकावणे स्वाभाविक आहे. परंतु या संकटावरील उत्तरही विज्ञान देईल आणि त्यातून आपण तावून सुलाखून बाहेर पडू, याची खात्री बाळगूया.

कोरोनाचा उद्रेक झालेल्या काळात आणखी एका संकटाची नांदी आपल्यापैकी पुढल्या हाका सावध ऐकणाऱ्यांच्या कानी पडत आहे. त्याचा मुकाबला करण्याची बुद्धी गणरायाने आपल्याला द्यावी. हे संकट आहे तापमान बदलांचे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आधिपत्याखाली यासंदर्भात नेमलेल्या समितीने यावर्षी प्रसिद्ध केलेला अहवाल मानवजातीसाठी धोक्याची घंटा आहे. औद्योगीकरणपूर्व काळातील सरासरी तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सिअसपर्यंत सरासरी तापमानवाढीची पातळी हे जग २०३०पर्यंतच गाठण्याचा इशारा त्यात दिलेला आहे. सागरी पातळी वाढण्यासारखे अनेक भयावह परिणाम त्यातून संभवतात. त्या अहवालातील सर्वाधिक तातडीने दखल घेण्याजोगी बाब म्हणजे या तापमानवाढीला सर्वाधिक कारणीभूत घटकांपैकी कार्बन डाय ऑक्साइडची पातळी २०१९मध्ये त्याआधीच्या २० लाख वर्षांत नव्हती एवढी आणि मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडच्या उत्सर्गाची पातळी त्याआधीच्या ८ लाख वर्षांत नव्हती एवढी झाली आहे! थोडक्यात, त्या विनायकाला यंदा काही साकडे घालायचेच, तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या जीवनकाळात सागरी पातळी वाढून जग बुडू नये आणि वायूउत्सर्ग वाढून जगाचा श्वास कोंडू नये, यासाठीची बुद्धी देण्याचे हवे, हे नक्की.

इंधनप्रज्ज्वलन हा या प्रदूषणकारी आणि विखारी वायूउत्सर्गाला कारणीभूत असा महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे मी एवढ्या गांभीर्याने लक्ष वेधू इच्छिण्याचे कारण म्हणजे, तो उत्सर्ग कमी करण्यासाठी उपाय योजणे ही प्रत्येक देशाबरोबरच आपली प्रत्येकाचीही जबाबदारी आहे. आपण व्यवस्थांवर समाजमताचा दबाव आणू शकणारे आणि व्यवस्थेने सुचवलेल्या परिवर्तनवादी उपायांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे घटक आहोत. तशा काही उपायांच्या कार्यवाहीलाही आता चालना मिळाली आहे. त्यांपैकी एक आहे, खनिज इंधनांचा वापर मर्यादित करणारी जैवइंधने. पेट्रोल हे रोजच्या वापरातील इंधन. त्यामध्ये इथेनॉल या जैवइंधनाचे मिश्रण सध्याच्या ८.५ टक्के प्रमाणावरून २०२५पर्यंत २० टक्के एवढे करण्याचा स्वागतार्ह धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केवळ पेट्रोल नव्हे, तर बायोडिझेलही आणि केवळ रस्ते वाहतूक नव्हे, तर जल आणि हवाई वाहतूकही जैवइंधनांवर करण्यासाठीचे मार्ग आता खुले होऊ लागले आहेत. त्यांनाही चालना मिळणे पुढील पिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आता तर संपीडित नैसर्गिक वायूप्रमाणेच (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस - सीएनजी) संपीडित जैववायू (कॉम्प्रेस्ड बायोगॅस - सीबीजी) निर्मितीचे तंत्रही आपल्या देशात विकसित झाले आहे.

जैवइंधनाच्या निर्मितीसाठीच्या इथेनॉल उत्पादनासाठी शर्कराजन्य पदार्थांचाच कच्चा माल म्हणून वापर आजही मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु धान्यप्रक्रियेवर आधारित इथेनॉलनिर्मितीचा पर्यायही त्याला आहे. त्यातही टाकाऊ धान्य किंवा शेतकचरा यांचाही वापर करण्यासाठीचे संशोधन सिद्ध झाले आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यामध्ये उत्तरेकडील राज्यांत शेतकचरा पेटवून देण्याचा विषय ज्वलंत होतो. त्यावर हे दुहेरी लाभ देऊ शकणारे उत्तर आहे. एरवी प्रदूषणकारी ठरत असलेल्या या कचऱ्यातून द्रवरूप आणि वायूरूप अशा दोन्ही स्वरूपांतील जैवइंधननिर्मिती होऊ शकते.

खनिज इंधने आणि वायू यांच्या वाढत्या वापराचे हवामानबदलांच्या रूपातील भयावह परिणाम आता जगाच्या अन्य भागांप्रमाणेच आपणही अनुभवत आहोत. अरबी समुद्रातील वाढती चक्रीवादळे ही त्यांपैकीच एक. निसर्गाने आपल्या पदरात टाकलेले दान, पुढील पिढीपर्यंत त्याच रूपात पोचवले नाही, तर काय होते, हे आपण भोगत आहोत. ते अक्षयदान तसेच ठेवायचे, तर विकासरथासाठी आपण वापरत असलेला इंधनस्रोतही अक्षय असणे गरजेचे आहे.

- डॉ. रवींद्र उटगीकर

(लेखक प्राज इंडस्ट्रीज लि. चे उपाध्यक्ष असून, गेली तीन दशके ऊर्जा व अक्षय ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com