Development
Developmentsakal

भाष्य : नावीन्यवाट वहिवाट असावी...

जागतिक नावीन्य निर्देशांकात भारताने आठ वर्षांत ४१ स्थानांची प्रगती साधत चाळीसाव्या क्रमांकापर्यंत प्रगती केली आहे.

- डॉ. रवींद्र उटगीकर

जागतिक नावीन्य निर्देशांकात भारताने आठ वर्षांत ४१ स्थानांची प्रगती साधत चाळीसाव्या क्रमांकापर्यंत प्रगती केली आहे. बदलत्या काळाची गरज पाहता, देशातील शिक्षणसंस्थांपासून उद्योगसंस्थांपर्यंत सर्वांनी या नावीन्याचा ध्यास घेतला, तर ज्ञान आणि तंत्र नावीन्यातील शिखराकडील वाटचाल आपल्यासाठी सुकर ठरेल.

आपल्या रोजच्या भाजीविक्रेत्याला यूपीआयद्वारे पैसे देता येतील, असा विचार दहा वर्षांपूर्वी आपण केला होता? शक्यच नाही, कारण खुद्द यूपीआयच्या निर्मात्यांनीही बहुधा तो केला नव्हता. याचे कारण या संकल्पनेचा तेव्हा जन्मही झाला नव्हता! सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार प्राधान्याने रोखीतूनच होत होते.

२०११ मध्ये आपल्या देशातील नागरिक वर्षभरात सरासरी फक्त सहा रोखविरहित व्यवहार करत होते. या पार्श्वभूमीवर युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही संकल्पना एप्रिल २०१६मध्ये साकार झाली आणि डिजिटल आर्थिक व्यवहारपूर्तीच्या दिशेने भारताने क्रांतिकारक पाऊल टाकले.

आज जगभरातील ४६ टक्के डिजिटल आर्थिक व्यवहार एकट्या भारतात झाले आहेत. यूपीआय हे भारताने देश म्हणून जगापुढे अनुसरण्यासाठी ठेवलेले नावीन्यपूर्ण तंत्रसेवेचे उदाहरण ठरत आहे! नावीन्यपूर्ण संकल्पनांची मशागत भारतात आता चांगल्या रीतीने होऊ लागली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या जागतिक नावीन्य निर्देशांकात (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३) भारताने मिळवलेले चाळीसावे स्थान आणि गेल्या आठ वर्षांत ८१ व्या स्थानापासून तिथवर घेतलेली झेप ही त्याची परिणती .

‘वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन’ ही संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली कार्यरत संस्था जगभरातील देशांची नावीन्य निर्देशसूची दरवर्षी तयार करते. त्यात भारताने गेल्या चार वर्षांपासून पहिल्या पन्नास देशांत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भारत हा नावीन्यासाठीच्या गुंतवणुकीपेक्षाही अधिक परतावा मिळवण्यात यशस्वी ठरणाऱ्या देशांपैकी एक आहे.

बाजारपेठीय सजगता आणि ज्ञान व तंत्रज्ञान निष्पत्ती या निकषांवरील उत्कृष्ट कामगिरीमुळे आपण या निर्देशांकात प्रगती साधत आहोत. मात्र मानवी भांडवल व संशोधन, सर्जनशीलता निष्पत्ती, संस्थात्मक संरचना आणि व्यावसायिक सजगता या आघाड्यांवर प्रगतीला देशाला वाव आहे.कनिष्ठ- मध्यम अर्थव्यवस्था आणि दक्षिण व मध्य आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये भारताची कामगिरी सर्वांमध्ये उठावदार आहे.

देशांतर्गत बाजारपेठेची व्याप्ती, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान सेवांचा एकूण व्यापारातील वाटा, एकूण जीडीपीच्या तुलनेत उपलब्ध होणारा साहसवित्त निधी अशा निकषांवर आपण जगातील आघाडीच्या दहा देशांमध्ये आहोत, तर एकूण पदवीधरांमधील विज्ञान व अभियांत्रिकी पदवीधरांच्या प्रमाणात जगामध्ये अकरावे आहोत.

या निर्देशांकासाठीच्या निकषांपैकी स्टार्ट अप कंपन्या, त्यांना होणारा वित्तपुरवठा, त्यांची व्याप्ती वाढवण्याची क्षमता, एक अब्ज डॉलरहून अधिक बाजारमूल्य असणाऱ्या (युनिकॉर्न) स्टार्ट अप कंपन्यांचा आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाटा या आपल्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. एकूण १३२ देशांच्या क्रमवारीत या निकषांवर भारत नवव्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात ९९ हजारांहून अधिक नोंदणीकृत स्टार्ट अप कंपन्या आहेत.

त्यांपैकी १०८ युनिकॉर्न आहेत. या परिसंस्थेने दहा लाख थेट रोजगारांची निर्मिती केली असून, २०२२मध्ये त्यांत ६४ टक्क्यांची भर पडली आहे. देशाच्या अर्थकारणावर या स्टार्ट अपचा किती प्रभाव पडू शकतो, या प्रश्नाचे उत्तर मागील शतकात अशाच रूपांत सुरू झालेल्या काही कंपन्यांच्या उदाहरणांवरून आपल्याला मिळू शकते. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो अशा कंपन्या गेल्या शतकाच्या सत्तर आणि ऐंशीच्या दशकांतील''स्टार्ट अप’च म्हणता येतील.

आज त्यांच्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जगभर ठसे उमटवत आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची शिखर संस्था ‘नॅसकॉम’च्या अहवालानुसार, ५४ लाख थेट रोजगारांची निर्मिती त्यांतून होत आहे आणि २०२३च्या अखेरपर्यंत त्यांचे एकत्रित उत्पन्न २४५ अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

जोखीम न घेण्याची जोखीम!

उत्पादन वा सेवांमधील नावीन्य हे बदलत्या काळात उद्योग-व्यवसायांसाठी निर्णायक यशाचा मंत्र ठरत आहे. परंतु त्यांचे हे यश केवळ त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठीचे किंवा नफेखोरीसाठीचे असू शकत नाही. सर्वसामान्य नागरिकांपुढील प्रश्नांची उत्तरे शोधणारी उत्पादने व सेवा यांवरच ते अवलंबून राहणार आहे. आरोग्य-शिक्षणापासून पायाभूत सोयींपर्यंतच्या आणि वाहतुकीपासून प्रदूषणापर्यंतच्या गरजांची उत्तरे त्यासाठी शोधावी लागणार आहेत.

आजच्या आणि उद्याच्या या प्रश्नांची उत्तरे पारंपरिक मानसिकतेचे जोखड न उतरवता शोधणे कठीण आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना अंगीकारणे हाच मार्ग आहे. ही प्रक्रिया जोखमीची आहे. परंतु उद्योगांच्या बाबतीत अपयश ही यशाची केवळ पहिली पायरी नसते, तर नाण्याची दुसरी बाजूही असते.

उद्योजक एलॉन मस्क हे तर, ‘तुम्ही फारसे अपयशी ठरत नसाल तर तुमच्या उत्पादन वा सेवांमध्ये फारसे नावीन्यही नाही’, असे समजा, असा इशारा आजच्या काळातील उद्योगांना देतात. उद्योगांसाठी खरी जोखीम ही ती न पत्करण्यामध्येच असते! नोकिया, कोडॅक यांसारख्या एकेकाळच्या काही जगप्रसिद्ध कंपन्या ही त्याची उदाहरणे आहेत.

त्याउलट, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या तंत्रकंपन्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाला भिडण्याचा आणि तंत्रज्ञानातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय उद्योगही आता केवळ आपल्या देशांतर्गत बाजारपेठेपलीकडे संधी पाहू लागले आहेत. परंतु या वळणावर तग धरण्यासाठी नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांनी सज्ज राहणे ही त्यांच्यासाठीची अनिवार्यता आहे.

संशोधन व विकास कार्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या जगातील अडीच हजार कंपन्यांची यादी युरोपीय महासंघाने गेल्या वर्षअखेरीस प्रसृत केली होती. त्यांपैकी सुमारे एक तृतीयांश कंपन्या अमेरिकी आणि एक चतुर्थांश कंपन्या चिनी आहेत. संशोधन व विकासावरील या सर्व कंपन्यांच्या निधीपैकी अनुक्रमे ४०.२% आणि १७.९% रक्कम या दोन देशांतील कंपन्यांनीच केली आहे.

या यादीतील २४ कंपन्या भारतीय आहेत आणि त्यांपैकी चार कंपन्या पहिल्या एक हजारांमध्ये आहेत. टाटा मोटर्स ही जगात ५८व्या स्थानी आहे. सन फार्मास्युटिकल्स, अरबिंदो फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या अन्य तीन कंपन्या औषधनिर्माण क्षेत्रातील आहेत. औषधनिर्माणाबरोबरच जैवतंत्रज्ञान आणि औद्योगिक जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजसारख्या भारतीय कंपन्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे ठसे उमटवत आहेत.

नावीन्याची ही वाट प्रशस्त करण्यासाठी भारतात सरकारकडूनही ठोस पावले टाकली गेली आहेत.‘अटल इनोव्हेशन मिशन’ हे त्यांपैकी. ‘अटल टिंकरिंग लॅब’च्या माध्यमातून ७५ लाखांहून अधिक विद्यार्थी शालेय स्तरापासून नवतेचा मंत्र जपत आहेत.

एकट्या पुण्याचे उदाहरण द्यायचे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड इंटरप्राइज आणि डिझाइन इनोव्हेशन सेंटर, सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा भाऊ इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअर सेल, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा इनोव्हेशन पार्क आणि व्हेंचर सेंटर अशा या शहरातील शिक्षण आणि व्यवसाय संस्था नावीन्याचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईच्या आयआयटीची सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप या संस्थेने तर २२०हून अधिक स्टार्ट अपच्या जन्मकळा अनुभवल्या आहेत!

नावीन्याच्या या वाटेवर उद्योग-व्यवसायांचा वाटाही निर्णायक ठरणार आहे. सर्वसामान्य माणसालाही तितक्याच सातत्याने नवी ज्ञान-तंत्र, कौशल्ये आणि संधींचा शोध घेत राहावे लागत आहे. ‘होंडा’ कंपनीचे संस्थापक सुइचिरो होंडा यांनी यश म्हणजे ९९% अपयशच असते, असे म्हटले होते. आता गरज आहे, एका टक्क्याच्या शिखरावर जाण्यासाठी त्या ९९ टक्क्यांची जोखीम पत्करण्याची! ती बिकट भासणारी वाट हीच नावीन्याची वहिवाट करण्याची!

(लेखक प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष असून, उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com