भाष्य : गरज नागरी शिस्तीच्या ‘टोचणी’ची

भारतीयांमध्ये पाश्‍चात्त्य नागरिकांपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती आहे. पण उणीव आहे ती नागरी शिस्तीची. त्याची जोड मिळाली तर आपण लढ्यात यशस्वी होऊ.
Briton Bournemouth Beach
Briton Bournemouth BeachSakal

भारतीयांमध्ये पाश्‍चात्त्य नागरिकांपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती आहे. पण उणीव आहे ती नागरी शिस्तीची. त्याची जोड मिळाली तर आपण लढ्यात यशस्वी होऊ. नागरी शिस्तीचा ‘संसर्ग’ जेवढा पसरेल, तेवढा हवा आहे.

कोरोनाची साथ रोखण्यासाठी आपल्याला काय हवंय? कोणी म्हणतात प्रभावी लस. कोणी म्हणतात रुग्णालये आणि सुविधा, तर काहींचा भर आहे तो चाचण्या आणि विलगीकरण व्यवस्थेवर. "रेमेडेसिव्हीर''सारखे औषधच तारू शकेल, असा समज करून घेऊन काही जण त्यासाठी प्रचंड रांगा लावताना दिसतात. या महासाथीच्या संकटात सुचणारे हे पर्याय चुकीचे नाहीत. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती आहे ‘नागरिकशास्त्र’ आपल्यात रुजविण्याची.

ऑक्टोबरअखेरीस भारतातील रुग्णांची संख्या रोडावू लागली. दिवाळीच्या गर्दीनंतर मनात भीती असणारी करोनाची दुसरी लाट आलीच नाही. ब्रिटनमध्ये पाच नोव्हेंबरपासून संपूर्ण देशाला टियर एक ते टियर चार अशा गटांमध्ये विभागले गेले होते. जास्त प्रादुर्भाव असणा-या जिल्ह्यांमध्ये टियर-चारचे कडक निर्बंध लागू होते. मी पोचल्यावर आठ दिवसांत म्हणजे २२ डिसेंबरच्या सुमारास ''यू. के. स्ट्रेन'' या कोविड विषाणूच्या नवीन ‘आवृत्ती’ची घोषणा पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केली. या विषाणूचा प्रसार खूप जास्त वेगाने होतो असे शास्त्रीय दाखले असल्याने ब्रिटनमध्ये कडक ठाणबंदी लागू केली गेली. भारताच्या १/२३ इतकी कमी लोकसंख्या असणाऱ्या या देशात जानेवारीत एका दिवशी ६१ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. तेथील पंतप्रधानांनी ‘मास्क वापरा, अंतर ठेवा, राष्ट्रीय आरोग्यसंस्थेचे रक्षण करा’,अशी हाक दिली. यातील तिसरा मुद्दा महत्त्वाचा होता. दाखल होत असणाऱ्या गंभीर रुग्णांमुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एन.एच.एस) हॉस्पिटल व डॉक्टरांच्या कार्यक्षमतेची परिसीमा गाठली गेली होती. मी १० फेब्रुवारी रोजी ब्रिटनहून भारतासाठी प्रस्थान केले तेव्हासुद्धा ठाणबंदी चालूच होती. भारतात मात्र आनंददायी वातावरण होतं. सर्वत्र मुक्त संचार!

कोविड काळात दोन्ही देशांतील परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर जाणवलेल्या गोष्टी येथे मांडत आहे. एक मुख्य फरक असा, की भारतातील निर्बंधांचे पालन प्रामुख्याने होताना दिसले ते कायद्याच्या बडग्याच्या भीतीने. इथले सामाजिक, राजकीय आणि धार्मिक समारंभ पूर्णपणे बंद झाले नाहीत. ब्रिटनमध्ये निर्बंध जारी होण्यापूर्वी भरपूर चर्चा झाली. विरोध, मतभेद तीव्रपणे व्यक्त झाले. पण एकदा सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा लोकांचा कटाक्ष दिसला. जवळपास रोज बरोबर संध्याकाळी पाच वाजता कधी पंतप्रधान बोरीस जॉन्सन, कधी गृहमंत्री प्रीती पटेल, कधी अर्थमंत्री शशी सुनाक तर कधी आरोग्यमंत्री मॅट हॅनॉक हे ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानामधून समस्त जनतेसमोर ‘बीबीसी दूरचित्रवाणी चॅनल’वरून संभाषण साधत. महत्त्वाच्या घोषणा खुद्द पंतप्रधान करत. रोज या अतिमहत्त्वाच्या मंत्र्यांच्या बाजूला कधी राष्ट्रीय आरोग्य संस्था म्हणजे एन. एच. एस चे प्रमुख अधिकारी, ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे प्रमुख, विषाणूशास्त्र संशोधनातील सरकारमान्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ असत. निवेदनानंतर रोज १५ मिनिटे ते काही पत्रकारांच्या शंकांचे, स्वतःच्या कार्यक्षमता आणि अनुभवानुसार शंकानिरसन करायचे. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना कमालीचं महत्त्व आहे, तरीही त्या सबबीखाली नियम मोडण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. नागरिकांनी प्रामाणिकपणे एकमेकांच्या घरी जाणे बंद केलं. लॉकडाऊनमध्ये व्यायामासाठी घराबाहेर एक तास चालण्याची परवानगी होती. फूटपाथवर समोरून व्यक्ती आली तर लगेच बाजूला थांबून आपल्याला जायला रस्ता करून देत. खाण्यापिण्याच्या सामानासाठी घरून दुकानात फोन करायचो, पैसे भरायचो. दिलेल्या विशिष्ट वेळेलाच दुकानात पोचल्यावर बाहेर सामान टोकन नंबरसह ठेवलेले असायचे. पटकन ते गाडीत ठेवून ताबडतोब घरी परत येत असू. ऑफिसमध्ये गेल्यास नगरपालिका अधिकारी सखोल प्रश्न विचारत. दंड नाही. आपण स्वतःसाठी नियम ठरवून घ्यायचे व त्यानुसार शिस्तीने वागायचे. ही शिस्त त्या व्यक्तीच्या अंगात भिनलेली असते.

नियमांचा संस्कार

एक अनुभव सांगायलाच हवा. मॅंचेस्टरमधली माझी नात सात-आठ वर्षांची असताना माझं बोट धरून माझ्या बरोबर चालायला आली. एका चौकात रस्ता क्रॉस करायला थांबलो. पदपथावर पायी क्रॉस करायला लाल सिग्नल म्हणजे ''रेड मॅन'' होता. चारी बाजूला नजर फिरवल्यावर एकही गाडी दृष्टीपथामध्ये नव्हती. तिला बरोबर घेऊन पटकन क्रॉस केला. दुसऱ्या बाजूला पोचताच ती रडायला लागली. मी म्हणालो, ‘अगं काही लागलं का तुला, का रडतेस? ’ती म्हणाली, ‘आजोबा आता आपण मरणार. मला शाळेत सांगितलंय; रेड मॅन असताना तुम्ही क्रॉस केला तर तुम्ही मरणार.’ मी शरमेनं मान खाली घातली. केवढा मोठा धडा माझ्या चिमुकल्या नातीनं मला दिला होता. नियम पाळलाच पाहिजे, हे किती लहान वयात तिच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. दुर्दैवाने आपल्याकडे नागरिक शास्त्र हा विषय केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे आपण सगळ्यांनीच ऑप्शनला टाकलाय.

लंडनमध्ये कॉलेराच्या विकारानी अगदी महासाथीसारखा हाहाकार माजवला होता. डॉ. जॉन स्नो या साथीच्या रोगाच्या विशेषज्ञाने, जगाला पुढील शतकानुशतके उपयोगी पडेल, असा शोध लावला. कोणतीही महाग औषधे, हॉस्पिटलमध्ये दाखल करणे अशा खर्चिक गोष्टींचा अवलंब न करता फक्त स्वच्छता पाळून, स्वच्छ पाण्याचाच पिण्यासाठी वापर करून रोगराई कशी समूळ नष्ट करता येते हे त्याने सिद्ध केले. सुरुवातीला त्यावर टीका झाली; परंतु नंतर ब्रिटनसह सर्व युरोपियन राष्ट्रांनी या तत्त्वाचे पालन केले व त्या राष्ट्रांमधील आयुर्मर्यादा तब्बल १५ वर्षांनी वाढली. बरोबर दीडशे वर्षांपूर्वीची ही घटना. आज तिची आठवण प्रकर्षाने होत आहे. प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता, नियमांचं पालन करणं आणि सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे नेहमी दुस-याचा विचार करणं ह्या गोष्टी ब्रिटिश नागरिकांच्या; म्हणजे त्यामध्ये पाच टक्के आपण भारतीयांचाही समावेश आहे; अंगात मुरलेल्या असतात. गाडी चालवताना आपण भारतात लाईट फ्लॅश केला की ‘मला जाऊ दे, तुम्ही थांबा’ हा संकेत असतो. ब्रिटनमध्ये लाईट फ्लॅश केला की ‘मी थांबतो, आपण जा’ हा संकेत असतो. किती साधी गोष्ट आहे ही. मी जर इतरांना जाऊ दिले तर क्षणार्धात मलाही कोणीतरी जाऊ देईलच की, अगदी शंभर टक्के. आपले भारतीयही तिकडे याच नागरी संस्कृतीचेच घटक आहेत. म्हणून तर सर्वात महत्त्वाच्या दोन मंत्री पदांवर भारतीय व्यक्ती विराजमान आहेत.

गरज नागरी सभ्यतेची

हे खरेच आहे, की भिन्न वातावरण, भिन्न लोकसंख्या असलेल्या दोन देशांत सरसकट तुलना करणे चुकीचे ठरते. तरीही हे निश्चित, की भारतीय नागरिकांमधील सामाजिक जबाबदारीची जाणीव अर्थात उत्तम सिव्हिक सेन्स विकसित करणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. ‘मला काहीच होणार नाही’ हा खोटा विश्वास फार घातक आहे. आपण तरुण असल्याने आपल्याला मोठा विकार झाला नाही तरी घरी आपल्या आई-बाबांना, मुलांना आपल्यामुळे संसर्ग होऊ शकतो याची जाणीव ठेवणे फार गरजेचे आहे. आम्हा भारतीयांमध्ये पाश्‍चात्त्य देशातील नागरिकांपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती आहे. त्याला सामाजिक जबाबदारीची जोड दिली तरच ही लढाई आपण जिंकू शकतो. निर्बंध असूनही ते कसे धाब्यावर बसवले जात आहेत, हे आपण सध्या पाहतोच आहोत. रस्त्यावर थुंकणे ही ठरवून केलेली क्रिया न होता जणू प्रतिक्षिप्त क्रिया अनेक जणांच्या अंगात भिनलेली आहे. कोव्हिडचा संसर्ग सोडा; पण या सवयींमुळे क्षयरोगासारखे अनेक रोग पसरतात. कोरोनापेक्षा क्षयरोगाने अनेक पटींनी रुग्ण मृत्युमुखी पडतात. प्रत्येकाने रोज दहा वीस व्यक्तींना आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देऊ लागलो, तर गुणाकाराने या जबाबदार वर्तणुकीचा संसर्ग पसरेल. तो कुठल्याही लसीपेक्षा जास्त समर्थपणे काम करेल.

(लेखक नेत्ररोगतज्ज्ञ असून भारत व ब्रिटनमध्ये काम करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com