अंतरीच्या गूढगर्भी

Ratnakar-Matkari
Ratnakar-Matkari

‘भयपटकाराचा तुम्हीच माझ्यावर शिक्का मारला आहे. मी ‘सिंड्रेला’सारखी परिकथा पडद्यावर आणली, तरी तुम्ही त्या भोपळ्याच्या गाडीत मृतदेह शोधत रहाल!’ असे उद्गार काहीशा उद्वेगाने विख्यात दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक यांनी काढले होते. रत्नाकर मतकरींच्या बाबतीत असेच काहीतरी घडले. मतकरींसारख्या बहुआयामी प्रतिभा लाभलेल्या लेखक-कलावंताला गूढकथा आणि भयकथांचा जनक म्हणून पाहाणे खरोखर अन्यायकारक ठरेल. अर्थात त्यांनी मराठी गूढकथांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, यात शंका नाही. मतकरींच्या आधीदेखील मराठीत भयकथा लिहिल्या जात होत्याच. या प्रकारच्या साहित्याबद्दल आधीच रसिकांच्या मनात एक विचित्र कुतूहल असते. भय वाटते, म्हणून भयकथा वाचायच्याच नाहीत, किंवा दचकायला होते म्हणून भयपट बघायचेच नाहीत, असे वाटणाऱ्यांची संख्या तशी कमीच असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

दु:स्वप्नानंतर येणारी जी दिलासादायक सुखद जाग असते, ती रसिकांना देणारा कथाकार श्रेष्ठ दर्जाचा भयकथाकार असतो, अशी एक सर्वमान्य साहित्यिक व्याख्या इंग्रजीत आढळते. मतकरी या व्याख्येत तंतोतंत बसतात. त्यांना आकृष्ट करत असत ते बहुधा मानवी मनाच्या विकार-विलसितांमधले गडद रंग. मनातले हे काळे-करडे अनेकांच्या शोधाचा विषय आहे. मानसतज्ज्ञ शास्त्रीय पद्धतीने त्याचा धांडोळा घेत असतात, तर मतकरींसारखे साहित्यिक ललित अंगाने त्याच विकार-विकृतींचा मागोवा घेत असतात. अंतरीच्या गूढगर्भी सारेच काही कोमल, तरल असे नसते. माणसाच्या मनात बरीच भावनिक चिखलमातीदेखील साचलेली असते. मतकरींसारखे लेखक त्याची तपासणी मोठ्या हिकमतीने करतात. धक्कातंत्र ही मतकरींच्या गूढकथांची आणखी एक खासियत होती. त्यांच्या ‘जेवणावळ’, ‘खेकडा’ आदी कथांमधूनही त्याची चुणूक पाहायला मिळेल. मतकरींचे लिखाण इंग्रजीत असते, तर एव्हाना त्यांना अफाट जागतिक लोकप्रियता मिळाली असती, यात शंका नाही.

मतकरींचे साहित्य गूढकथांपुरतेच मर्यादित कधीच नव्हते. किंबहुना ते या प्रकारच्या प्रांताकडे बऱ्याच उशिरा वळले, असे म्हणावे लागेल. गूढकथांना कमअस्सल मानण्याचा समीक्षकांचा कल त्यांना अस्वस्थ करी. तरीही वेगवेगळे प्रयोग करत मराठी गूढकथांचे दालन अक्षरश: समृद्ध करून ठेवले. या लोकप्रिय दालनातही त्यांनी स्वत:ला अडकवून घेतले नाही. त्यांचा खरा ओढा होता, तो बालनाट्यांकडे. बालनाट्यासारख्या अत्यंत दुर्लक्षित आणि कमालीच्या अवघड मुलखात मतकरींनी केलेले विविध प्रयोग खरेतर अभ्यासाचा विषय ठरावेत. कमालीच्या सातत्याने आणि चिकाटींने त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली आणि रंगमंचावर आवर्जून आणलेली नाटके ही कित्येक पिढ्यांसाठी कोवळ्या वयातले आनंदाचे निधान होते. त्यांचे ‘अलबत्या गलबत्या’ आणि त्यातली सुप्रसिद्ध चेटकीण आजही बच्चेकंपनीला मनमुराद हसवते आणि दचकवतेदेखील! त्यांच्या या कार्याची दखल उशिराच घेतली गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांना बालसाहित्याविषयीचा अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. खरेतर तो केव्हाच त्यांच्या कपाटात यायला हवा होता. थोरांसाठीही त्यांनी ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘माझं काय चुकलं?’सारखी जवळपास सत्तर नाटके लिहिली. त्या निमित्ताने अनेकविध रुपबंध त्यांनी हाताळले. किंबहुना, रुपबंधांचे वैविध्य हे त्यांच्या एकंदर कला कारकिर्दीचे एक ठळक वैशिष्ट्‌य मानावे लागेल. मतकरींनी काय नाही लिहिले? त्यांनी संगीतिका, एकांकिका लिहिल्या.

‘पोर्ट्रेट’ नावाची त्यांची एकांकिका तर स्तिमित करणारा अनुभव होता. लहान-थोरांसाठी नाटके लिहिली, ती दिग्दर्शित केली. ‘जौळ’सारखी क्‍लासिक्‍समध्ये जिम्मा व्हावी, अशी सत्य घटनेवर आधारित कादंबरीही लिहिली. महाभारताच्या अंतिम पर्वावरील त्यांचे ‘आरण्यक’ हे नाटकही गाजले. कथा, कादंबऱ्या, नाटके, मालिका, चित्रपट अशा कितीतरी माध्यमांमधून लीलया संचार करणारे मतकरी त्या त्या माध्यमात गुंतून मात्र पडले नाहीत. त्यांनी मुख्य प्रवाहातील साहित्यच निर्माण केले, परंतु, त्याची पुरेशी समीक्षा आणि सन्मान मात्र झाला नाही, ही खंत त्यांच्या चाहत्या रसिकांच्या मनात आता राहून जाणार. मतकरी आपल्याच विश्वात दंग होऊन राहणारे नव्हते. त्यांची सामाजिक जाणीव तीव्र होती आणि अनेक चळवळींशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले होते.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी रेडिओ श्रुतिका लिहून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तब्बल साडेसहा दशके खळाळत चाललेला रत्नाकर मतकरी नावाचा एक साहित्य प्रवाह अखेर थांबला तो एका इस्पितळाच्या ‘कोविड’ कक्षात. मतकरींचे हे धक्कातंत्र मात्र खरोखर वेदनादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com