Dhing-tang
Dhing-tang

मांत्रिकबाबा! (ढिंग टांग)

सध्या आम्हाला साडेसाती आहे. मन नुसते उबगून गेले. कुणीतरी सांगितले, की बांदऱ्याला एक दिव्य पुरुष राहतात. त्यांना सारे ‘उठाबाबाजी’ म्हणतात. अत्यंत पॉवरफुल आहेत. सहसा ते कुणाला भेटत नाहीत. पण भेट झाली तर काम झालेच म्हणून जा! आश्‍चर्य घडले. बाबाजींना बहुधा आमची कंडिशन अंतर्ज्ञानाने कळली असावी. त्यांचाच निरोप आला. ‘एक वार आकर मिल लें...गारंटी के साथ समस्या का हल हो जायेगा’!! म्हटले जाऊन तर पाहावे!!  
हिय्या करून एकदा गेलो. तिथे दरवाजात एक उंचपुरा माणूस पाय आडवा टाकून उभा होता. आता हे थोडे टेक्‍निकल आहे. दाराच्या एका अंगाला पाठ टेकून उभे राहायचे आणि उजव्या किंवा डाव्या पायाची टाच दाराच्या दुसऱ्या अंगाला टेकवायची. जाणाऱ्याला एकतर उडी मारून किंवा बसकण मारूनच जावे लागते. एक प्रकारचा हा मानवी अडसर असतो. अवघड आहे, पण सरावाने जमते.

‘‘क्‍या चाहिए?’’ त्या अडसराने पृच्छा केली. आम्ही त्रिखंडातील अजीजी गोळा करून चेहऱ्यावर आणली आणि हात जोडत बाबाजींचे दर्शन घ्यायचे आहे, असे सांगितले. त्याने आमच्या खिश्‍याकडे बोट दाखवत ‘किती आणलेत?’ असे विचारले. आम्ही दोन बोटे दाखवली. एक नारळ आणि दोन लिंबे असल्याचेही हाताच्या खुणांनीच दाखवले. अडसर संतापला.

‘‘धर्मशाळा वाटली का...निघा!’’ अडसर म्हणाला. आम्ही हवालदिल झालो. पुन्हा हात जोडले. अडसराचे पाय धरण्यासाठी वाकलो. (एकच होता...दुसरा दाराच्या दुसऱ्या अंगाला चिकटवलेला होता, हा तपशील वर आलेला आहेच. असो.) अडसराचे मन द्रवले असावे. त्याने पाय सरळ केला. आम्ही आत गेलो.

...खोलीत अंधार होता. निळसर प्रकाश वगैरे. धुपाचा गंध दर्वळत होता. नखशिखांत काळ्या झग्यातील एक दिव्य पुरुष धुपदाणी खोलीभर फिरवताना आम्हाला दिसला. हेच ते सुप्रसिद्ध उठाबाबाजी. अध्यात्मसाधनेचे तेज त्यांच्या चेहऱ्यावरून नुसते बेसनपीठासारखे ओसांडत होते. आळीच्या कोपऱ्यावरील पिठाच्या गिरणीतील आमचा कामगारमित्र एरवी आंघोळ करून समोर आला तर आम्ही ओळखत नाही. पण त्याचा पिठुर चेहरा आम्ही ओळखून आहो! त्या दिव्य पुरुषाला बघून आम्हाला गिरणीवाल्याची आठवण यावी, हे तितकेसे ठीक नव्हते. पण...जाऊ दे.

‘‘अजाण बालका, आलास...ये!,’’ अत्यंत कनवाळू आवाजात उठाबाबाजी म्हणाले. आम्ही एक भक्‍तिभरा नमस्कार ठोकला. एक मुजरासुद्धा करून टाकला. 

‘‘गेले काही वर्षे पनौती मागे लागली आहे, बाबाजी! मार्ग दाखवा!!’’ आम्ही हंबरडा फोडला.

‘‘अजाण बालका, तुझ्या पनौतीला कारणीभूत दिल्लीचा एक बाबा आहे. त्याला काळी जादू येते. तंत्र-मंत्र करुन, लिंबू फिरवून दिल्लीच्या बाबाजीने तुझ्यावर करणी केली आहे. त्याच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत! उसकी जादू काटनेवाला पावरफुल बाबा निर्माण होने की आवश्‍यकता आहे..,’’ विचारमग्न सुरात उठाबाबाजी म्हणाले. 

‘‘मग काढा ना आमच्यावरची काळी जादू. मी एक ब्रॉयलर कोंबडी कापायला तयार आहे..,’’ खिसा चाचपत आम्ही म्हणालो. पण घडले उलटेच! उठाबाबाजींनी एक सुस्कारा टाकला. 

‘‘मी त्याची जादू काटली असती...पण..,’’ उठाबाबाजी मान हलवत म्हणाले. 
‘’तुमच्यासारख्या पावरफुल बाबाला काय प्रॉब्लेम आहे? एक मोरपीस झटकाल, तर दिल्लीचा बाबाजी भुर्रकन कुठल्याकुठे उडून जाईल...’’ आम्ही त्यांना उमेद देत म्हणालो.

‘‘मी कुठला काटणार तुझी जादू?,’’ उठाबाबाजी खोल आवाजात म्हणाले, ‘‘बाबा रे, त्यानं सगळ्यात पहिले जादूटोणा माझ्यावरच केला ना, आता तूच ह्यातून बाहेर काढ, असं सांगणार होतो मी!!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com