ढिंग टांग : जंगल व्हर्सेस नमोजी!

Dhing-Tang
Dhing-Tang

जिम कॉर्बेटच्या निबीड अरण्यात एक पावसाळी सकाळ होत होती. नुकतेच उजाडत होते. ढगांच्या दाट पडद्याआड सूर्यदेव बेपत्ता होता. जोरदार पाऊस कोसळणार ह्या आशेने उंचच उंच अंजनाचे झाड मोहरून गेले होते. मी नदीच्या दिशेने चालत गेलो. जरा पुढे चालत गेले की नदीचा उतार लागतो.

शूटिंगचा क्रू माझ्या आधीच पोचला होता. ‘‘आज तुझ्याबरोबर जगातील सर्वांत मोठी व्यक्‍ती ‘गेस्ट’ म्हणून येणार आहे,’’ असे निर्मात्याने मला सांगितले होते. जगातली सर्वांत मोठी व्यक्‍ती म्हंजे साक्षात नमोजीसाहेबच, हे न ओळखण्याइतका का मी खुळा आहे? मागे एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बराकभाऊ ओबामा यांना घेऊन मी ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा कार्यक्रम केला होता. तेव्हा ‘जोवर तू नमोजींना भेटत नाहीस, तोपर्यंत तू काहीही पाहिलेलं नाहीस’ असे ते म्हणाले होते. अशा नमोजीसाहेबांबरोबर जिम कॉर्बेटचे जंगल हिंडायला मिळणार या कल्पनेने मी मोहरून गेलो होतो.

...इतक्‍यात शेजारच्या बोराटीच्या झुडपात खसफस झाली. गवत दबले. सातबायांचा कळप भुर्रकन शेजारच्या झाडपानोळ्यात दडला. सावरीच्या टोकावर बसलेल्या हुप्प्याने ‘खर्रखखक..’ असा धोक्‍याचा संकेत दिला. डाव्या बगलेतल्या पाणवठ्यावर झेपावणारा सर्पगरुड ‘शिट शिट शिटर्रर्र..’ असे नापसंतीदर्शक उद्‌गार काढून उंच वृक्षमाथ्यावर जाऊन बसला. पाणबदके दबकून पाण्यात बुडाली. हुदाळे घाबरून बिळात गेले. हरणांचा एक कळप उधळला. हे सगळे संकेत वाघाच्या चाहुलीचे असतात. मी कान टवकारले... आणि झुडपातून धीम्या गतीने एक आकृती बाहेर आली. मी डोळे घट्ट मिटून घेतले... ‘‘केम छो?’’ कानावर आवाज आला. पाठोपाठ खमंग वास दर्वळला.

भारतात ढोकळा नावाचा एक पदार्थ आहे, त्यासदृश सुगंध होता तो!! मी एक डोळा उघडला. हात्तिच्या! वाघ नव्हता तर... माझ्यासमोर जगातील सर्वांत मोठी व्यक्‍ती साक्षात उभी होती. ज. स. मो. व्य. च्या पाठीवर एक सॅक होती व त्यातूनच तो ढोकळ्याचा गंध येत होता. जिम कॉर्बेटच्या अभयारण्यात कढीपत्त्याची जंगले आहेत. (खरंच!) दिवसभर सांबार (खुलासा : सांबर हा प्राणी आहे, सांबार इडलीसोबत येते. असो!) पीत राहिल्यासारखे वाटते.

ढोकळ्यावरच्या फोडणीतही कढीपत्ता पडतो म्हणे! जाऊ दे. 
‘‘हे बेअर... वेलकम टू इंडिया!’’ ज. स. मो. व्य.ने जोराजोरात शेकहॅंड करत माझे स्वागत केले. 

‘आईग्गं!...थॅंक्‍यू!,’’ मी (कळवळून) म्हणालो. एकमेकांची ओळख झाल्यावर मी त्यांना जंगलाची माहिती देऊ लागलो; पण जंगलात हिंडणे हे नमोजीसाहेबांनासुद्धा नवीन नाही, हे ऐकून मला नवल वाटले. लगोलग मी एक दगडाचे धारदार पाते काठीला लावून त्याचा भाला तयार केला. त्यांच्या हातात दिला. मला गुजराथी येत नसल्याने मी तो हातात घेऊन भोसकण्याची ॲक्‍शन केली. ती पाहून ज. स. मो. व्य. गोरीमोरी झाली. ‘‘कुणाला ठार मारण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. सांभळ्यो? तरी पण असू दे..,’’ हातात भाला पेलत ते म्हणाले.

...त्यानंतर आम्ही एक तात्पुरता तराफा करून नदी पार केली. एका कड्यावरून उतरलो. (त्याआधी चढलो.) पावसात भिजलो. आम्हाला बघायला अनेक हरणे, काळविटे, कोल्हे, बिबटे, वाघ आणि हत्ती येऊन जात होते. नमोजीसाहेबांनी मला सारे जंगल दाखवले. दोन-तीनदा पेचप्रसंगांतून वाचवलेदेखील. आमचे हिंडणे संपले तेव्हा, मी गलितगात्र आणि जायबंदी झालो होतो. 

नमोजीसाहेब ज. स. मो. व्य. का आहेत, ते मला (आणि प्राण्यांना) आता चांगले कळले आहे. पण तो भाला त्यांच्या हातात मी द्यायला नको होता, असे मात्र राहून राहून वाटते. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com