ढिंग टांग : दरवाजा बंद!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सर्व पक्ष सहकारी-
सांगावयास अत्यंत आनंद होतो, की आपल्या अजिंक्‍य, अजेय अशा पक्षाचे भविष्य उज्ज्वल असून देशभर मंदीचे सावट असताना आपला पक्ष मात्र तेजीत आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या पक्षात प्रचंड प्रमाणात ‘इन कमिंग’ झाले. अनेकांनी आपला मोबाइल नंबर तोच ठेवून जुन्या सर्व्हिस प्रोवायडरला ‘बाय बाय’ म्हटले व ते आपल्याला जॉइन झाले.

सर्व पक्ष सहकारी-
सांगावयास अत्यंत आनंद होतो, की आपल्या अजिंक्‍य, अजेय अशा पक्षाचे भविष्य उज्ज्वल असून देशभर मंदीचे सावट असताना आपला पक्ष मात्र तेजीत आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या पक्षात प्रचंड प्रमाणात ‘इन कमिंग’ झाले. अनेकांनी आपला मोबाइल नंबर तोच ठेवून जुन्या सर्व्हिस प्रोवायडरला ‘बाय बाय’ म्हटले व ते आपल्याला जॉइन झाले. गेले काही दिवस आपल्या पक्षात मेगाभरती झाली. या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व पक्षांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्या सहकार्याविना हे सहज शक्‍य झाले नसते. अशाच प्रकारचे मेगाभरती मेळावे भविष्यातही भरविण्याची योजना विचाराधीन आहे. किंबहुना, त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून ‘एक खिडकी’ योजनेअंतर्गत पक्षप्रवेश द्यावा, असा प्रस्तावदेखील तयार होतो आहे. तथापि, काही कारणाने मेगाभरती तूर्त थांबवण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. मेगाभरतीचा अखेरचा कार्यक्रम पार पडला की पुढील इलेक्‍शनपर्यंत घाऊक प्रवेश होणार नाहीत.

यासंबंधी पक्षश्रेष्ठींकडून सूचना प्राप्त झाल्या असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावण्यात आले आहे. यातील ठळक सूचना पुढीलप्रमाणे -
१. स्थानिक पातळीवर मेगाभरतीची आमिषे दाखवणे बंद करावे. रात्री-अपरात्री फोन करून ऑफर देण्याचे उद्योग परस्पर केल्यास त्यास पक्ष जबाबदार राहणार नाही.
२. अखेरची मेगाभरती झाल्यानंतर पक्षकार्यालयाचे दरवाजे (आतून) घट्ट लावून घ्यावेत.
३. खिडक्‍याही कडेकोट बंद करून घ्याव्यात!
४. खिडक्‍या-दारांवरील शटरे, न्हाणीघराची छोटी खिडकी आदी संशयास्पद ठिकाणी खिळे ठोकून पत्रे लावून टाकावेत.
५. ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांना विशेष सूचना : अनोळखी फोन कॉल अजिबात घेऊ नये!
६. ‘मेगा भरती समाप्त’ असा बोर्ड ठळक अक्षरात लिहून तो दाराबाहेर टांगावा.
७. उत्साहात येऊन इच्छुकांस उगीच पुढील तारखा देऊ नयेत. पक्ष उगीच बदनाम होतो.
८. एखादा अतिइच्छुक नेता तुम्हाला ‘मी अमक्‍या अमक्‍या तारखेला, ढमक्‍या ढमक्‍या वाजता पक्षप्रवेश करणार आहे’ असे जाहीर सांगेल. त्याला बळी पडू नये. ‘‘हो क्‍का व्वाव्वा!’’ असे तोंडदेखले म्हणून पसार व्हावे. पुढले सारे वरिष्ठ बघून घेतील!!
९. आधी म्हटल्याप्रमाणे इतर पक्षांनी सहयोग दिल्यामुळेच आपला मेगाभरती कार्यक्रम इतका यशस्वी होऊ शकला. त्या सर्व पक्षाच्या नेत्यांना आभाराचे शुभेच्छापत्र धाडावे!!
१०. नव्याने पक्षात सामील झालेल्या नेत्यांना प्रारंभी बावचळल्यासारखे होईल. त्यांना खेळीमेळीने वागवावे. याला आतिथ्य म्हणतात आणि ‘अतिथी देवो भव:’ ही आपल्या पक्षाची (नवी) नीतीच आहे. चार दिवस पाहुणचार झाल्यावर सतरंजी उचलताना (सतरंजीचे) दुसरे टोंक त्याच्या हाती द्यावे. त्या आधी नको. नवा माणूस घाबरून जाईल, असे त्यास वागवू नये.
११. मेगाभरती बंद झाल्याचे जाहीर केल्यावरही ‘आम्ही आधीच अर्ज टाकून गेलो होतो’ अशी आर्जवे करणारे इच्छुक गोळा होतील. त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवावे किंवा ‘रिझर्वेशन अगेन्स्ट क्‍यान्सलेशन’ पॉलिसीची आठवण करून द्यावी. त्यांचे काय करायचे ते पक्षश्रेष्ठी नंतर सांगतीलच.
१२. अन्य पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे गोपनीय शिफारसपत्र आणल्यास मागल्या दाराने गपचूप प्रवेश देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी. परंतु, त्यासाठी विरोधी पक्षनेत्याचे शिफारसपत्र, आधारकार्ड, तीन वर्षांची आयकर विवरणपत्रे सादर करावी लागतील. स्वच्छ चारित्र्याचा दाखला आवश्‍यक नाही. 

तूर्त वरील बारा कलमे लक्षात ठेवून निवडणुकीच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, ही विनंती. कळावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang