ढिंग टांग : देवमाणूस!

Dhing-Tang
Dhing-Tang

दुपारची जेवणाची वेळ होती. (जेवण नव्हते तरी) मैदान फुलून गेले होते. माणसे खुर्च्यांवर आणि जमिनीवर उपासपोटी बसून होती. भव्य मांडवात चर्चा होती ‘कधी येणार? कधी येणार?’ थोड्या वेळात आभाळात हेलिकॉप्टर घरघरू लागले. ‘आले आले!’ अशी हाकाटी झाली. हेलिकॉप्टर लांब कुठंतरी अदृश्‍य झाले. याच हेलिकॉप्टरात देवमाणूस असणार, याची पब्लिकला (पक्षी : भक्‍तांना) अगदी खात्री होती. एरवी या भागात हेलिकॉप्टर कुठे यायला? ही देवभूमी आहे. पूर्वीच्या काळी इथे देवमाणसे पुष्पक विमानातून हिंडत. - आता हेलिकॉप्टरने हिंडतात. लांब कुठे तरी हेलिकॉप्टरमधून देवमाणूस उतरला. मोटारीत बसून सभेच्या ठिकाणी आला. आल्या आल्या त्याने गर्दीकडे बघून हात हलवला. तोंड भरून हास्य केले. गर्दी भरून पावली...
गर्दी दिसली की देवमाणूस प्रसन्न होतो. नजर जाईल, तिथवर माणसांचा महापूर बघितला की देवमाणसाचे काम भागते. गर्दी हाच प्रसाद! एका देवभोळ्या माणसाच्या यात्रेच्या उद्यापनाला देवमाणूस अतिथी म्हणून आला होता. देवभोळ्या माणसाने तब्बल चार हज्जार दोनशेपन्नास किलोमीटरची यात्रा केली होती. त्या यात्रेचे पुण्य गोळा करायला आलो आहे, असे देवमाणूस नंतर म्हणाला.

देवमाणसाच्या गळ्यातला गमछा (पक्षी : मफलर) अप्रतिम डिझाइनचा होता. आपणदेखील तस्साच गमछा घ्यायचा, असे मंचावरल्या जवळपास सर्व नेत्यांनी मनोमन ठरवले. देवमाणसाने त्याच्या कुर्त्याच्या बाह्या कापून टाकल्या. नेत्यांनीही कापून टाकल्या. देवमाणूस दाढी राखत असल्याने अनेक नेत्यांना आपल्याला दाढी (येत) नाही, याचे वैषम्य वाटू लागले. काही नेत्यांनी तर खोटीच दाढी लावून बघितली. पण असे किती दिवस चालणार?

शिवाय, देवमाणूस असले भारी भारी मफलर खरेदी कुठून करतो, हे पृथ्वीतलावर कोणालाही माहीत नाही. शेवटी (सर्वानुमते) असे ठरले की देवमाणसांच्या पोशाखाची उठाठेव अन्य कोणीही करू नये. देवमाणूस हा देवमाणूस आहे, बाकी सर्व अगदीच ‘हे’ आहेत...

देवमाणसाने मंचावर येऊन महानुभावांच्या तसबिरींना मनोभावे नमन केले. देवमाणूस मंचावर येईपर्यंत अर्धा डझन वक्‍त्यांनी देवमाणसावर स्तुतिसुमनांची उधळण केली होती. स्तुतिसुमनांचा एक प्रॉब्लेम असतो. स्तुती पाठीमागे करावी, पुढ्यात केली तर विचित्र दिसते. मखरात खराखुरा देव येऊन बसल्यास आरती हमखास चुकणार ना? ‘लवथवती विक्राळा’च्याऐवजी काहीच्या बाही मुखातून येणार ना? अगदी तस्से झाले. शेवटी देवमाणसाने स्वत:च ध्वनिक्षेपक ताब्यात घेतला आणि सुरवात केली : ‘‘माझ्या बंधू आणि ब्हगिनींनोंऽऽ...’’
तहानभूक विसरून देवमाणूस बोलत राहिला. भक्‍तांची गर्दी (तहानभूक विसरूनच) ऐकत राहिली. आश्‍चर्य म्हणजे, आधीच्या अर्धा डझन वक्‍त्यांनी स्तुतिसुमने उधळताना जे सांगितले, तेच देवमाणूस स्वत: सांगत होता!
...देवमाणूस आहे, म्हणून देश आहे. म्हणून देशातली माणसे सुखी आहेत. देशात सुरक्षा-सुबत्ता आहे. येत्या पाचेक वर्षांत तर इथे घराघरांतून सोन्याचा धूर येणार! आधीच आला असता, पण चुलीतील धुराचा माताभगिनींना त्रास होतो की नाही? धूर सोन्याचा असला म्हणून काय झाले? त्यासाठीच देवमाणसाने उज्ज्वला योजना आणून धुराचा त्रास कायमचा घालवला. 

तेच देवमाणूस ममतेने सांगत होता. आधीच्या वक्‍त्यांनी सांगितले, ते सारे खरे आहे, असे देवमाणूस म्हणाला. मग गर्दीचा विश्‍वास बसला. येत्या निवडणुकीत आपले मत कुणाला द्यायचे हे गर्दीने (मनोमन) ठरवून टाकले. 
सभा संपली तेव्हा यजमान देवभोळ्या माणसाचे सर्वजण अभिनंदन करीत होते. लोक नमस्कार करून म्हणाले : ...तुम्ही ज्युनियर देवमाणूस आहात!’ 
...अशाप्रकारे देवभोळ्या माणसाचा (ज्युनियर) ‘देव’माणूस त्यावर गोड हसला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com