ढिंग टांग : आरपारची लढाई !

ब्रिटिश नंदी
Monday, 7 October 2019

स्थळ : आरेवनातील मचाण, आरे.
वेळ : काळरात्रीची!
प्रसंग : लढाईचा.
पात्रे : महाराष्ट्राचे समंजस नेते श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य.

स्थळ : आरेवनातील मचाण, आरे.
वेळ : काळरात्रीची!
प्रसंग : लढाईचा.
पात्रे : महाराष्ट्राचे समंजस नेते श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य.

विक्रमादित्य : (आडवे झोपून) बॅब्स...भयंकर अंधार आहे नै?
उधोजीसाहेब : (विनंतीयुक्‍त आवाजात) मी दमलोय रे! त्यातून उगीच अंधाराबिंधाराचं काही बोलू नकोस ना!!
विक्रमादित्य : (त्वेषाने) दमता काय, सामील व्हा! लढाईला तोंड फुटलंय!!
उधोजीसाहेब : आता कसली लढाई? लढाई नको म्हणून तर इतकं केलं ना रे! लढायाबिढायांची नावं घेऊ नकोस आता! शांतपणे माणसानं राज्य करावं! उगीच इथं आणलंस!

विक्रमादित्य : (स्फुरण चढून) व्वा! तुमच्याशिवाय हा लढा अपूर्ण आहे!! गनिमाचे रणगाडे थेट आपल्या हद्दीत घुसलेत! तोफांचे आवाज घुमू लागलेत! गनिमाला पळता भुई थोडी करण्यासाठी आपलं सैन्य झाडाझाडांवर सज्ज झालं आहे! तुम्ही फक्‍त आज्ञा करा!!
उधोजीसाहेब : (हात उडवत) सरहद्दीचं मला काही सांगू नकोस! ते मोदीजी बघून घेतील! इथं कितीवेळ बसायचं आपण?
विक्रमादित्य : (निर्धाराने) लढाई संपेपर्यंत!
उधोजीसाहेब : (कळवळीनं) अरे, आरेवनातली झाडं वाचवायला मचाणावर कशाला बसायला हवं?

विक्रमादित्य : (घनघोर निर्धाराने) इथलं प्रत्येक झाड आपला मावळा आहे, मावळा! त्याच्या जिवाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे! प्रत्येक झाडाला चिकटून बसण्याची आज्ञा मी आपल्या सैनिकांना केली आहे! गनिमाची पहिली गोळी आपल्या छातीतून जायला हवी! त्यातच खरी मर्दुमकी आहे!! हर हर हर हर महादेव!
उधोजीसाहेब : (विव्हळत) यात फिजिकल प्रॉब्लेम आहे! तुझ्या लक्षात कसा येत नाही?

विक्रमादित्य : (क्‍नफ्यूज होऊन) तो कसा?
उधोजीसाहेब : (डोळ्याची दुर्बीण काढत) एक सोडून दोन प्रॉब्लेम आहेत! एक म्हणजे झाडाला मिठी मारून बसलं की गनिमाची गोळी छातीऐवजी पाठीत घ्यावी लागेल! तू प्रयोग करून बघ!
विक्रमादित्य : (खजील होत) अरेच्चा, हो की!
उधोजीसाहेब : (आणखी समंजसपणे) दुसरा प्रॉब्लेम म्हणजे गनिमाची गोळी आपल्या सैनिकाच्या आरपार जाऊन शेवटी झाडाच्या खोडातच घुसेल! म्हंजे झाड वाचणं 
इंपॉसिबल आहे!!

विक्रमादित्य : (त्वेषाने मान हलवत) छे, छे!! इथल्या झाडाचं एक पान मी तोडू देणार नाही! खोड तर दूरच राहिलं! त्या मेट्रोवाल्यांची खोड जिरवण्यासाठीच मी इथं मचाणावर बसलोय!! 
उधोजीसाहेब : (खूपच समंजसपणे) हे बघ, इथून आपण निघू आणि घरी बांदऱ्याला झोपायला जाऊ! कसलं युद्ध नि कसलं काय!! झालं तेवढं बास झालं! निवडणुकीची कामं का कमी आहेत आपल्याला?
विक्रमादित्य : (डोळ्याला दुर्बीण लावत) ते पहा, मेट्रोसेनेचे गनिम कुऱ्हाडी, करवती परजत चालून येत आहेत!
उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडत) कुऱ्हाडी आणि करवती? अरे, आता राफेलचे दिवस आहेत रे! कर्वतीनं कुणी युद्ध लढतं का?

विक्रमादित्य : (वैतागून) मग कर्वतींनी काय करतात?
उधोजीसाहेब : (बेसावधपणे) लाकूड कापतात, लाकूड! आठवतंय ना, मागल्या खेपला आपल्या घरातल्या स्टुलाचा पाय मोडला होता तेव्हा कर्वतीने कापून पुन्हा बसवला होता मी!!
विक्रमादित्य : (निरागसपणे) आठवतंय ना! त्या स्टुलावर न कळत तुम्हीच बसला होता नंतर! तेव्हा-
उधोजीसाहेब : (घाईघाईने विषय बदलत) आपण आता निघू या का?
विक्रमादित्य : (थोडा विचार करत) ओक्‍के! तूर्त मी हे युद्ध पोस्टपोन करतो! आपण सत्तेवर आल्यावर मग बघू! चालेल ना बॅब्स!
उधोजीसाहेब : (आनंदाच्या उकळ्या) अर्थात! हर हर महादेव!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang