ढिंग टांग : एका अर्थतज्ज्ञाची मुलाखत!

Dhing-Tang
Dhing-Tang

‘‘खरं तर तुम्हाला अर्थशास्त्राचं नोबेल मिळायला हवं होतं, असं राहून राहून वाटतं!’’ आम्ही विनम्रभावाने डॉक्‍टरसाहेबांना म्हणालो. ते काही बोलले नाहीत. त्यांनी नकारार्थी मान डोलावली. बहुधा ‘चहात दोन चमचे साखर घालू का?’ या आधी विचारलेल्या प्रश्‍नाचे ते उत्तर देत असावेत. काय असेल ते असो, आम्ही आमचा चहाचा कप पुढ्यात ओढला. भारतातल्या गरिबीवर प्रयोग करून इतर अर्थतज्ज्ञलोक नोबेलबिबेल मिळवतात. किंबहुना, भारतातली गरिबी हा नोबेलविजयाचा एक मार्गच आहे. त्याबद्दल आमच्या मनात दाटून आलेले वैषम्य आम्ही ग्लुको बिस्कुटासोबत चहाच्या कपात बुडवले. फारा दिवसांनी डॉक्‍टरसाहेब मुंबईत आले होते. त्यांची मुलाखत घेण्याची दुर्मीळ संधी असून, त्यांना तूर्त वेळही बराच असल्याने मुलाखत प्रदीर्घ काळ घेता येईल व देशासमोरील आर्थिक समस्यांची उकल करून घेता येईल, असे वाटून आम्ही तातडीने मुलाखतीसाठी गेलो होतो. 

‘डॉक्‍टरसाहेबांच्या काळात बॅंका बुडायला सुरवात झाली’, असा आरोप सध्याचे अर्थमंत्री करताना दिसताहेत. तुमचं मत?’’ पहिलाच प्रश्‍न आम्ही असा थेट स्टंपावर टाकल्यामुळे डॉक्‍टरसाहेब गप्प झाले.

‘नो कमेंट’’ ते परखडपणे म्हणाले. आम्ही पुन्हा चेंडू हातात घेऊन रनअपच्या दिशेने चालू लागलो. हे अर्थात मनातल्या मनात घडले, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. अर्थशास्त्रज्ञाची मुलाखत घेताना असे करावे लागते. 

‘सध्या देश आर्थिक संकटातून जात आहे..,’’ नवीन बातमी फोडताना टीव्हीवरील अँकर जो सूर लावतात, तोच नकळत आमचा लागला. त्याने डॉक्‍टरसाहेब थोडे दचकले. ते दचकले म्हणून आम्हीही दचकलो. 

‘महाराष्ट्रात तर खेळखंडोबाच झाला आहे...’’ वास्तविक हे पुढील वाक्‍य आम्ही कुजबुजीच्या लेव्हलवर बोललो होतो. पण त्यानेही डॉक्‍टरसाहेब दचकलेच. साहजिकच आम्हीही पुन्हा दचकलो. आर्थिक चर्चा करताना आमची अशी दचकादचकी होतेच. त्यात डॉक्‍टरसाहेब पडले नामांकित अर्थतज्ज्ञ. आता एखादा अर्थतज्ज्ञ जरा दचकला की आमचा हात नकळत प्यांटीच्या मागल्या खिशाकडे जाणारच. मग नाही म्हटले तरी ओशाळायला होते. मागल्या खिशाच्या पाकिटात आहे कुठे दमडी? उगीच दचकायला होते, एवढेच.

‘आमच्या चुकांमधून मोदीजींनी काही शिकायला हवं होतं, असं तुम्ही काल म्हणालात!’’ चहाने आलेल्या तरतरीने आम्हाला काही बोलायला सुचले. हा चांगला प्रश्‍न होता. खेळायला म्हटले तर सोपा, पण चूक झाली तर विकेट गेलीच म्हणून समजा!

‘हं!’’ डॉक्‍टरसाहेबांनी विस्तृतपणे आपली बाजू मांडली. वास्तविक ते काही बोलणार नव्हते. कारण मुलाखतीची सुरवातच ‘नो कमेंट’ या उत्तराने झाली होती. त्यामानाने हे उत्तर विस्तृतच म्हटले पाहिजे.

‘तुमच्या नेमक्‍या काय चुका झाल्या? त्यापैकी कुठल्या चुकांमधून नव्या सरकारला काही शिकता आले असते?’’ आम्ही थोडा अवघड बॉल टाकला. त्यावर डॉक्‍टरसाहेबांनी एक सुस्कारा टाकला. मग दीर्घ श्‍वास घेतला. चहाचा कप बशीत नीट मांडून ठेवला. मग कपबशी सरकवून सुरक्षित अंतरावर नेली. पुन्हा एक सुस्कारा टाकून ते म्हणाले, ‘‘हं!’’

...त्यांचे उत्तर टिपून घेण्यासाठी आमची प्रचंड धावपळ झाली. पुढल्या वेळी ध्वनिमुद्रणाचे यंत्र आणायचे, असा निर्णय आम्ही मनोमन घेऊन टाकला.
‘‘भारत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होऊ शकेल ना?’’ आम्ही भविष्यवेधी भाकित विचारले. त्यावर त्यांनी गपकन डोळे मिटले. मग उघडले.
‘‘मला कठीण वाटतं!’’ त्यांनी भविष्यवाणी उच्चारली. थोडावेळ मुलाखतीच्या दालनात शांतता पसरली. वातावरण गंभीर झाले. अखेर भानावर येऊन ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी आम्ही तातडीने उठलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com