ढिंग टांग : काय ठरलं होतं?

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

यांचं आणि त्यांचं नेमकं
काय ठरलं होतं?
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय जातं?

काहीही असेल ठरलं,
तुम्हाला काय करायचंय?
आपलं झाकून दुसऱ्याचं,
वाकून कां बघायचंय?

यांचं आणि त्यांचं नेमकं
काय ठरलं होतं?
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय जातं?

काहीही असेल ठरलं,
तुम्हाला काय करायचंय?
आपलं झाकून दुसऱ्याचं,
वाकून कां बघायचंय?

असं वागणं नाही बरं
लोकशाहीचं नाही खरं
सत्तेचं आहे हे भिरभिरं

त्या भिरभिऱ्यालाच माहीत
वाऱ्याचं काय म्हणणं होतं...
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय जातं?

आधी म्हणे ठरलं की
घालू गडे गळ्यात गळे
पोत्यात धावण्याच्या शर्यतीत
पाहू कोण पुढे पळे?

एका पोत्यात दोन पाय
दात दिसतील, हसता काय
तुमच्या नाकात दोन पाय

गळ्यात गळे घातल्यानंतर
गळे धरण्याचंच ठरलं होतं,
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय जातं?

इलेक्‍शन झालं, मतदान झालं
पिसाळलंय सत्तेचं भूत
येळकोट जाता जात नाही
राजकारणाला आलाय (रा)ऊत

राहू दे असाच येळकोट
औंदा कमी पडले व्होट
आपलेच दात, आपलेच ओठ

थोडं रडू, थोडं कुढू, थोडं थोडं
दोघे पडू, असंच तर ठरलं होतं
तोंड वर करून विचारायला 
तुमचं काय जातं?

कडाकडा भांडू आणि
शेवटी एकत्र येऊ
उरावर बसू नाही तर
एका ताटात जेऊ

एक घास तुला
एक घास मला
एक घास चिऊला

एक अधिक एक बरोबर
दोन, हे गणित चूक असतं,
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय जातं?

खुर्चीसाठी सारे काही
सारे काही सफेद झूट
सगळेच मित्र गळेकापू
शत्रूसंगे जमे मेतकूट

दिसतं तसं नसतंच
एक्‍झिट पोल फसतंच
खुर्चीचं भूत हसतंच

ज्याचा डोळा लौकर लवेल,
त्याचंच नेहमी फावतं
तोंड वर करून विचारायला
तुमचं काय हो जातं?

आघाडी असो किंवा युती
सगळ्यांचीच होणार माती
कोणाच्या दिव्यासाठी
कोण वळतंय बघा वाती

लागेल हो दिवा
बदलेल हो हवा
मिळेल मुख्यमंत्री नवा!

नव्याच्या स्वागताला आपण
पुन्हा तयार राहायचं असतं

त्यांचं आणि यांचं नेमकं
काय ठरलं होतं?
पुन्हा पुन्हा असं कधी
विचारायचं नसतं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang