ढिंग टांग : रिव्हर्स म्यारेथॉन!

Dhing-Tang
Dhing-Tang

शिवसेनेचे संपादक आणि महाराष्ट्राचे मुखपत्र आणि आमचे बालमित्र मा. संजयाजी राऊतसाहेब यांची म्यारेथॉन मुलाखत घेतल्याशिवाय काही तरणोपाय नाही, हे गेल्या चौदा दिवसांत आमच्या लक्षात आले. गाडीचे ब्रेक फेल झाले की कसबी चालक ती चढावर नेऊन थांबवतो, त्याप्रमाणे मा. राऊतसाहेबांची बोलती फायनली बंद करणे हे मा. उधोजीसाहेबांच्या हातात असल्याचे आम्ही ताडले. एरवी दरवर्षी राऊतसाहेब मा. उधोजीसाहेबांची म्यारेथॉन मुलाखत घेतात. (उट्टे फेडण्यासाठी) राऊतसाहेबांचीच म्यारेथॉन मुलाखत मा. उधोजीसाहेबांनीच घेऊन महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा, या उदात्त हेतूने आम्ही मा. उधोजीसाहेबांना गळ घातली. थोरामोठ्यांच्या मुलाखती थोरामोठ्यांनीच घ्याव्यात, असे आम्ही (पुण्यात गेल्या वर्षी घडलेल्या महामुलाखतीचा संदर्भ देऊन) त्यांना पटवू शकलो. मग ते ‘हो’ म्हणाले! मुलाखत पार पडली. ती अर्थातच प्रदीर्घ झाली. सहा भागांत ती डब्बल पानी छापावी, असे प्रारंभी मत होते. यथावकाश छापू!! त्या

ऐतिहासिक मुलाखतीचा हा थोडासा अंश -
प्रश्‍न : जय महाराष्ट्र!
राऊतसाहेब : (एक नाही की दोन नाही...) ????

प्रश्‍न : (अचंब्यानं) तुम्ही बोलत का नाही?
राऊतसाहेब : (कुजबुजीच्या सुरात) समोर माइकचं बोंडूक ठेवा, साहेब! त्याशिवाय आमची जीभ सुटायची नाय!

प्रश्‍न : (घाईघाईने बूमचा माइक ठेवत) हां, सुरू व्हा!
राऊतसाहेब : (खूश होत) जय महाराष्ट्र! विचारा!!

प्रश्‍न : (पहिलाच प्रश्‍न) तुम्ही हल्ली रोज सकाळी स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना कामाला लावता, अशा गंभीर तक्रारी आहेत!
राऊतसाहेब : (शांतपणे) सकाळी मला वेळ असतो म्हणून! पुढे बोला!

प्रश्‍न : (नेहमीप्रमाणे सुरवात करत) क्‍या चल रहा है?
राऊतसाहेब : (सुप्रसिद्ध जाहिरातीप्रमाणे) फॉग चल रहा है! तुमच्या म्यारेथॉन मुलाखतीत तुम्ही नेहमी हेच उत्तर देता! मी कॉपी मारली! बोला!! 

प्रश्‍न : (खवळून) मुलाखत आम्ही घेतोय! बोला काय, बोला!
राऊतसाहेब : (पत्रकार परिषदेत आरामशीर बसल्यागत) विचारा!

प्रश्‍न : (गंभीरपणे) राज्यात सरकार स्थापन अजून होत नाही...
राऊतसाहेब : (आरामशीर) मग?

प्रश्‍न : (गंभीरपणे) कोण जबाबदार?
राऊतसाहेब : (डोळे मिटून) कळेल!

प्रश्‍न : (संतापून) उत्तर द्या ना! ही काय पत्रकार परिषद आहे का उडवाउडवीची उत्तरं द्यायला! 
राऊतसाहेब : (भानावर येत) सॉरी! पण मला तेवढीच उत्तरं येतात!

प्रश्‍न : (कपाळाला आठ्या घालत) असली बयानबाजी काय कामाची?
राऊतसाहेब : (करारी आवाजात) मैं कभी बयानबाजी नहीं करता! मी माझ्या पक्षप्रमुखांची भूमिका समोर ठेवत असतो!

प्रश्‍न : (गोंधळून) म्हंजे कोणाची?
राऊतसाहेब : (दुप्पट करारी आवाजात) तुमचीच!

प्रश्‍न : (सर्द होत) तुम्हाला कोणी सांगितले हे उद्योग?
राऊतसाहेब : माझी बाजू नेहमी सत्याची असते!

प्रश्‍न : (विषय बदलत) बरं बरं! गेले चौदा दिवस तुम्ही इतकं बोलला आहात की आणखी काही बोलायचं राहून गेलंय का?
राऊतसाहेब : (बराच वेळ आठवून)...हल्ली मासे फार महाग झालेत! तेवढं सांगायचं राहून गेलं होतं...

प्रश्‍न : (दुजोरा देत) पापलेट दीड हजाराला गेलं! मासे आणि भाज्या दोन्ही भयंकर महागल्यात! बांधाच्या अलीकडे सामान्य माणूस मरतोय आणि पलीकडे शेतकरी! कोण आवाज उठवणार?
राऊतसाहेब : (निर्धाराने) उद्या सकाळी नऊ वाजता भांडुपला आमच्या बंगल्यावर या! मी उठवतो आवाज!

प्रश्‍न : (सावरून बसत) शेवटला प्रश्‍न! सरकार स्थापनेचा तिढा सुटला की रोज सकाळी फावल्या वेळात म्हंजे नऊ वाजता तुम्ही नेमकं काय करणार आहात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com