ढिंग टांग : चिठ्ठी आई है..!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : खरं तर निघून गेलेली. काळ : खरं तर चुकलेला.
प्रसंग : ओढवलेला. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम कडवट फर्जंद.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : खरं तर निघून गेलेली. काळ : खरं तर चुकलेला.
प्रसंग : ओढवलेला. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम कडवट फर्जंद.

(अत्यंत अस्वस्थ चेहऱ्यानं मा. उधोजीराजे दालनात येरझारा घालीत आहेत. वारंवार खिडकीशी जाऊन कुणाची तरी वाट पाहात आहेत. मधूनच घड्याळाकडे पाहून हवालदिल होत आहेत. अब आगे...)
उधोजीराजे : (हात पाठीमागे बांधून येरझारा घालत) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येऊन) बोहोला, महाराज! काय काम काहाडलं?
उधोजीराजे : (संतापून) मुजरा राहिला!
फर्जंद : (जुलमाचा मुजरा घालत) घ्या! 
उधोजीराजे : आमच्याकडे कुणी येऊन गेलं होतं?
फर्जंद : (हात मागे बांधून) कंदी?
उधोजीराजे : (राग गिळत) कंदी काय कंदी! गेल्या दिवसभरात, आत्ता कुणी आम्हाला भेटायला आलं होतं का?
फर्जंद : (थंड आवाजात) मेलेला उंदीर बी न्हाई!
उधोजीराजे : (चुळबुळत) मेलेला उंदीर काय करायचाय? (जरा विचारात पडत) बरं, कुणाचा काही निरोप बिरोप?
फर्जंद : (दातात काडी घालून) चुक..!
उधोजीराजे : नीट उत्तर दे! चुक काय करतोस?
फर्जंद : (काडी थुंकत निर्विकारपणे) चुक...ऱ्हायलं!
उधोजीराजे : निरोप आला होता का? सांग ना!
फर्जंद : (खांदे उडवत) नाही जी!
उधोजीराजे : कुणाची काही चिठ्ठी चपाटी?
फर्जंद : (ओठ काढत) हल्ली कोन कोनाला चिठ्या पाठवतंय? व्हाट्‌सॲप आहे की!
उधोजीराजे : (अस्वस्थपणे) आम्ही फोन बंद करून ठेवलाय ना! म्हणून विचारतोय!
फर्जंद : (थंडगार आवाजात) विजेचं बिल आलं होतं मघाशी! झालंच तर दूधवाला बिल दिऊन गेला! 
उधोजीराजे : (त्राग्याने) ते राहू दे रे! निरोप, सांगावा, पत्र, खलिता, प्रस्ताव असं काही घेऊन कुणी आलं होतं का? एवढंच विचारतोय! 
फर्जंद : (अचंब्यानं) प्रस्ताव? कुनी आपल्याला कशाला दिईल प्रस्ताव! प्रस्ताव आपन द्यायला पायजेलाय ना?
उधोजीराजे : (दात ओठ खात) मला राजकारण शिकवू नकोस! विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं दे! ‘सिल्वर ओक’कडून कुणी चिठ्ठी घेऊन आलं होतं का?
फर्जंद : शिल्वर ओक? कुटंशी आलं ह्ये गाव? 
उधोजीराजे : (खडसावून विचारत) दिल्लीहून कुणी माणूस आला होता का?
फर्जंद : (गोंधळून) नाही जी! 
उधोजीराजे : (खिडकीशी जाऊन उभे राहात) असं कसं होईल? कुणाचा तरी निरोप किंवा पत्र यायलाच हवं! एवढं नाट्य घडत असताना...
फर्जंद : हिर्र हिर्र...झ्या...झ्या...झ्या..!
उधोजीराजे : (गोंधळून मागे होत) काय झालं?
फर्जंद : (खिडकीतून बाहेर पाहात) ते कमळाबाईचं कबूतर व्हो! गेले कित्ती तरी दिस रोज घिरट्या घालतंय आणि खिडकीवर बसून गुटरगूं गुटरगूं करतंय! लई बाजिंद पाखरु हाय त्ये! दिलं हाकलून!! (एकदम आठवून) त्याच्या पायाला चिठ्ठी दिसली होती बघा! आनू का धरून?
उधोजीराजे : (खचून खाली बसत) जे हवं ते पत्र कधीच येत नाही आणि नको, ते हमखास दारात येतं! नियतीचा हा काय खेळ फर्जंदा? ललाटीचे भोग हे! दुसरं काय?
फर्जंद : (खिडकीकडे जाऊन) ऑ...ऑ...ऑ...ऑ...ये...ये...ये की रं!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang