ढिंग टांग : अखेरचा दिवस

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

आदरणीय मा. फडणवीससाहेब,
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मु : सध्या (तरी) ‘वर्षा’ बंगला. बॉम्बे.

प्रत रवाना : मा. उधोजीसाहेब,
मातोश्री, वांद्रे, मुंबई.

विषय : मंत्रालयातील मंत्रिमहोदयांचे दालन खाली करणेबाबत.

आदरणीय मा. फडणवीससाहेब,
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मु : सध्या (तरी) ‘वर्षा’ बंगला. बॉम्बे.

प्रत रवाना : मा. उधोजीसाहेब,
मातोश्री, वांद्रे, मुंबई.

विषय : मंत्रालयातील मंत्रिमहोदयांचे दालन खाली करणेबाबत.

महोदय,
सर्वप्रथम आपल्याला बाल दिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! अत्यंत जड अंतःकरणाने हे पत्र लिहीत आहे. आपल्या विकासाभिमुख आणि शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ राबणाऱ्या सरकारात मी पाच वर्षे मंत्री होतो. काल रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिदालन खाली करून देण्याचे निर्देश पत्राद्वारे प्राप्त झाले. (क्रमांक : काताबा-२०१९/प्र. क्र.१९४/२०१९/२१-अ) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दालन रिकामे करून व त्याची साफसफाई करून दालनाचा ताबा सामान्य प्रशासन विभाग/का. क्र. २१-अ’ यांच्याकडे द्यावा, असा निर्देश होता. थोडक्‍यात, ‘तुमचे चंबुगबाळे आवरा आणि निघा’ असेच त्यात (सरकारी भाषेत) फर्मावण्यात आले होते.
थोर जनादेश मिळाल्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ असे मला(ही) वाटले होते. लौकरच याच दालनात आपण परतू, या विश्‍वासाने मी बऱ्याच गोष्टी तेथे ठेवून दिल्या होत्या. परंतु, हाय! सा. प्र. वि.चे पत्र आल्यावर खचून गेलो! मी पुन्हा येईन असे वाटले होते. पण, ते सामान गोळा करायला येईन, असे नव्हते वाटले!! असो.
खरोखर दालन रिकामे करावयाचे आहे का? याची शहानिशा करण्यासाठी मी माझ्या (माजी) मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना फोन करून विचारणा केली. एक म्हणाला, ‘‘मी ऑलरेडी पोती भरतो आहे!’’ दुसरा एक मंत्री स्टुलावर चढून दालनातील माळा साफ करण्यात बिझी होता, असे सांगण्यात आले. तिसरा तर स्फुंदून स्फुंदून रडू लागला! अखेर मी धीर एकवटून दालन रिकामे करण्यासाठी शेवटचा तेथे गेलो. 
एक फेरफटका त्या रिकाम्या दालनात मारला. याच दालनात बसून मी कित्येक मीटिंगा घेतल्या. नोकरशहांना फैलावर घेतले. अनेक शिष्टमंडळांचे स्वागत केले, काही शिष्टमंडळांना फुटवलेही! इथेच बसून मी शेकडो फायलींवर हजारो कावळे (पक्षी : सह्या) काढले. शेरेबाजी केली. इथल्याच अँटी चेंबरमध्ये बसून गुप्त बोलणी पार पाडली. या दालनात दुपारची झोप किती सुंदर लागत होती, म्हणून सांगू? मन भरून आले होते.
...पाच वर्षांत माणूस किती पसारा निर्माण करतो? विविध सत्कार समारंभात मिळालेली मानचिन्हे, ताम्रपट, भेटवस्तू, शाली, शोभिवंत वस्तू आणि अनावश्‍यक नस्ती (पक्षी : फायली) असा सारा पसारा पोत्यांमध्ये भरून ठेवण्याचे काम दिवसभर करून अंग मोडून निघाले. किती ते अहवाल, किती ते रिपोर्ट... किती त्या धारिका? माणसे एवढे अहवाल का तयार करतात? हे एक मला कोडेच पडले. अनावश्‍यक कागदपत्रे फाडून फाडून हाताला फोड आले. अखेर सगळा ‘माल’ पोत्यात भरून दालन स्वच्छ करून किल्ली शिपायाकडे दिली.
‘‘पुन्हा येणार ना?’’ त्याने आपुलकीने विचारले. पण, मला ते विचारणे तितकेसे आवडले नाही. या प्रश्‍नाचे मी काय उत्तर देणार होतो? काहीही न बोलता मी माझ्या प्रिय मंत्रालयाचा मजला सोडला. मजला उतरताना पाय जड झाले होते. 
...हे सारे पाच वर्षे तुमच्यामुळे भोगता आले. त्याबद्दल तुमचे आभार. आणखी काय लिहू? पुन्हा भेटू, असे लिहायला लेखणी रेटत नाही. कळावे. 
आपला. एक माजी (अहह!) मंत्री.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang