ढिंग टांग : सूत्रे : एक चिंतन!

Dhing-Tang
Dhing-Tang

सूत्रे म्हणजे काय? याविषयी थोडके चिंतन आज आपण करू. सूत्रे म्हणजे संस्कृत साहित्य व व्याकरणातील किंवा तत्त्वज्ञानातील काही नीतिनियम असे म्हटले जाते; पण तो एक गैरसमज आहे. उपनिषदांचे अन्वयार्थ सांगणारी अनेक सूत्रे समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य अशा चार पदांमध्ये विभागलेली आहेत, असे जरी प्राचीन ग्रंथात म्हटले असले तरी ते मान्य होण्यासारखे नाही. उदाहरणार्थ योगसूत्रात एकंदरित १९६ सूत्रे दिली आहेत.(असे म्हंटात!) आमच्यामते एवढी सूत्रे एकाठेपी वाचून काढणे हा द्राविडी प्राणायामच असणार! तेव्हा हीदेखील वावडीच असावी. आमच्या मते सूत्रे ही बातमी देणारी एक यंत्रणा किंवा व्यक्‍तींचा समूह असावा!

पुराव्यादाखल आम्ही सांप्रतकाळी जोरात असलेल्या टीव्ही च्यानलांवरील ‘ब्रेकिंग न्यूज’च्या धबधब्याकडे बोट दाखवू! ही ब्रेकिंग न्यूजे तथा ‘वृत्तमोड’ ‘सूत्रा’नीच दिलेली असतात, हे आपण दररोज पाहातोच आहो! 

पत्रकारितेत (योगाप्रमाणे) सूत्रे नावाची एक गोष्ट असते व या सूत्रांनी सध्या ‘ब्रेकिंग न्यूज’चा सपाटा लावला आहे. त्यायोगे टीव्हीसमोर एकदा बसल्यावर पुन्हा पुन्हा उठणे, या सूत्रांनी सध्या मुश्‍किल केले आहे. ‘महाशिवआघाडीचे सरकार निश्‍चित!’, ‘नव्या सरकारात दोन उपमुख्यमंत्रिपदे, तीन महसूल मंत्रिपदे व आठ सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदे मिळणार’ अशा प्रकारच्या धक्‍कादायक बातम्या ही सूत्रे अहर्निश देत आहेत. त्यामुळे सामान्यजनांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. च्यानलगणिक सूत्रे बदलत आहेत. नेमका कुठल्या सूत्रांवर विश्‍वास ठेवावा, हे आकळेनासे झाल्यामुळे जगण्याचे सूत्रच हरवले आहे.

सकाळी नवाच्या सुमारास शिवसेनेचे मुख्य संपादक संजयाजी राऊतसाहेबांनी टीव्हीचा स्लॉट बुक केल्यानंतर तर आम्हांस (गेले दोन आठवडे) बद्धकोष्ठतेचा विकारच जडला. गृहस्थ (टीव्हीसमूोन) जागचा उठू देईल तर शपथ! खरे तर सकाळच्या वेळी माणसाला असे एका जागी खिळवणे माणुसकीला धरून नाही. त्यामुळे राऊतसाहेब हेच स्वत: एक सूत्र असावेत, असा संशय आमच्या मनात अनेक दिवस घर करून बसला होता. 

कोण आहेत ही सूत्रे? या सूत्रांना पगार कोण देते? ती एवढ्या कार्यक्षमतेने पत्रकारिता कशी काय करू शकतात? असे अनेक प्रश्‍न मराठी माणसाच्या मनात आहेत. त्याची काही उत्तरे आम्हाला सूत्रांकडूनच प्राप्त झाली आहेत. ती अशी -
सूत्रे सामान्यत: दोन प्रकारची असतात. एक, विश्‍वसनीय सूत्रे आणि दोन, रेग्युलर सूत्रे! 

हा बहुधा ‘होल मिल्क’ आणि ‘टोण्ड मिल्क’ यामध्ये जसा फरक असतो, तसाच आहे. रेग्युलर सूत्रे ही थोडी कमी दर्जाची असतात, विश्‍वसनीय सूत्रांचा चांगला दबदबा राहातो, असे मानण्यास मात्र जागा आहे. इतके जबरदस्त कार्यक्षम असूनही ही सूत्रे कशी दिसतात हे कुणालाही माहीत नसते. काही लोकांच्या मते ही सूत्रे शिवसैनिकांसारखी दिसतात, तर काहींच्या मते ती थोडीशी भाजपाईंसारखी दिसतात. तर काही जणांच्या अभ्यासानुसार ती कांग्रेसवाल्यांसारखी दिसतात. तर काहींना या सूत्रांचे धागे राष्ट्रवादी कार्यालयापर्यंत गेलेले दिसतात. काहीही असले, तरी ही सूत्रे नावाची चीज कमालीची गोपनीय असते, एवढे मात्र खरे.

बातमीच्या वजनाप्रमाणे सूत्रे ‘विश्‍वसनीय’ आहेत की ‘रेग्युलर’ हे ठरते. या सूत्रांना बातमीदारीसाठी कोणीही पगार किंवा पगारवाढ देत नसते, असेही आमच्या कानावर (सूत्रांकडूनच) आले आहे. 

कुठलीही बातमी या सूत्रांना पहिले समजते, मग वाचक अथवा प्रेक्षकांना! राजकीय पुढाऱ्यांना ती सर्वात शेवटी समजते, असे कळते. सूत्रापेक्षा सूत्रधार महत्त्वाचा असतो, हेच यातून सिद्ध होते. या सूत्रधारासंबंधी सध्या काही ब्रेकिंग न्यूज नाही, असे आम्हाला सूत्रांनी निक्षून सांगितल्यामुळे तूर्त येथेच थांबतो. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com