फर्मान! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

‘‘ऐका हो ऐका!
फर्मान जारी करणेत येत आहे की-
जो कोणी सामान्य नागरिक
सुजन वा कुजन,
सुष्ट वा दुष्ट
सच्छील वा मच्छील, 
योगी वा भ्रष्ट
दर्यादिल वा गटारदिल
सुबाहु वा कुबाहु
लकी वा अनलकी
पर्मनंट वा काळजीवाहू
कोणीही कोणीही कोणीही-
राजा किंवा राजसेवकांकडे
वक्र दृष्टीने पाहील, त्याची
चार धडे चौमार्गी टाकून,
त्यास हत्तीचे पायी लोटून,
शीलबंद पोतेबंद अवस्थेत 
तोफेच्या तोंडी देणेत येऊन,
कायमचे मुर्दाबाद करणेत
येईल होऽऽऽ....’’

‘‘ऐका हो ऐका!
फर्मान जारी करणेत येत आहे की-
जो कोणी सामान्य नागरिक
सुजन वा कुजन,
सुष्ट वा दुष्ट
सच्छील वा मच्छील, 
योगी वा भ्रष्ट
दर्यादिल वा गटारदिल
सुबाहु वा कुबाहु
लकी वा अनलकी
पर्मनंट वा काळजीवाहू
कोणीही कोणीही कोणीही-
राजा किंवा राजसेवकांकडे
वक्र दृष्टीने पाहील, त्याची
चार धडे चौमार्गी टाकून,
त्यास हत्तीचे पायी लोटून,
शीलबंद पोतेबंद अवस्थेत 
तोफेच्या तोंडी देणेत येऊन,
कायमचे मुर्दाबाद करणेत
येईल होऽऽऽ....’’

राजा अथवा राजसेवकांची
प्रच्छन्न टवाळी करणे
खोट्यानाट्या तक्रारी गुदरणे,
अनैतिक टीकाटिप्पणी करणे,
त्यांस विनोदविषय करणे,
ट्रोलिंगभेदाचा बळी करणे,
इतकेच नव्हे, त्याच्या घरातील
श्‍वानास ‘हाड’ करणे, वा
हाडास हुडुत करणे,
हे सारे दंडविधान कलमान्वये
गंभीर व दुर्मिळातील दुर्मिळ
गुन्हे असल्या कारणाने
कडी से कडी सजा पाने के लिए
पात्र ठरतील, ह्याची कृपया
संबंधितांनी नोंद घ्यावी, होऽऽऽ...
यदाकदाचित कर्मधर्मसंयोगाने
तसे करावयाचे झाल्यास तत्पूर्वी
राजा अथवा राजसेवकांची
पूर्वपरवानगी सहीशिक्‍क्‍यानिशी
घेणे बंधनकारक आहे, होऽऽऽ...

तेव्हा-
राजा भिकाऽऽरी, राजानं टोपी चोऽऽरली...
असं तुम्हाला आता म्हणता येणार नाही.
तसे म्हणायचे असेल तर
आधी अर्ज करणे अनिवार्य आहे...

राजाला शेपूट फुटले, ही बातमी
आता आम्हाला छापता येणार नाही,
तुम्हाला वाचता येणार नाही,
तसे तुम्हाला किंवा 
(फॉर दॅट मॅटर) आम्हाला
करायचे असेल तर
आधी अर्ज करणे अनिवार्य आहे...

राजाचे कान लांब झाले हेही
तुम्हाला कोणाच्या कानातही
सांगता येणार नाही,
खड्डा खणून त्यात कोकललात,
तरीही तो कायद्याने गुन्हा आहे,
तसे कोकलायचे असेल तर
आधी अर्ज करणे अनिवार्य आहे...

‘पोपट मेला आहे’ हे धादांत असत्य
तर बिलकुलच सांगता येणार नाही
कारण तसे सांगायचे तर
आधी अर्ज करणे अनिवार्य आहे...

तथापि,
आपण एवढेच म्हणू शकतो की-
श्रीमंत राजाच्या मस्तकावरील
टोपी ही कोणे एके काळी
आपल्या मस्तकावर होती
-राजास पाठीमागील बाजूस
फुटलेला एक्‍स्ट्रा अवयव
आपल्याकडेही होता, पण
उत्क्रांतीच्या धामधुमीत 
तो अखेर गळून पडला
-राजाचे कान लांब असले
तरी ते हलकेही आहेत
-संगमोत्सुक पोपटाने
फक्‍त चोच वांसली असून
तो गाढ झोपी गेला आहे...
इतकेच.

Web Title: editorial article dhing tang

टॅग्स