गर्दीचे रूपांतर मतात करण्याचे आव्हान

निखिल पंडितराव
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांना अपेक्षित यश येत नव्हते. राज्याच्या राजकारणावर सहकाराच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राने नेहमीच घट्ट पकड ठेवली.

पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांना अपेक्षित यश येत नव्हते. राज्याच्या राजकारणावर सहकाराच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राने नेहमीच घट्ट पकड ठेवली.

त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व ठेवले, तर ग्रामीण भागात शिवसेनेने हळूहळू आपली ताकद वाढविली. गेल्या पाच वर्षांत भाजपने आपला विस्तार दिल्लीपासून ग्रामपंचायतीपर्यंत करण्याचे ठरवून धोरण राबविण्यास सुरवात केली. त्यानुसार भाजपने हळूहळू पश्‍चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले. सर्वांत आधी त्यांनी पुणे व सांगली जिल्हा ताब्यात घेतला.

नंतर कोल्हापूर व साताऱ्यातही पाय रोवले. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपवासी झाले आणि भाजपला बळ मिळाले.

लोकांशी संवाद साधायचा आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांतील अनेकांना धक्का देण्याचे काम केले, तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील आपली ताकद दाखवून दिली. साताऱ्यातील ‘राष्ट्रवादी’चे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश आणि नंतर लगेच महाजनादेश यात्रा निघाल्यामुळे सातारा जिल्ह्यात भक्कम साथ मिळाल्याचा दावा भाजप करीत आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ठरविलेल्या योजनेप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्याचे नियोजन यशस्वी होत असल्याचे भाजपला वाटते.

मित्रपक्ष शिवसेनेलाही डिवचले
दुसरीकडे, महाजनादेश यात्रेत अनेक ठिकाणी भाजपने उमेदवारही जाहीर केले. मतदारसंघ शिवसेनेकडे असला, तरी आता ‘आमदार भाजपचाच...’ अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोल्हापुरातील कागल मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. परंतु, त्या ठिकाणी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगेंना आमदार म्हणून घोषित केले. साताऱ्याची लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी नरेंद्र पाटील यांना भाजपमधून शिवसेनेत धाडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्या जागेचा प्रश्‍न कायम असताना उदयनराजे यांना जवळपास खासदार केल्यासारखेच महाजनादेश यात्रेतून दाखविण्यात आले. यातून भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग तर लावलाच; पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही डिवचले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाबरोबर गटा-तटाच्या राजकारणालाही महत्त्व आहे. अनेकदा पक्ष बाजूला राहून स्थानिक गटा-तटाची अस्मिताच अधिक महत्त्वाची ठरते आणि भल्याभल्यांना धूळ चारण्याचे काम हे गट-तट करीत आले आहेत. सत्तेच्या पटावर खेळ मांडताना जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. मतदारराजा हुशार आणि तेवढाच सजग झाला आहे. नेत्यांसमोर बोलायचे एक आणि नंतर मतदारयंत्रातून दाखवायचे दुसरेच, असेही होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम भाजपवर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी महाजनादेश यात्रेत गर्दी झाल्याचे दिसले. विजयाच्या घोषणाही झाल्या. या सगळ्याचे मतात रूपांतर करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Nikhil Panditrao