Women's day 2021 : दिल्ली अब भी दूरही है...!

Womens_Day
Womens_Day

Women's day 2021 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज दिवसभर प्रत्येकाच्या हातातील मोबाईलला आणि हाताच्या बोटांना भरपूर काम आहे. स्त्रीशक्तीच्या अभीष्टचिंतनाचे, शुभेच्छांचे संदेश एकमेकांना दिले-घेतले जाणार आहेत. सुंदर सुंदर सुभाषितांनी आणि कल्पक चित्रांनी मोबाइल फोनच्या गॅलऱ्या भरुन जाणार आहेत. अर्थात वेळ मिळेल तेव्हा ती संदेशचित्रे डिलीट करुन नव्या संदेशांसाठी जागा करुन ठेवावी लागणारच आहे. पण ती तर समाजमाध्यमी जगाची रीतच म्हणायची. महिला दिनाचे चटकदार संदेश इतके दिवस कोण जपून ठेवते? समाजमाध्यमांप्रमाणेच टीव्हीच्या वाहिन्यांवर स्त्री-शक्तीचा यथोचित जागर होईल. यशस्वी स्त्रियांच्या यशोगाथा पार्श्वसंगीतासह दाखवल्या जातील. त्या कहाण्या बघून आपण आपले मध्यमवर्गीय डोळे पुसू. अशा कहाण्यांनी टेंपरवारी का होईना, पण स्फुरण चढते. मनातली समानतेची जाणीव थोडी आणखी प्रखर होते. ट्रॅक्टरपासून टीशर्टपर्यंत आणि सायकलपासून साबणापर्यंत आपली उत्पादने खपवता खपवता जाहिरातदारही स्त्रीशक्तीला सलाम मारतील. तेदेखील आपण स्वीकारु.

आजचा दिवस तरी काही पुरुष मंडळी -विनोदाच्या आवरणाखाली का होईना- हसत हसत स्त्रियांचे कर्तृत्त्व मान्य करतील. शिवाय ऑनलाइन सोहळे, चर्चा-परिसंवाद आहेतच. स्त्रीच्या पराक्रमी चरित्राचे तिथे आकडेवारीनिशी गोडवे गाईले जातील. त्यांना हल्ली ‘सक्सेस स्टोरीज’ असे म्हणायचे असते. समानतेच्या दिशेने जगाला नेणारा अखिल स्त्रीजातीचा लढा अजून संपलेला नाही, या वाटेवर अजूनही भरपूर काटे आहेत, याची पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे उजळणी होईल. इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे स्त्रीत्त्व तर आज हटकून आठवेल. सरोजिनी नायडूंपासून सिंधुताई सपकाळांपर्यंत सर्व थोरामोठ्यांची उदाहरणे दिली जातील. रीतीभातीनुसार सारे काही यथासांग पार पडल्यानंतर दिवसभराचा हा महिला दिनाचा सोहळा आपल्यापुरता संपेल. वर्षानुवर्षे हेच चालू आहे. पण समानतेचे ते प्रकरण काही अजून हाती लागायला तयार नाही. दिल्ली अब भी दूर है…

कुणी म्हणेल, ऐन महिला दिनीच असा गेंगाणा सूर का? अन्य जागतिक दिवस जसे होतात, तसा महिला दिन आनंदात साजरा केला तर बिघडले कुठे? महिलांनी सामान्य किंवा पारंपरिक पद्धतीने आपला सण साजरा करुच नये का? आणि मुदलात, दरवेळी सणासुदीच्या दिवशी चिंतनाचे असे काडेचिराईती दळण हवेच कशाला? या म्हणण्यामध्येही खरोखर तथ्य आहेच. महिला दिनाच्या प्रयोजनाला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. किंबहुना, हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागावा, हाच साऱ्यांचा उद्देश असला पाहिजे. पण हे सारे करताना वस्तुस्थितीचा विसर मात्र पडता कामा नये, एवढे खरे. होते काय की सकारात्मकतेच्या आविर्भावामुळे उग्र वास्तवाचे दर्शन प्रासंगिकतेचे कारण देऊन टाळले जाते. उपग्रहाच्या शक्तिशाली दुर्बिणीने आपला फोकस अधिकाधिक तीव्र करत जमिनीनजीकचे टिपायला जावे तर अधिकाधिक विदारकतेचे दर्शन होणार, हे ठरलेले आहे. कारण जमिनीलगतचे वास्तव फार वेगळे असते.

जगाचा नकाशा पसरुन समानतेच्या भिंगातून बघायला गेले तर लक्षात येते की तब्बल १२२ देशांनी आजवर स्त्रीजातीचे नेतृत्त्व अजून पाहिलेलेदेखील नाही. खासदारकी- नामदारकीपर्यंत पोचू शकलेल्या स्त्रियांची टक्केवारी तर जेमतेम २४ टक्के आहे. आणि बहुतेक ठिकाणी स्त्रिया निर्णय प्रक्रियेपासून दूरच आहेत. कोरोनाकाळात संशोधनापासून सामाजिक कार्यापर्यंत अनेक आघाड्यांवर स्त्रियाच लढताना दिसल्या, हे खरेच. ज्या ‘मेसेंजर आरएनए ’ या एकसूत्री बंधाच्या संशोधनाच्या जोरावर कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात आली, त्या मूलभूत संशोधनाचे श्रेय महिला संशोधकांनाच जाते. याखेरीज खऱ्याखुऱ्या संघर्षात जीव धोक्यात घालून लढणाऱ्या कोविडयोद्ध्यांमध्ये महिलाच आघाडीला होत्या. इतके असूनही या योद्ध्या महिलांचा पगार पुरुषांपेक्षा सरसकट साडेअकरा टक्के कमीच असल्याचे ध्यानी आले आहे. असे का? याला उत्तर नाही.

कोरोनाच्या लढाईत देशोदेशी कृतिदले स्थापन करण्यात आली. तब्बल ८७ देशांच्या कृतिदलांच्या कामाचे निरीक्षण केल्यावर असे दिसून आले की, या कृतिदलांमध्ये ‘समानतेचे तत्त्व’ साडेतीन टक्के एवढेच पाळले गेले. असे का? यालाही उत्तर नाही. यंदा संयुक्त राष्ट्रांनी महिला दिनाचे सूत्र ‘नेतृत्त्वातील समानता’ असे ठेवले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी जो अहवाल प्रसिध्द केला, त्यातली ही आकडेवारी आहे. नेतृत्त्वातील समानतेचे लक्ष्य गाठण्यासाठी सध्याच्या वेगाने गेल्यास आणखी १३० वर्षे लागतील, असे हा अहवाल सांगतो.
नवी पिढी ही प्रत्यक्ष समानतेकडे नेणारी पिढी आहे. आधीच्या पिढ्यांना विचार-आचार, माहिती, ज्ञान हे सारे पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि शिक्षकांमार्फत मिळत होती. जगण्याचा आशय पारंपरिक मार्गांनी भेटीला येत होता. हाच जगण्याचा आशय नव्या पिढीच्या ओळखीचा होतो तोच मुळी डिजिटल माध्यमांमधून. समाजमाध्यमांशी नाळ जुळलेल्या या नव्या पिढीनेच पुढे यावे, संवाद करावा, प्रश्न विचारावेत, जुन्या चौकटी मोडून काढाव्यात, आणि समानतेचा लढा ‘अंजाम’ तक न्यावा, असा विचार यंदाच्या जागतिक
महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील व्यासपीठांवर मांडला जातो आहे. तंत्रज्ञान हातवळणी पडलेच आहे, आता समतेची आधुनिक मूल्येही अंगवळणी पडावीत. आज निर्धार करायला हवा तो ही वाटचाल वेगाने करण्याचा. त्यानेच या दिवसाचे सार्थक होईल.

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com