esakal | अग्रलेख : जय महाराष्ट्र! जय बांगला!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena-BJP

हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मिता यांपलीकडे शिवसेनेचे राजकारण जात नाही, हेच आतापर्यंतच्या वाटचालीचे वास्तव आहे. दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यामुळे कधीतरी ‘सेक्‍युलर’ची हाळी दिली जाते एवढेच.

अग्रलेख : जय महाराष्ट्र! जय बांगला!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मिता यांपलीकडे शिवसेनेचे राजकारण जात नाही, हेच आतापर्यंतच्या वाटचालीचे वास्तव आहे. दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यामुळे कधीतरी ‘सेक्‍युलर’ची हाळी दिली जाते एवढेच.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पंगा घेऊन, महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन केल्यानंतर आता त्या दोन पक्षांतील खणाखणी दिवसेंदिवस अधिकच तेज होत चालली आहे. त्याचीच परिणती आता शिवसेनेने पश्‍चिम बंगालच्या रणधुमाळीत उडी घेण्यात झाली आहे. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांचे राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणास लावलेली असताना, त्या अटीतटीच्या लढाईत शिवसेनेने उडी घेण्यामागील कारण स्पष्ट आहे आणि ते भाजपला धडा शिकवण्यापलीकडे अन्य काहीही असू शकत नाही. खरे तर ‘महाविकास आघाडी’त काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर, प. बंगालमध्ये निवडणुका लढवताना शिवसेनेने काँग्रेसबरोबर प. बंगालमध्येही आघाडी करायला हवी होती. मात्र, त्याऐवजी शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना या निवडणुका अर्थातच हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवणार असून, भाजपच्या मतपेटीत होता होईल तेवढा खो घालून ममतादिदींना सहाय्य करणे, एवढाच शिवसेनेचा त्यामागील हेतू आहे. तो शिवसेनेने लपवूनही ठेवलेला नाही. मात्र, या नव्या मैदानात उतरताना, शिवसेनेने आपल्याच पूर्वेतिहासाकडे एक नजर टाकायला हरकत नव्हती. उत्तर प्रदेश तसेच बिहार या राज्यांच्या गेल्या पाच वर्षांतील विधानसभा निवडणुका लढवण्याचे धारिष्ट्य दाखवून शिवसेनेने तेथे आपली फटफजिती करून घेतली असतानाही आता शिवसेना ही खेळी करत आहे. त्याचवेळी कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करून घेण्यास शिवसेना वचनबद्ध आहे, अशा गमजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मारल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हाती आल्यानंतरही शिवसेना प्रादेशिक अस्मिता तसेच हिंदुत्व या दोन भावनिक मुद्यांपलीकडे विचार करायला तयार नाही. शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसाच्या प्रश्नावरून झाली आणि पुढे सोयीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ मध्ये मुंबईत विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या एका पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली. मात्र, त्यास तीन दशके उलटल्यानंतरही उद्धव ठाकरे त्या पलीकडला विचार करायला तयार नाहीत, यावर एकाच दिवशी आलेल्या या दोन बातम्यांनी मोहोर उमटवली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरे तर मतदारांना हिंदुत्ववादीच पक्षाला मतदान करावयाचे असेल, तर ते भाजपला सोडून शिवसेनेच्या कच्छपी का लागतील, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर बिहार तसेच उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील मतदारांनी शिवसेना उमेदवारांची अनामत रकमा जप्त करून अनेकदा दिले आहे. २०१५मध्ये झालेली बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेने मोठा गाजावाजा करून लढवली होती. मात्र, तेव्हा उभ्या करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ७३उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. तरीही नाऊमेद न होता शिवसेनेने पुन्हा गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत २२उमेदवार रिंगणात उतरवले. त्यांचीही तीच गत झाली. दरम्यान, २०१७मध्ये उत्तर प्रदेशातही शिवसेनेने ७३उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यापैकी एकाची अनामत वाचवण्यापर्यंत तेव्हा शिवसेना यशस्वी झाली! याचा अर्थ शिवसेनेची ध्येय-धोरणे महाराष्ट्राबाहेर जराही प्रभाव टाकू शकत नाही, हाच आहे.

खरे तर शिवसेनेने स्थापनेपासून पुढची किमान दोन दशके प्रादेशिक अस्मिता हाच आपला मुद्दा केला होता आणि आता पश्‍चिम बंगालमधल्या अटीतटीच्या झुंजीत उतरत असताना हिंदुत्वाच्या मुद्याला बंगाली अस्मितेची फोडणीही दिली जाणार आहे. देश आता अधिकाधिक तरूण झालेला आहे; या तरुणांच्या विचारपद्धतीदेखील बदलल्या आहेत. त्यांच्यापुढील प्रश्नसुद्धा वेगळे आहेत. शिवसेना मात्र आपल्या प्रादेशिक अस्मितेपलीकडे विचार करू शकत नाही; कारण आर्थिक वा अन्य प्रश्नांवर ना बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भूमिका मांडली ना उद्धवही आता त्या पुढे जायला तयार आहेत.

खरे तर नोव्हेंबर २०१९मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच, उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘राजकारणाची धर्माशी सांगड घालणे, ही आमची मोठीच चूक झाली आणि त्याचे फटकेही शिवसेनेला बसले आहेत,’ असा जाहीर कबुलीजवाब दिला होता. मात्र, त्यानंतर भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी वारंवार शंका उपस्थित करताच दसरा मेळाव्यात उद्धव यांनी रूद्रावतार धारण करत हिंदुत्वाचा नारा दिला. त्यानंतर काँग्रेसने डोळे वटारले. तेव्हापासून कधी हिंदुत्वाचा गजर तर कधी ‘सेक्‍युलर’ची हाळी अशी कसरत शिवसेनेला करावी लागत आहे. खरा प्रश्न आता पन्नाशी ओलांडलेली शिवसेना कधी तरी राजकारणाचा साकल्याने विचार करणार की नाही, हा आहे.

केवळ भावनिक राजकारण आणि बाळासाहेबांचा व्यक्तिगत करिष्मा यांच्या जोरावरच जर राजकारण करत राहिले तर मते मिळूही शकतात; पण राज्याबाहेर कोणीही विचारत नाही, अशी शिवसेनेची अवस्था आहे. निवडणूक आल्यानंतर त्या राज्यात अचानक उमेदवार उभे केले म्हणजे जनाधार मिळतो, असे नाही.  त्यामुळे भाजपविरोध हाच आता शिवसेनेने आपला कार्यक्रम बनविल्याचे दिसते आहे. पण बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरून भाजपच्या मतपेढीला हादरा देण्याचे मनसुबे ‘मातोश्री’वरील खलबतखान्यापुरतेच राहतील, हे सांगायला कोणत्याही होरारत्नाची गरज नाही.

Edited By - Prashant Patil