esakal | अग्रलेख : दहशतवादाचा ‘विषाणू’
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist

काश्‍मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनेचा म्होरक्‍या रियाज नियाकू अखेर दक्षिण काश्‍मीरमधील अवंतीपुरा परिसरात झालेल्या लष्कराच्या कारवाईत  ठार झाला आहे. बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतरच्या वर्षभरात "हिज्बुल'ची सूत्रे नायकूच्या हाती आली होती. त्याला ठार करण्यात यश आल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी हिंदवाडा परिसरात लष्कराच्या कमांडिग ऑफिसरच्या अतिरेक्‍यांनी केलेल्या निर्घृण हत्येचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे.

अग्रलेख : दहशतवादाचा ‘विषाणू’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

काश्‍मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनेचा म्होरक्‍या रियाज नियाकू अखेर दक्षिण काश्‍मीरमधील अवंतीपुरा परिसरात झालेल्या लष्कराच्या कारवाईत  ठार झाला आहे. बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतरच्या वर्षभरात "हिज्बुल'ची सूत्रे नायकूच्या हाती आली होती. त्याला ठार करण्यात यश आल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी हिंदवाडा परिसरात लष्कराच्या कमांडिग ऑफिसरच्या अतिरेक्‍यांनी केलेल्या निर्घृण हत्येचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे. या कारवायांमागे दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळत असलेली रसद आणि चिथावणी कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदवाडा येथे ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी काही काश्‍मिरींना ओलीस ठेवले होते, त्यावरूनच ते स्पष्ट झाले होते. त्यावेळी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर या काश्‍मिरींची सुटका झाली होती. मात्र, त्या कारवाईत एक मेजर आणि कर्नलसह ५ हुतात्मा झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत कमांडिग अधिकारी मारले गेल्याचे उदाहरण सहसा बघावयास मिळत नाही. यापूर्वी अशी घटना नोव्हेंबर २०१५मध्ये घडली होती आणि तेव्हा कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते.

अफगाणिस्तानात झालेल्या सरशीमुळे दहशतवादी संघटनांना चेव आला आहे. काश्‍मिरातील कारवाया वाढण्यास ही परिस्थिती कारणीभूत आहे. हिंदवाडातील हत्याकांडाकडे या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. त्याच हत्याकांडाचा बदला भारतीय लष्कराने दोन दिवसांत रियाज नायकू यास ठार करून घेतला आहे. नायकूच्या मृत्यूमुळे  "हिज्बुल' च्या आणखी एका म्होरक्‍याचा शेवट झाला असला, तरी अवघ्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत नायकू हे  नावही काश्‍मिरी जनतेस ठाऊक नव्हते. "हिज्बुल'चा खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा बुऱ्हान वाणी २०१६ मध्ये लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे यासीन इट्टू उर्फ महमद गझनवी याच्याकडे आली होती.

मात्र, अवघ्या वर्षभरात म्हणजे २०१७ मध्ये तोही एका कारवाईत ठार झाल्यानंतर केवळ पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तग धरून असलेल्या "हिज्बुल'ची सूत्रे नायकूकडे आली होती. तेव्हापासून काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे नायकूचाच "ब्रेन' होता. कुलगाम येथे झालेले सहा परप्रांतीय मजुरांचे हत्याकांड असो, की जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयानंतर शोपियॉं परिसरात झालेली फळविक्रेते आणि ट्रकचालकांची हत्या असो, की एक सरपंच आणि दोन नागरिकांची हत्या असो; या साऱ्या हत्या नायकू यानेच घडवून आणल्या.

भारतीय सुरक्षा यंत्रणा तेव्हापासून नायकूच्या शोधात होत्या आणि त्यासाठी १२लाख रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले होते. आता "हिज्बुल'चा आणखी एक म्होरक्‍या मारला  गेल्यानंतर तरी अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांना आळा बसणार काय, हाच प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला आहे. कोरोना विषाणूच्या फैलावानंतरही  गेल्या महिनाभरात सुरक्षा दलांचे एकूण १८ अधिकारी व जवान दहशतवादी कारवायांमध्ये हुतात्मा झाले आहेत. त्यामुळेच नायकू मारला गेल्यामुळे काश्‍मीरमधील सुरक्षा दलांचा हा मोठा विजय समजला जात आहे. शिवाय, गेल्या दहा दिवसांत "हिज्बुल'बरोबरच "अन्सर  गझवटूल हिंद' या आणखी एका दहशतवादी संघटनेला निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. 

खरे तर कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील दहशतवादी संघटनांना शस्त्रसंधीचे आवाहनही संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केले होते. मात्र, त्याला एखाददुसरा अपवाद वगळता कुठेच प्रतिसाद मिळाला नाही. काश्मिरात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांनी तर उलट या काळात घातपाती कारवाया वाढवल्या. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांना पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात घुसवत असल्याचा आरोप गेल्याच महिन्यात जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केला होता. पाकिस्तानच्या या कुरापती माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, यात शंकाच नाही. बालाकोट येथील हल्ला आणि कलम ३७० रद्दबातल करण्यात आल्यानंतर खोऱ्यात वाढवण्यात आलेली अभूतपूर्व  सुरक्षा, या पार्श्‍वभूमीवर गेले काही महिने या भूतलावरील नंदनवनात शांतता प्रस्थापित होण्याची आशा जरा कुठे निर्माण होत होती. ती धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या  अस्वस्थतेचा फायदा घेत पाकिस्तानने आपल्या जुन्याच कारवाया आणि त्याही अधिक तीव्रतेने पुन्हा सुरू केल्याची प्रचिती आता येत आहे. या कारवायांमध्ये थेट लष्करालाच लक्ष्य करण्यात येत असून, २०१२नंतर असे प्रथमच घडत आहे. त्यामुळेच नायकू ठार झाला असला, तरी या कारवायांना लगेच प्रतिबंध बसेल, अशा भ्रमात राहता येणार नाही. उलट, नायकूच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न  "हिज्बुल' करणार, हे गृहीत धरून, सुरक्षा दलांना आता अधिकच दक्ष राहावे लागणार आहे. काश्मिरातील जनजीवन पूर्ववत व्हावे, यासाठीचे राजकीय पातळीवरील प्रयत्नही आवश्यक आहेत.

loading image