esakal | अग्रलेख : नैतिकता, नाईलाज आणि नाटक!
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan-Bhavan

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तसे घडले असते आज महाविकास आघाडीच्या सरकारवर; विशेषत: शिवसेनेवर जी काही नामुष्की ओढवली आहे, त्यातून त्यांची सुटका झाली असती.

अग्रलेख : नैतिकता, नाईलाज आणि नाटक!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तसे घडले असते आज महाविकास आघाडीच्या सरकारवर; विशेषत: शिवसेनेवर जी काही नामुष्की ओढवली आहे, त्यातून त्यांची सुटका झाली असती.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर १५ महिन्यांनी  या सरकारला पेचात पकडण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. भाजप नेत्यांचे घणाघाती आरोप आणि त्यामुळे सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण यांची परिणती अखेर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाग पडण्यात झाली आहे. गेले तीन आठवडे राज्याच्या राजकीय रंगमंचावर; तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ही जी काही रणधुमाळी सुरू होती, त्याचा अपरिहार्य शेवट हाच होता. मात्र, तो शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून ओढवून घेतला, असेच म्हणावे लागते. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील अवघ्या २२ वर्षांच्या युवतीच्या आत्महत्येनंतर ती आणि वनमंत्री राठोड यांच्या संभाषणाच्या ज्या काही ध्वनिफिती तसेच काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत होत्या, त्यावरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तसे होते तर आज या सरकारवर आणि विशेषत: शिवसेनेवर जी काही नामुष्की ओढवली आहे, त्यातून त्यांची सुटका झाली असती. मात्र, पूजाच्या आत्महत्येनंतर स्वत: राठोड हे १५ दिवस गायब झाले आणि त्या काळात राज्य सरकारनेही काही हालचाल केल्याचे जाणवले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे तर भाजप नेते हे सरकार स्थापन झाल्या दिवसापासून, या सरकारवर ना ना प्रकारचे आरोप करून, शिवसेनेला पेचात पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या हाताला काहीच लागत नव्हते. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणामुळे राठोड तसेच उद्धव ठाकरे यांनी जो वेळकाढूपणा केला, त्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले. असेच चित्र गेल्या तीन आठवड्यांत जे काही घडले, त्यामुळे उभे राहिले आहे. या सरकारवर भाजपने केलेला हा पहिला ‘गोल’ आहे, अशी मर्दुमकी आता भाजप नेते मिरवीत आहेत. मात्र, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात गोंधळ घालण्याचे भाजपचे मनसुबे उधळून लावले, हेही लक्षात घ्यायला हवे. याच तीन आठवड्यांच्या काळात राठोड यांनी जे काही केले, त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतात. दोन आठवड्यांच्या अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर राठोड यांनी सारा बंजारा समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा करीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट राज्यावर आणि विशेषत: विदर्भावर घोंगावत असताना, सारे नियम धुडकावत, प्रचंड गर्दी जमा करून झालेल्या या अश्लाघ्य शक्तिप्रदर्शनामुळे भाजपच्या हल्ल्याची धार अधिकच तीक्ष्ण झाली, हे खरेच आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, या संघर्षास त्यामुळे आणखी एक परिमाण लाभले. वैयक्तिक आयुष्यात झालेल्या आरोपांच्या संदर्भात आपला समाज आणि समाजाचे पीठ वेठीस धरावयाचे, असा घातक रिवाज त्यातून पडणे हे राज्याच्या हिताचे नव्हते. पूजाच्या आत्महत्येनंतरही बंजारा समाजातील काही पुरुषवर्ग ज्या पद्धतीने राठोड यांच्या बचावासाठी उभे राहिला, ते बघता आपल्या एकूणच समाजातील पुरुषी मानसिकतेचेही दर्शन घडले. या मानसिकतेचा निषेध करावा तेवढा थोडा होईल. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आत्महत्येचे वृत्त येताच राठोड यांचा राजीनामा घेतला असता, तर  हे सारेच टाळता येऊ शकले असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पूजा तसेच राठोड यांच्या संबंधातील बरेच तपशील व्हीडिओ क्लिप्स तसेच ध्वनिफिती यामधून बाहेर आले होते. त्यामुळे संशयाची सुई ही राठोड यांच्याभोवती भिरभिरत होतीच. मात्र, उद्धव यांनी हे प्रकरण विनाकारण नको इतके लांबवले. पूजाच्या मृत्यूची सखोल आणि निःपक्ष चौकशी होऊन, दोषींना शिक्षा झाली, तरच पूजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असे म्हणता येईल.

अर्थात, या विलंबास ‘महाविकास आघाडी’ल ताणेबाणेही काही प्रमाणात कारणीभूत आहेत. राठोड प्रकरणास वाचा फुटण्यापूर्वी आणखी एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने काही आरोप केले होते. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिला, तरच राठोड राजीनामा देतील, असे डावपेच खेळले गेले. मात्र, या दोन्ही प्रकरणात कमालीचा फरक आहे; कारण राठोड प्रकरणात एका युवतीचा बळी गेला होता. अर्थात, भाजप नेते या राजीनाम्यानंतरही शांत झालेले नाहीत. त्यांनी आता याच दोन प्रकरणांवरून विधिमंडळात कामकाज होऊ न देण्याची घेतलेली भूमिका ही त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांत रस नसल्याचे दाखवते. विधिमंडळात होणारा कलगीतुरा हा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच रंगला. स्वत: उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन भाजप नेत्यांच्या दुटप्पी तसेच दुतोंडी वर्तनाचे अनेक दाखले दिले. त्यापासून भाजप नेत्यांनी काही बोध घेऊन आता विधिमंडळाचे कामकाज सुरळीत पार पडेल, हे तर पाहिले पाहिजेच,पण सभागृहात जनतेचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर येतील, हे पाहिले पाहिजे. ती त्यांची विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीही आहे.

Edited By - Prashant Patil

loading image