अग्रलेख : नाराजांचे स्थैर्य!

Shivsena-and-Congress
Shivsena-and-Congress

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याबाबत दिलेल्या ग्वाहीपेक्षा अधिक चांगल्या शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी कोणत्या असणार? त्याहीपेक्षा आणखी एक योगायोग असा, की थोरात यांनी या ‘शुभेच्छा’, या सरकारबाबत कुरकुरीचा सूर गेल्याच महिन्यात लावणारे राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्या आहेत!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले काही आठवडे या सरकारमधील काँग्रेसच्या राज्यस्तरावरील अनेक बड्या नेत्यांनी निर्णयप्रक्रियेत पुरेसे स्थान मिळत नसल्याचा सूर लावला होता. हा आवाज वाढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला दूत काँग्रेस नेत्यांकडे धाडला. तरीही नाराजीच्या त्या सुराची पट्टी काही कमी झाली नाही. त्यामुळे हा वाद थेट ‘मातोश्री’च्याच चावडीवर नेण्याचे काँग्रेसने ठरवले.

तेव्हा आपले सरकार ज्या काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, त्या पक्षाच्या बड्या नेत्यांना भेटीची वेळ देण्यातही उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि एक माजी मुख्यमंत्री असे दोन नेते मंत्रिमंडळात असूनही ते मुख्यमंत्र्यांना थेट जाऊन भेटू शकत नाहीत, यावरून या त्रिपक्षीय सरकारमधील विसंवाद कोणत्या थराला गेला आहे, हे कळते. मात्र, अखेर थोरात व अशोक चव्हाण यांना उद्धव ठाकरे भेटले आणि त्यानंतर थोरात यांनी ‘आम्हाला या सरकारच्या निर्णयप्रक्रियेत बिलकूलच डावलले जात नाही! - आणि हे सरकार स्थिरच आहे’ अशी मखलाशी केल्यामुळे अखेर काँग्रेसनेत्यांना हे सत्तेपोटी आलेले शहाणपण आहे, असेच म्हणावे लागते. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय रंगमंचावर पाच आठवडे जे काही नाट्य रंगले, त्याचे सूत्रधार अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. मात्र, शिवसेना व ‘राष्ट्रवादी’ या दोन पक्षांच्या मोटेत आपण सामील व्हायचे की नाही, याबाबत काँग्रेस नेते पहिल्यापासूनच साशंक होते. अखेरीस भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवता येणे आणि पाच वर्षे राज्यात सत्तेपासून दूर राहावे लागण्याची अवस्था टळणे, या दोन मुद्द्यांनी बाजी मारली आणि काँग्रेसने आघाडीत सामील होण्याचे ठरवले. तेव्हापासून मंत्रिपदे असोत वा खात्यांचे वाटप असो; अशा अनेक कारणांनी या आघाडीत काँग्रेस मनापासून सहभागी नसल्याचे दिसले. त्यामागे उद्धव ठाकरे यांचे वर्तनही काही अंशी कारणीभूत आहे, हे नाकारता येणार नाही.

नोव्हेंबर २०१९मध्ये ही आघाडी सत्तारूढ झाली आणि नंतर अवघ्या तीन महिन्यांत कोरोनाचे थैमान सुरू झाले. ही उद्धव यांची अनेक अर्थाने सत्त्वपरीक्षा होती. त्यात ते यशस्वी होत असल्याचे पहिल्या महिनाभरातील चित्र नंतर पुसट होत गेले. या संकटाच्या काळातही मुख्यमंत्री सर्वांना बरोबर घेऊन कारभार करत आहेत, असे जनतेला वाटले नाही. शरद पवार व मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी होत राहिल्या; पण कारभार तसेच प्रशासकीय यंत्रणा यासंबंधातील या चर्चेत काँग्रेसला सहभागी करून घेतले आहे वा त्यांच्या मताचा आदर होत आहे, असे दिसून आले नाही. त्यामुळे निव्वळ गरजेपोटी एकत्र आलेल्या या तीन पक्षाचे सरकार स्थिर असल्याचे सांगणे काँग्रेसला भाग पडले आहे. सत्ता हे असे लोहचुंबक असते की त्यासाठी मित्रच काय शत्रूंबरोबरही हातमिळवणी होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच सरकार स्थिर आहे, असे सांगतानाच बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या कारभाराबाबतच्या कल्पना समजून घ्यायला हव्यात, असे सांगत आपली नाराजी पूर्णार्थाने शमलेली नाही, याचेच संकेत दिले. 

अर्थात, आघाडी सरकारमध्ये आणि त्यातही अवघ्या सहा महिन्यांपूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आल्यावर त्यात कुरबुरी होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ यांच्या १५ वर्षांच्या सरकारच्या काळात हे तुलनेने समविचारी पक्ष एकत्र असताना ‘सारे काही आलबेल’ कधीच नव्हते. आताही विधानपरिषदेच्या १२ लोकनियुक्‍त सदस्यांच्या यादीवरून काँग्रेसने मतभेदाचा झेंडा उभारलाच आहे. शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ यांचे मत पक्षीय बलानुसार या जागा तीन पक्षांत विभागल्या जाव्यात, असे असताना काँग्रेसला मात्र समसमान वाटप हवे आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ‘राष्ट्रवादी’ आपल्या कोट्यातील एक जागा देण्यास तयार झाल्यावर आणि मुख्य म्हणजे राजू शेट्टी यांनी त्यास होकार दिल्यावर त्या संघटनेत रण माजले आहे.

असेच रण बाकी पक्षांतही ती नावे निश्‍चित झाल्यावर माजू शकते. असा कुरबुरींचा ‘आवाज’ कितीही वाढला, तरी त्यामुळे हे सरकार पडावे म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप नेत्यांना त्याचे फल मिळणे किती कठीण आहे, हेच थोरात व अन्य मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतर घेतलेल्या भूमिकेमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या वर्धापनदिनी ‘आवाज कुणाचा?’ या प्रश्‍नाचे उत्तर शिवसेनेबरोबरच, तो तितक्‍याच ताकदीने ‘राष्ट्रवादी’चाही आहे, हे काँग्रेसमधील ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नाही मान्य करण्याशिवाय तूर्तास तरी अन्य कोणता पर्याय नाही, हेच खरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com