esakal | अग्रलेख : वर्दी आणि गुंडागर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

vikas-dubey

उत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या बळावर जणू काही समांतर सत्ता चालवण्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या विकास दुबे या गुंडाला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्याने एका दुष्ट व्यक्तीचा खात्मा झाला म्हणून समाधान मानायचे, की असे साम्राज्य उभे करण्यात त्याला कोणाकोणाचा हातभार लागला होता, याची पाळेमुळे खणून काढण्याची संधी गमावली म्हणून खेद व्यक्त करायचा असा प्रश्न आहे. वास्तविक दुबेसारख्यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवणे हे आवश्‍यकच होते.

अग्रलेख : वर्दी आणि गुंडागर्दी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या बळावर जणू काही समांतर सत्ता चालवण्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या विकास दुबे या गुंडाला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्याने एका दुष्ट व्यक्तीचा खात्मा झाला म्हणून समाधान मानायचे, की असे साम्राज्य उभे करण्यात त्याला कोणाकोणाचा हातभार लागला होता, याची पाळेमुळे खणून काढण्याची संधी गमावली म्हणून खेद व्यक्त करायचा असा प्रश्न आहे. वास्तविक दुबेसारख्यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवणे हे आवश्‍यकच होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अगर अपराध करेंगे, तो ठोक दिया जायेंगे’, हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एका मुलाखतीतील वक्तव्य. तरीही अनेक ‘अपराध’ नावावर असलेला हा विकास दुबे राज्यात एवढी वर्षे धुमाकूळ कसा काय घालू शकला? त्याच्या वेळीच मुसक्‍या आवळल्या असत्या तर आठ पोलिसांची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. आठ पोलिसांच्या बलिदानानंतर सक्रिय झालेल्या पोलिस दलाने चकमकींमध्ये त्याच्या पाच साथीदारांना ठार केले आणि आता त्यालाही. चित्रपटातच शोभेल असा हा थरार आहे. चित्रपट आणि वास्तवातील सीमारेषा धूसर होत चालल्याचे हे विदारक दर्शन आहे. विदारक अशासाठी, की अशा प्रश्नांकडे आपण किती वरवरच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, याची विषण्ण करणारी जाणीव यातून होते. पोलिस दलाला वाकवणारा, त्यांच्यात आपले खबरे निर्माण करणारा आणि भर पोलिस ठाण्यात खुनासारखे भयंकर गुन्हे करूनही राजरोस वावरू शकणारा विकास दुबे ही भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेची आणि विधिनिषेधशून्य राजकारणाची निर्मिती आहे. त्या विकाराचे मूळ नष्ट करण्यात कोणालाच स्वारस्य नाही. दुबे मरण पावल्याने त्या मूळ विकाराचे लक्षण नाहीसे झाले; रोग नव्हे. 

पाच लाखांचे बक्षीस डोक्‍यावर असलेल्या विकासने पोलिसांना गुंगारा देत हरियाना, राजस्थानमधून भटकत उज्जैन गाठले. विकासच्या नावावर चुलतभाऊ, मंत्री दर्जाचा भाजपचा नेता, प्राध्यापक, व्यापारी यांच्या खुनासह एकूण ६० गुन्हे दाखल होते. खून, दरोडा, अपहरण, खंडणी अशा कितीतरी प्रकारांचे गुन्हे त्याने केले होते. तुरूंगाची हवा खात असताना निवडून येण्याचे ‘कसब’ त्याच्याकडे होते. निवडणुका आल्या, की नेते त्याच्या भेटीला यायचे. त्यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमात, पोस्टरवर झळकायची. ज्या पोलिस अधिकाऱ्याने तीन-चार महिने त्याच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला, त्यांनाच हौतात्म्य पत्करावे लागले. डझनभर पोलिसांसमक्ष एका नेत्याची हत्या करूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराअभावी विकास निर्दोष सुटला होता. एवढी वर्षे राजकीय पक्षांनीही ‘निवडून येण्याची क्षमता’ या आणि एवढ्याच झापडबंद नजरेने त्यांच्याकडे पहिले. एकेकाळी राजकीय नेते गुंड पदरी बाळगायचे, आता गुंडच त्यांना वाकवू, वळवू लागले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उत्तर प्रदेशातील सगळ्या पक्षांशी संधान साधणारा विकास आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला असता, तर कदाचित अशा अनेकांचे बिंग फुटले असते. ‘वर्दी‘चे नि ‘खादी’चेही गुन्हेगारी प्रवृत्तींशी असलेले लागेबांधे उघड झाले असते. एन्काऊंटरच्या घटनेने म्हणूनच शंका-कुशंकांचे मोहोळ उठले आहे. त्याच्या पाच साथीदारांच्या एन्काऊंटरच्या बाबतीत पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. विकासला संरक्षण देण्याची मागणीही त्यात करण्यात आली होती. पण त्यावर निकाल होण्यापूर्वीच त्याला संपवण्यात आले. उज्जैनपासून चॅनेलवाले विकासला नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांच्या ताफ्यामागे होते. त्यांना पोलिसांनी तपासाच्या निमित्ताने रोखले, अन्‌ तासाच्या आत पोलिसांची गाडी घसरून उलटली. पोलिसांच्या हातावर तुरी देऊ पाहात विकासने त्यांच्यावर हल्ला केल्याने प्रत्युत्तरादाखल गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. चित्रपट नि वास्तव यातील दरी मिटून जाते ती अशी! यापूर्वी हैदराबादमध्ये बलात्काराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत संपवले होते. इशरत जहाँ, सोहराबुद्दीन शेख, तुलसीराम प्रजापती अशा एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर खटले चालले होते. देशात २०००-२०१७ या कालावधीत बनावट चकमकीचे १७८२ प्रकार नोंदवले गेले. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडील याबाबतच्या तक्रारींवर नजर टाकली तरी यातल्या ४५ टक्के घटना एकट्या उत्तर प्रदेशातल्या आहेत. 

पोलिसांनी कायदा अंमलात आणायचा असतो, गुन्हेगारांना पकडून न्यायदेवतेसमोर उभे करायचे असते, जागेवरच ‘न्याय’ करायचा नसतो. विकास आणि त्याच्या साथीदारांच्या कृत्यांचे कधीच समर्थन करता येणार नाही, ते कोणी करूदेखील नये. तथापि, ज्यांनी कायद्याचे रक्षण करायचे त्यांनी अत्यंत टोकाच्या परिस्थितीतच तो हातात घेऊन स्वसंरक्षणाचा मार्ग अवलंबावयाचा असतो. जो अपवाद असायला हवा तीच वहिवाट बनणे धोकादायक आहे.  त्यामुळे एकूणच विकास दुबेनामक गुंडाचा ‘विकास’, त्याने केलेली गुन्ह्यांची मालिका, त्याला अटकाव करण्यात पोलिसांना गेल्या अनेक वर्षांत आलेले अपयश, पोलिसांनी एका पाठोपाठ एक केलेल्या चकमकी या सगळ्यांच्याच मुळाशी जाण्याची गरज आहे. त्यासाठी निष्पक्ष आणि सखोल चौकशीचे आव्हान पेलावे लागेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो पोलिस सुधारणांचा. या गोष्टींना हात घालण्याची इच्छाशक्ती कोणी दाखवेल काय?

Edited By - Prashant Patil

loading image